आई – वडिलांनी किडनी देऊन आपल्या मुलांना दिला पुनर्जन्म!
कृष्णा हॉस्पिटलमध्ये एकाच दिवशी दोघांवर यशस्वी किडनी प्रत्यारोपण
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
एकीकडे उस्मानाबाद जिल्ह्यातील एका खेड्यात वडापावचा गाडा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे १८ वर्षीय महेशचे (नाव बदलले आहे) आईवडील! आणि दुसरीकडे अक्कलकोट जवळच्या एका खेड्यात ऊसतोड मजूर म्हणून राबून, कुटुंबाचे पोट भरणारे २३ वर्षीय नितीनचे (नाव बदलले आहे) वडील! किडनी विकाराने त्रस्त झालेल्या या दोघांवर गेल्या ६ महिन्यांपासून सोलापूर जिल्ह्यातील एका दवाखान्यात डायलेसिस उपचार सुरु होते. तिथे या कुटुंबांची एकमेकांशी ओळख झाली. दोन्ही कुटुंबांना एकच चिंता सतावत होती, ती म्हणजे आपल्या मुलांना या संकटातून बाहेर काढायचे कसे? यासाठी समोर पर्यायही एकच होता; तो म्हणजे किडनी ट्रान्सप्लान्टचा! पण हातावरचे पोट असलेल्या या कुटुंबांना खर्च परवडणारा नव्हता.
त्याचवेळी त्यांना कराडमधील कृष्णा हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या यशस्वी किडनी ट्रान्सप्लान्ट शस्त्रक्रियेबद्दल माहिती समजते. ही दोन्ही कुटुंबे तडक तिकडून निघून येतात आणि आगाशिवनगरात एका खोलीत भाड्याने तब्बल ३ महिने राहून, कृष्णा हॉस्पिटलमध्ये नियमित तपासणी व उपचार घेऊ लागतात. महेशसाठी त्याची आई आणि नितीनसाठी त्याचे वडील पुढे येत, आपली एक किडनी आपापल्या मुलांना देतात आणि आपल्या मुलांना या संकटातून बाहेर काढत पुनर्जन्म देतात..! एखाद्या चित्रपटाची हृदयद्रावक कथा वाटावी, अशी ही सत्यघटना कृष्णा हॉस्पिटलमध्ये नुकतीच घडली आहे. किडनी दान करणारे आई आणि वडील; तसेच ज्यांना किडनी प्रत्यारोपण करण्यात आले त्या दोन्ही रुग्णांना नुकताच कृष्णा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असून, चौघेही सुखरुप आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात राहणाऱ्या महेशचे वडील उदरनिर्वाहासाठी गावातच वडापावचा गाडा चालवितात. महेशला लहानपणापासूनच किडनीचा विकार जडलेला होता. गेली कित्येक वर्षे हे कुटुंब अनेक हालअपेष्टा सहन करत, त्याच्या उपचारांसाठी धडपडत होते. काहीही करुन आपल्या मुलाला या संकटातून बाहेर काढायचेच असा चंग या कुटुंबाने बांधला होता. पण गेल्या ६ महिन्यांपूर्वी महेशचे हे दुखणे बळावले आणि डॉक्टरांनी नियमित डायलेसिस करण्याची सूचना केली. किशोरवयीन महेश सततच्या डायलेसिस प्रक्रियेला कंटाळला होता; तर त्यासाठी येणाऱ्या खर्चामुळे आई-वडील हवालदिल झाले होते. शिवाय रोजची रोटी कमाविल्याशिवाय घरची चूल पेटत नसल्याने उपचारासाठी वेळ देणेही दिवसेंदिवस कठीण बनत चालले होते.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात राहणाऱ्या नितीनच्या जीवनातही संकटांची हीच कहाणी सुरु होती. नितीनचे वडील हे ऊसतोड मजूर म्हणून काम करतात. ऊसाचा हंगाम संपल्यानंतर रोजीरोटीसाठी पडेल ते मजुरीचे काम करतात. घरच्या या हालाखीच्या परिस्थितीमुळे नितीनने डिप्लोमाचे शिक्षण अर्धवट सुरु करुन गाडी चालविण्याचा व्यवसाय सुरु केला होता. त्याच्या मदतीमुळे हे कुटुंब आर्थिक हालाखीतून सावरत असतानाच; अचानकपणे त्याला किडनीविकार झाल्याचे निदान झाले आणि हे कुटुंब पुन्हा एकदा गलितगात्र झाले. इथेही गेल्या ५ महिन्यांपासून नितीनवर डायलेसिस उपचार सुरु करण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यात एकाच रुग्णालयात नियमित डायलेसिससाठी येणाऱ्या या दोन्ही कुटुंबांची आपापसांत ओळख होते. आपल्या मुलांना संकटातून बाहेर काढणे हेच या दोन्ही कुटुंबांचे ध्येय्य बनून जाते. पण यासाठी किडनी ट्रान्सप्लान्ट हा अखेरचा मार्ग असल्याने आणि त्यासाठी येणारा खर्च आवाक्याबाहेरचा असल्याने या कुटुंबांसमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते.
