उदयनराजेंच्या प्रचारार्थ 30 एप्रिलला कराडला होणार नरेंद्र मोदींची सभा

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कराड येथे ३० एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती भाजपचे कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांनी दिली.
सातारा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराच्या निवडणूक प्रचाराचा भाजपचे प्रदेश निवडणूक सहप्रभारी निर्मलकुमार सुराणा यांनी शुक्रवारी दि. १९ रोजी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आढावा घेतला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, राज्य कार्यकारणी सदस्य व सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांच्यासह अन्य पदाधिकारी व कराड दक्षिण भाजप कोअर कमिटीतील पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.
एकनाथ बागडी यांनी सांगितले की, या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निर्मलकुमार सुराणा यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आढावा घेतला. कोअर कमिटी पदाधिकारी, सदस्यांना काही सूचना केल्या. महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ ३० एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कराड येथे जाहीर सभा होणार आहे. यासाठी कराड शहर परिसरात दोन ठिकाणी जागेची पाहणी करण्यात आली आहे. त्यातील एक ठिकाण सैदापूर येथे आहे .ही जागा ३५ एकर आहे. परंतु, इतर सुविधा , व अन्य बाबींचा विचार करून याबाबतची अधिकृत माहिती भाजपच्या नियोजन बैठकीनंतर देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.