‘कर्नाक’ पुलाचं ‘सिंदूर’ नामकरण! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ऐतिहासिक लोकार्पण

मुंबई, दि. १० जुलै | चांगभलं वृत्तसेवा
मुंबईच्या वाहतूक प्रणालीत ऐतिहासिक स्थान असलेल्या कर्नाक पुलाचं ‘सिंदूर पूल’ असं नामकरण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज या नव्या पुलाचं लोकार्पण करण्यात आलं.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “भारतीयांना फसवणारा व अत्याचार करणारा कर्नाक हा ब्रिटीश गव्हर्नर होता. म्हणूनच या पुलाचे ‘सिंदूर’ नामकरण करून त्या काळ्या इतिहासाच्या खुणा पुसण्यात आल्या आहेत.”
दिडशे वर्षांहून अधिक काळ कर्नाक ब्रिज या नावाने ओळखला जाणारा हा पूल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ मशीद बंदर रेल्वे स्थानकाजवळ स्थित आहे. या पूलाचं लोकार्पण करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात भारताच्या इतिहासातील काळी प्रकरणं संपली पाहिजेत, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. त्यानुसार पुलाचं नाव बदलून ‘सिंदूर’ करण्यात आलं आहे.”
यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री मंगल प्रभात लोढा, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार ॲड. मनीषा कायंदे, माजी आमदार राज पुरोहित, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, अपर आयुक्त अभिजीत बांगर आणि अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले की, ‘सिंदूर’ या नावामागे भारतीय सेनेचं ‘ऑपरेशन सिंदूर’ हे प्रेरणास्थान ठरलं आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सेनेने पाकिस्तानात घुसून दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले, ही ऐतिहासिक घटना लक्षात घेऊन महानगरपालिकेने पुलाला ‘सिंदूर’ हे नाव दिल्याचं त्यांनी सांगितलं.
पुलाची एकूण लांबी ३४२ मीटर असून त्यापैकी ७० मीटर लांबी रेल्वे हद्दीत आहे. वाहतूकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असलेला हा पूल अल्पावधीत पुनर्बांधणी करून खुला केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मनपाच्या टीमचे अभिनंदन केले. दुपारी ३:०० वाजलेपासून पूल सर्वसामान्यांसाठी वाहतुकीस खुला करण्यात आला.
कर्नाक कोण होता? पूलास त्याचं नाव का दिलं गेलं होतं?…
कर्नाक पूल हे नाव ब्रिटिश अधिकारी सर जेम्स रिव्हेट-कर्नाक यांच्या नावावरून देण्यात आलं होतं. तो 1839 ते 1841 या काळात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने बॉम्बे प्रांताचा गव्हर्नर होता. त्यांच्या कार्यकाळात मुंबईत नागरी व रेल्वे विकासावर भर देण्यात आला. ब्रिटिश काळात रस्ते, पूल अशा सार्वजनिक पायाभूत सुविधांना तत्कालीन ब्रिटिश अधिकार्यांची नावं दिली जात. म्हणूनच या पुलाला ‘Carnac Bridge’ नाव दिलं गेलं असावं. 1860 च्या दशकात उभारलेला हा पूल ब्रिटिशकालीन मुंबईच्या रेल्वे व वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग होता. 2023 मध्ये धोकादायक स्थितीमुळे पूल पाडण्यात आला आणि आता ‘सिंदूर पूल’ म्हणून त्याचा पुनर्जन्म झाला.
सिंदूर पुलाविषयी:
दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मशीद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरात पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठी सिंदूर पूल महत्त्वाचा आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने पूर्वीचा कर्नाक पूल पाडून पूलाची नव्याने बांधणी केली आहे. मध्य रेल्वेच्या मंजूर आराखड्यानुसार हे बांधकाम करण्यात आले आहे.