अशातच त्यांना कराडमधील कृष्णा हॉस्पिटलमध्ये अनेक किडनी ट्रान्सप्लान्ट शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्याची माहिती समजली अन् या कुटुंबांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. महेश आणि नितीन या दोघांच्या कुटुंबियांनी लागलीच कराड गाठले आणि कृष्णा हॉस्पिटलमधील किडनी ट्रान्सप्लान्ट विभागाला भेट दिली. तिथे असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. वैशाली यादव यांनी या संपूर्ण प्रक्रियेची आणि उपचारांबद्दलची माहिती या कुटुंबांना दिली. त्यानुसार त्यांनी कृष्णा हॉस्पिटलमध्येच आपल्या मुलांवर किडनी ट्रान्सप्लान्ट शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय पक्का केला. पण हे उपचार एका दिवसात होणारे नाहीत. नियमित उपचारासाठी राहण्याचा व जागेचा प्रश्न होता. पण आपल्या मुलांच्या निरोगी आयुष्यासाठी खडतर संघर्ष करणाऱ्या या कुटुंबांनी कृष्णा हॉस्पिटलजवळच आगाशिवनगर (ता. कराड) येथे एक खोली भाड्यात घेऊन तिथे राहण्यास प्रारंभ केला.
कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कृष्णा हॉस्पिटलमधील किडनी प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख तथा मेडिकल ॲडमिनीस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर यांच्या निर्देशानुसार किडनी ट्रान्स्प्लान्ट सर्जन डॉ. अमोलकुमार पाटील, युरॉलॉजिस्ट डॉ. योगेश जाधव, नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. राहुल पाटील या तज्ज्ञ डॉक्टरांच्या वैद्यकीय टीमसह अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने या दोघांवर उपचार सुरु झाले. महेशच्या किडनीशी आईची आणि नितीनच्या किडनीशी वडिलांची किडनी जुळली आणि या दोन्ही माता – पित्यांनी आपली किडनी आपापल्या मुलांना दान करण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार एकाच दिवशी कृष्णा हॉस्पिटलमध्ये या दोघांवर किडनी ट्रान्सप्लान्ट शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली आणि दोन्ही मुलांना पुनर्जन्म मिळाला.
कृष्णा हॉस्पिटलने माफक दरात ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली असून, आत्तापर्यंत २७ किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हॉस्पिटलने यशस्वीपणे केल्या आहेत. यासाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक साधने आणि तज्ज्ञ डॉक्टर्स व अन्य स्टाफ येथे उपलब्ध आहे. या रुग्णांना आणि त्यांना किडनी दान करणाऱ्या माता – पित्यांना कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन, त्यांना निरोगी आरोग्यासाठी सदिच्छा दिल्या. यावेळी कृष्णा हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ व अन्य कर्मचारी उपस्थित होते.
दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेमुळे किडनीदात्यांना अवघ्या काही दिवसांतच डिस्जार्च
या शस्त्रक्रियेसंदर्भातील प्रमुख बाब म्हणजे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करुन, किडनी दान करणाऱ्या माता – पित्याची किडनी काढण्यात आली. दुर्बिणीद्वारे जिवंत दात्याची किडनी काढणे कौशल्याची बाब असून, कृष्णा हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांनी ही अवघड शस्त्रक्रिया सहजसाध्य केली. या प्रकारच्या शस्त्रक्रियेने रक्तस्त्राव व वेदना कमी होऊन हॉस्पिटलमध्ये राहण्याचा कालावधीही कमी झाला. त्यामुळे किडनी दान केलेल्या महेशच्या आईला आणि नितीनच्या वडिलांना अवघ्या काही दिवसांतच डिस्चार्ज देण्यात आला. तर महेश व नितीनला ११ व्या दिवशी डिस्चार्ज देण्यात आला.