मतदार संघातील युवकांसाठी मोठ्या रोजगार निर्मितीचे माझे ध्येय ; डॉ. अतुलबाबा भोसले – changbhalanews
राजकिय

मतदार संघातील युवकांसाठी मोठ्या रोजगार निर्मितीचे माझे ध्येय ; डॉ. अतुलबाबा भोसले

येळगाव मध्ये निवडणूक प्रचारार्थ सभा

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
येणाऱ्या काळात कृष्णा हॉस्पिटलची दुसरी शाखा शिरवळला सुरू करण्यात येणार असून तिथे मोठ्या प्रमाणात युवकांच्या हाताला रोजगार मिळणार आहे. त्याबरोबरच कराडला केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठा उद्योग आणून मोठी रोजगार निर्मिती करणे हेच माझे ध्येय आहे. त्यामुळे मतदारांनी मला मोठ्या मताधिक्याने विजयी करुन लोकसेवेची संधी द्यावी, असे आवाहन डॉ. अतुलबाबा भोसले यांनी येळगाव ता. कराड येथील जाहीर प्रचार सभेत बोलताना केले.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपा – महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ येळगाव (ता. कराड) येथे जाहीर सभा पार पडली. याप्रसंगी व्यासपीठावर य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, पैलवान आनंदराव मोहिते, पंकज पाटील, भूषण जगताप, संजय शेवाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, येळगावच्या या सभेला भागातील मतदारांचा मिळालेला प्रतिसाद भारावून टाकणारा आहे. गेल्या अडीच वर्षांच्या काळात महायुती सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिणमध्ये ७४५ कोटींचा विकासनिधी आणता आला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, बांधकाम कामगार योजना, आयुष्यमान भारत, वयोश्री योजना, नमो शेतकरी योजना यासारख्या योजनांचा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी माझ्या परीने प्रयत्न केले.

या सभेत डॉ. अतुलबाबा भोसले यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, केंद्रात मंत्री, राज्यात मुख्यमंत्री, खासदार, आमदार अशी सगळी पदे गेली अनेक वर्षे विद्यमान आमदारांनी भोगली आहेत. मात्र सत्तापदावर असताना त्यांनी मतदारसंघाकडे दुर्लक्ष केले. मात्र आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्याकडून आयटी हब, रोजगारासारखी खोटी आश्वासने दिली जात आहेत. त्यांना आता‌ जनतेनेच जाब विचारला पाहिजे आणि, त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.

कृष्णा हॉस्पिटल, कृष्णा विद्यापीठाच्या माध्यमातून आरोग्य व शिक्षणक्षेत्रात मोठे काम झाले असून भोसले कुटुंबाच्या या कार्याची परतफेड कराड दक्षिणमधील जनतेने डॉ. अतुलबाबांना आमदार करून करावी, असे आवाहन पैलवान आनंदराव मोहिते यांनी केले. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेकडून डॉ. अतुलबाबांना जाहीर पाठिंबा देण्यात आला.

सभेला मदनराव मोहिते, सुनील पाटील, प्रमोद मोहिते, अण्णासाहेब जाधव, राजू मुल्ला, विवेक पाटील, राजू पाटील, गणेश शेवाळे यांच्यासह कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते.

2014 ला ज्यांनी विलासकाकांचे तिकीट कापले, तेच आज विलासकाकांच्या नावाने मत मागत आहेत- पै. आनंदराव मोहिते

सत्तेत असताना आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी माजी आमदार विलासराव पाटील उंडाळकर यांना प्रचंड मानसिक त्रास दिला‌ २०१४ साली विलासकाकांचे तिकीट कापले, मात्र त्यांच्यावरच आज काकांच्या नावाने मते मागायची वेळ आली आहे.. पण विलासकाकांचे कार्यकर्ते या खोटेपणाला भूलणार नाहीत, उलट त्यांना धडा शिकवतील, असे पैलवान आनंदराव मोहिते म्हणाले.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close