कृष्णा विश्व विद्यापीठात भारतीय प्राचीन ज्ञानविषयक राष्ट्रीय परिसंवाद उत्साहात
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
: येथील कृष्णा विश्व विद्यापीठात भारतीय प्राचीन ज्ञान माहिती व संशोधनविषयक एकदिवसीय राष्ट्रीय परिसंवाद नुकताच उत्साहात संपन्न झाला. कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ अलाईड सायन्सेस आणि मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या राष्ट्रीय परिसंवादात ४०० हून अधिक संशोधक, विद्यार्थी, व शिक्षक प्रत्यक्ष आणि ऑनलाईन प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या परिसंवादाच्या उद्घाटन सोहळ्यास प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिणगारे व कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा हे ऑनलाईन प्रणालीद्वारे; तर कुलगुरु डॉ. नीलम मिश्रा, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, सतीश कुलकर्णी, लक्ष्मीनारायण इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीचे डॉ. प्रशांत होले, आय.आय.टी. मुंबईचे प्रा. डॉ. बी. एन. जगताप, ‘कृष्णा’च्या अलाईड सायन्स विभागाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश पठाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी आपल्या भाषणात वैदिक ज्ञानाबद्धल मौलिक मार्गदर्शन केले. भारतीय ज्ञानप्रणाली, वेद-उपनिषदे यांचे त्याकाळातील समाजरचना आणि आजच्या काळात त्याची असलेली उपयुक्तता याविषयी त्यांनी महत्वपूर्ण माहिती दिली. मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. ए. एम. देशमुख यांनी भारतीय प्राचीन संस्कृतीमध्ये वर्णन केलेल्या सूक्ष्मजीवशास्त्र व त्याचे आधुनिक जीवनशैलीशी असणारे सहसंबंध उदाहरणाद्वारे स्पष्ट केले. सतीश कुलकर्णी यांनी भारतीय प्राचीन विज्ञान परंपरा व त्यामागील सैद्धांतिक दृष्टिकोन विद्यार्थी व उपस्थितांना समजावून सांगितला. डॉ. प्रशांत होले यांनी आपल्या सादरीकरणाद्वारे विविध प्राचीन संस्कृती व विद्या यांचे सध्याच्या ज्ञानप्रणालीशी असलेले शास्त्रीय महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. डॉ. बी. एन. जगताप व जर्मन वैज्ञानिक डॉ. उलरीच बर्क यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कृष्णा विद्यापीठाच्या इनोव्हेशन, इनक्युबेशन केंद्राचे संचालक डॉ. डी. के. अगरवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत या राष्ट्रीय परिसंवादाचा समारोप करण्यात आला. त्यांच्या हस्ते पोस्टर स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. स्नेहल मसूरकर यांनी प्रास्तविक केले. प्रा. अश्विनी जाधव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. शिल्पा रुईकर यांनी स्वागत केले. प्रा. प्राजक्ता सरकाळे यांनी आभार मानले.