इंडिया आघाडी महाविकास आघाडीकडून शक्ती प्रदर्शन करत आमदार शशिकांत शिंदे यांचा सातारा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल
शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती
चांगभलं ऑनलाइन | सातारा प्रतिनिधी
इंडिया आघाडी महाविकास आघाडी प्रणित – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सातारा लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी महारॅलीने जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयात भरण्यात आला. उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या समवेत, ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील आ. बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
गांधी मैदानापासून महा रॅलीला सुरुवात झाली. यावेळी जोरदार घोषणा देण्यात येत होत्या. महारॅली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आल्यानंतर मोजक्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शशिकांत शिंदे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार म्हणाले, शशिकांत शिंदे हा माझा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. साताऱ्याच्या जनतेने त्याच्या पाठीशी ठाम उभे राहावे. येणाऱ्या काळात साताऱ्याचा विकास शशिकांत शिंदे हेच करतील. त्यामुळे निवडणुकीत जनतेने त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, अशी भावनिक साद शरदचंद्र पवार यांनी घातली.
उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांनी भाजपवर शाब्दिक तोफ डागली. शिंदे म्हणाले, माझी उमेदवारी सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी आणि साताऱ्याच्या विकासासाठी आहे. जनतेचा मला मोठा पाठिंबा मिळत असून त्यामुळे साताऱ्याची यंदाची लोकसभा निवडणूक ही हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशीच आहे. जनतेच्या दरबारात येऊन विरोधी उमेदवारांनी आपण कोणती कामे केली हे सांगावे, मात्र रडीचा डाव खेळून मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करू नये. आजवर सत्तेचा वापर करून अनेक नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांनाच पुन्हा सोबत घेण्याचा प्रकार भाजपने केला आहे. मलाही अशाच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे षडयंत्र सध्या सुरू आहे. त्यामुळे जनतेने मला पाठिंबा द्यावा आणि खोटे षडयंत्र करणाऱ्यांना धडा शिकवावा, असे आवाहन शशिकांत शिंदे यांनी यावेळी केले.
साताऱ्याची निवडणूक रंगतदार होणार…
सातारा लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडी महाविकास आघाडीच्यावतीने शशिकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या विरोधात अद्याप महायुतीने अधिकृत उमेदवार घोषित केलेला नाही, मात्र उदयनराजे भोसले यांनी ‘मीच उमेदवार आहे, मोठं लग्न असल्याने यादी व्हायला वेळ लागतोय’ असे जाहीर करून संपर्क दौऱ्याला सुरुवात केली आहे. त्यामुळे महायुतीचा उमेदवार ही लवकरच अधिकृतपणे जाहीर होण्याची शक्यता असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे एकूण साताऱ्याची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सातारा लोकसभेसाठी तीन नामनिर्देशनपत्र दाखल
–सातारा लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज सोमवार दि. 15 एप्रिल 2024 रोजी तीन नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत.
सागर शरद भिसे, लक्ष्मी टेकडी, सदरबझार, सातारा यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र तर शशिकांत जयवंतराव शिंदे, मु.पो. ल्हासुर्णे ता. कोरेगाव जि. सातारा यांनी नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाकडून दोन नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत.