कराड परिसरातील गुन्हेगारांच्या टोळीला मोक्का ; अलिकडच्या काळातील दुसरी कारवाई
गुन्हेगारी रोखण्यासाठी कराड पोलिसांचे पाऊल

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कराड पोलिसांनी कठोर पावली उचलत अलीकडच्या काळातील दुसरी मोठी मोक्का कारवाई केली आहे. ओगलेवाडी परिसरातील कुख्यात गुंड सोम्या सूर्यवंशी याच्या टोळीवर पोलिसांनी संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) ही कारवाई केली आहे. कराड परिसरातील आणखी काही गुन्हेगार टोळ्यावर पोलिसांकडून वॉच ठेवला जात असून येणाऱ्या काळात आणखी काही टोळ्यावर अशी कारवाई होऊ शकते.
कराड परिसरातील सोम्या सूर्यवंशी याच्या टोळीवर झालेल्या मोक्का कारवाईची माहिती बुधवारी पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी पत्रकारांना दिली. यावेळी कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील, कराड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नितीन जगताप उपस्थित होते.
पोलीस उपाधीक्षकांनी दिलेलीज माहिती अशी, पोलीस अधीक्षक समीर शेख तसेच अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी सातारा जिल्हयाचा कार्यभार स्विकारल्यापासुन अनेक मोठ्या गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उभारुन सातारा जिल्हयातील गुन्हेगारी विश्वाचा बिमोड करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. यामध्ये शहर व परिसरातील अनेक गुन्हेगार पोलीस विभागाचे हिटलिस्टवर आहेत. त्यापैकीच एक सोमा ऊर्फ सोमनाथ ऊर्फ आण्णा अधिकराव सुर्यवंशी (टोळी प्रमुख) व त्याचे दोन साथीदार रविराज ऊर्फ गुल्या शिवाजी पळसे व आर्यन चंद्रकांत सुर्यवंशी सर्व रा.हजारमाची ता. कराड जि. सातारा यांचेविरुध्द मोक्का (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम १९९९) अन्वये दाखल गुन्हयांस अप्पर पोलीस महासंचालक, साो (कायदा व सुव्यस्था) महा. राज्य मुंबई यांची दि.११ जून २०२४ रोजी मंजुरी दिल्याने या टोळी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे.
ओगलेवाडी परिसरातील हजारमाची ता. कराड गावचा ग्रामपंचायत सदस्य व कराड शहर पोलीस ठाणे अभिलेखावरील गुन्हेगार सोमा ऊर्फ सोमनाथ ऊर्फ आण्णा अधिकराव सुर्यवंशी याचेविरुध्द यापुर्वी कराड शहर व पुणे येथे वैयक्तिक व टोळीने असे असे एकुण मिळुन १३ गुन्हे यापुर्वी दाखल आहेत. त्यामध्ये खुन, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, गर्दी मारामारी, जुगार, अपहरण, सरकारी नोकरांवरील हल्ले व अवैध अग्निशस्त्र बाळगलेबाबतच्या गुन्हयांचा समावेश आहे.
पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस ठाणे गु.र.नं.१२१५/२०२३ भादवि कलम ३०७,३८७,३२६,३२४५०४,५०६,३४ आर्म अॅक्ट ४/२५ यामधील निष्पन्न आरोपी टोळी प्रमुख सोमा ऊर्फ सोमनाथ ऊर्फ आण्णा अधिकराव सुर्यवंशी, टोळी सदस्य रविराज ऊर्फ गुल्या शिवाजी पळसे व आर्यन चंद्रकांत सुर्यवंशी सर्व रा.हजारमाची ता. कराड जि. सातारा यांचेविरुध्द विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर यांचेकडे मोक्का अंतर्गत कलमवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावास विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी मंजुरी दिल्यानंतर सदर गुन्हयामध्ये मोक्का अंतर्गत कलमांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकुर यांनी गुन्हयाचा पुढील सखोल तपास करुन, आरोपींविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्याची पुर्व परवानगी मिळण्याबाबत अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) महाराष्ट्र राज्य यांचेकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला दि.१० जून २०२४ रोजी मंजुरी प्राप्त झाली. त्यामुळे सोम्या सुर्यवंशी याच्यासह टोळीतील अन्य दोन सदस्य मिळून तिघांविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
आणखी काही टोळ्या पोलिसांच्या निशाण्यावर…
कराड शहर व परिसरातील आणखी काही कुख्यात गुन्हेगार पोलीस विभागाचे निशाण्यावर असुन, त्यांच्या हिंसक व गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असुन, कराड शहर व परिसरामध्ये आगामी काळात देखील अशा प्रकारच्या कारवाया सुरु राहणार असल्याचा सुचक इशारा पोलीस अधीक्षक समीर शेख , अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, कराडचे उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी दिलेला आहे.
एसपी, एसीपींकडून कराड पोलिसांचे अभिनंदन…
पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांनी सदर मोक्का कारवाईच्या अनुषंगाने कराडचे पोलीस उपाधीक्षक तथा तपास अधिकारी अमोल ठाकुर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील , तत्कालीन वपोनि प्रदिप सुर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप शितोळे, अमित बाबर, उपनिरिक्षक अनिल पाटील, हवालदार असिफ जमादार, अनिकेत पवार, संजय देवकुळे, संतोष सपाटे, महेश लावंड प्रशांत चव्हाण, प्रविण पवार, अमित सपकाळ, सागर बर्गे, दिपक कोळी, आनंदा जाधव, धीरज कोरडे, सोनाली पिसाळ यांचे अभिनंदन केले आहे.
कारवाई झालेली ही कराड परिसरातील दुसरी टोळी…
पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी कराडचा पदभार स्वीकारल्यानंतर कराड परिसरातील मसूर विभागात असलेल्या टोळीवर काही महिन्यांपूर्वी मोक्का कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर काहीसा गुन्हेगारी कारवायांना ब्रेक लागला होता. या कारवाईला काही काळ लोटल्यानंतर कराड पोलिसांनी पुन्हा तातडीने पावले उचलत ओगलेवाडी परिसरातील सोमा सूर्यवंशी यांच्या टोळीवर मोक्का कारवाई केली आहे. त्यामुळे पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांच्या कार्यकाळातील ही दुसरी मोक्का कारवाई ठरली आहे.
मोक्का अन् कराड….
मोक्का म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा. पूर्वी हा कायदा मुंबईमधील गुन्हेगारी टोळ्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून वापर करण्यात येत होता. मात्र 2003 च्या सुमारास महाराष्ट्रात मुंबई शहराच्या बाहेर प्रथमच मोक्का कायद्यान्वये कराड परिसरातील एका टोळीवर पोलिसांनी कारवाई केली होती. त्यावेळी मोक्का कायद्याची महाराष्ट्रात प्रथमच जोरदार चर्चा झाली होती. त्यानंतर आत्तापर्यंत कराड परिसरात अनेक टोळ्यांवर पोलिसांनी मोक्का कारवाई केली आहे.