नरेंद्र मोदींमुळे जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार : कराडला 'मन की बात'चे थेट प्रक्षेपण
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची झपाट्याने प्रगती होत आहे. जगात २२० कोटी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. हे सर्व पंतप्रधान मोदींमुळे शक्य झाले असून, नरेंद्र मोदींमुळे जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. नरेंद्र मोदींच्या रुपाने भारताला समर्पित आयुष्य देणारा पंतप्रधान लाभला आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी काढले. भारतीय जनता पार्टी कराड दक्षिणच्यावतीने कराडमध्ये आयोजित ‘मन की बात’ कार्यक्रमावेळी त्या बोलत होत्या.
कराड येथील वेणुताई चव्हाण सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ना. डॉ. भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. व्यासपीठावर भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, कराडच्या माजी नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, माजी नगरसेवक सुहास जगताप, सुनील शिंदे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष काकासाहेब जाधव, शहराध्यक्ष राजेंद्र माने, सुलोचना पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमानंतर झालेल्या सभेत बोलताना ना.डॉ. पवार म्हणाल्या, आपल्या देशात सर्वोत्कृष्टपणे चाललेल्या उपक्रमांची माहिती देणारा ‘मन की बात’ हा कार्यक्रम आहे. अनेक उदारहरणे देत पंतप्रधान मोदी विविध विषय या कार्यक्रमातून उलगडून सांगतात. देशाच्या विकासात महिलांचे योगदान महत्वाचे आहे. उज्वल भारतासाठी महिलांनी पुढे येणे गरजेचे आहे. जेव्हा १४० कोटी जनता एक पाऊल पुढे टाकायचे ठरवते, तेव्हा १४० कोटी पावले आपण पुढे जातो. ही सर्वांच्या एकजुटीची ताकद आहे. याच एकजुटीने आपण कोरोनाचे संकट परतावून लावले. देशात लस बनवून नरेंद्र मोदींनी भारताला आत्मनिर्भर बनविले.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, आरोग्य क्षेत्रात गेल्या काही वर्षात आमूलाग्र बदल झाले असून, याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना जाते. कोरोनानंतर या खात्याचा कार्यभार वाढला आहे. ना. डॉ. पवार यांनी आपल्या कुशल कार्यातून देशाच्या आरोग्य धोरणात महत्वाचे योगदान दिले आहे. पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतून ५ लाखांचे कवच पुरविणारी देशातील सर्वांत मोठी आयुष्मान भारत योजना देशभरात राबविली जात आहे. या योजनेचा लाभ कराड दक्षिण मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘आयुष्मान भारत’ योजनेच्या लाभार्थींना प्रातिनिधीक स्वरुपात गोल्डन कार्डचे वितरण करण्यात आले. यामध्ये मंगल टकले, दीपा टकले, गौरव पारखे, योगेश ढेरे, सुनंदा कुंभार, तानाजी कुंभार, शशिकांत कुंभार, रेश्मा कुंभार, मुकुंद कुंभार आदींचा समावेश होता.
भाजपाचे तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील यांनी प्रास्तविक केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. अभिषेक भोसले यांनी आभार मानले. कार्यक़्रमाला भाजपाचे व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कराड व साताऱ्याला ७७ कोटींचा निधी
आरोग्य मंत्रालयाअंतर्गत सातारा जिल्ह्यासह कराडमधील विविध कामांसाठी व वैद्यकीय सुविधांसाठी एकूण ७७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी यावेळी दिली. यामध्ये प्रामुख्याने कराड उपजिल्हा रुग्णालयात १०० बेडच्या विस्तारासाठी ३३ कोटी, ५० बेडच्या फिल्ड हॉस्पिटलसाठी ३.५ कोटी, सातारा जिल्हा रुग्णालयात ५० बेडच्या विस्तारासाठी २३ कोटी, सणबूर (ता. पाटण) येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीसाठी व निवासस्थान उभारणीसाठी ५ कोटी, अकाईचीवाडी (ता. कराड) येथे आरोग्य केंद्रासाठी ५५ लाख, सातारा जिल्ह्यात १० आरोग्य व कल्याण केंद्र उभारणी, ११ प्राथमिक आरोग्य केंद्र ब्युरोची उभारणी, ५ शहरी आरोग्य व कल्याण केंद्राची उभारणी, तसेच कराड शहरात आरोग्य वर्धिनी केंद्राची उभारणी अशा कामांसाठी एकूण ३५ कोटींचा निधी देण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यात लवकरच अत्याधुनिक सुविधांनीयुक्त वैद्यकीय लॅब साकारण्यात येणार असून, त्यासाठी सुमारे १ कोटींची तरतूद केली जाणार असल्याचे ना. डॉ. पवार यांनी सांगितले.
प. महाराष्ट्रातील सर्वांत मोठा ‘आयुष्मान भारत’ कॅम्प लवकरच कराडमध्ये!
पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्वाकांक्षी योजना असलेल्या ‘आयुष्मान भारत’ योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून, डॉ. अतुल भोसले यांनी लाभार्थींच्या नोंदणीसाठी कराडमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठा म्हणजेच सुमारे ५० हजार लाभार्थींचा ‘आयुष्मान भारत’ कॅम्प आयोजित करण्याचा मनोदय केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यासमोर व्यक्त केला. त्यावेळी ना. डॉ. पवार यांनी आपल्या भाषणातून डॉ. भोसले यांच्या या निर्धाराचे कौतुक करत, अशा कॅम्पच्या आयोजनाच्या तयारीला लागण्याची सूचना केली. या कार्यक्रमासाठी स्वत: उपस्थित राहण्याची ग्वाहीदेखील त्यांनी आपल्या मनोगतातून दिली.