चांगभलं ऑनलाइन | मुंबई
मराठा आरक्षणाचा लढा राज्यात तीव्र झाला आहे. मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राज्यातील राजकीय पक्षाने विविध संघटना पुढे येत आहेत. काही ठिकाणी आंदोलनाने उग्र रूप धारण केले आहे. जाळपोळी सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी राज्यातील महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलवण्याचची मागणी केली. तसे निवेदनही राज्यपाल महोदयांना देण्यात आले.
राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून 50% च्या आतील टिकणारे आरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केलं आहे. या आंदोलनाची तीव्रता आणि धग दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्यातील विविध भागातील राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि मराठा समाज मोर्चे काढून, साखळी उपोषण आणि आमरण उपोषण करून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत मराठा आरक्षणाची मागणी करत आहेत. शांततेत चाललेल्या आंदोलनाने काही ठिकाणी उग्ररूप धारण केले असून दोन ठिकाणी आमदारांची घर जाण्याचे प्रकारही घडले आहेत.
या पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी
महामहीम राज्यपाल रमेश बैस यांना महाविकासआघाडीच्या आमदारांचे शिष्टमंडळ भेटले. जरांगे-पाटील यांचे उपोषण, आरक्षण व राज्यातील महत्वाच्या विषयावर यावेळी आघाडीच्या आमदारांनी राज्यपाल महोदयांच्या सोबत चर्चा केली. मराठा आरक्षणासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी यावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी राज्यपालांकडे केली. यावेळी आमदारांच्या शिष्टमंडळांकडून राज्यपालांना विशेष अधिवेशन बोलविण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. राष्ट्रीय काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan),
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (Jayant Patil) आ. जयंत पाटील, नाना पटोले (Nana Patole) , आ. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), माजी मुख्यमंत्री आ. अशोकराव चव्हाण (Ashok Chavan), आ अंबादास दानवे (Ambadas Danve), आ. विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar), यांच्यासह राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व शिवसेना (उध्दव ठाकरे गट) आमदार उपस्थित होते.
काँग्रेसची विधान भवनाच्या पायऱ्यावर घोषणाबाजी
दरम्यान राष्ट्रीय काँग्रेसच्या आमदारांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवार, दिनांक 30 ऑक्टोबर रोजी विधानभवनाच्या पायऱ्यावर जोरदार घोषणाबाजी केली. ‘जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, या सरकारचं करायचं काय खाली मुंडी वर पाय, मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, एक मराठा लाख मराठा’ अशा जोरदार घोषणा यावेळी राष्ट्रीय काँग्रेसच्या आमदारांनी दिल्या.