ऐतिहासिक साताऱ्यात पूर्वी भगवा फडकत होता यापुढेही तो फडकत राहील ; पंतप्रधान नरेंद्र मोदी – changbhalanews
राजकिय

ऐतिहासिक साताऱ्यात पूर्वी भगवा फडकत होता यापुढेही तो फडकत राहील ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

शिवछत्रपतींच्या भूमीतून मिळालेली प्रेरणा हीच माझी ऊर्जा

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी

सातारा ही शिवछत्रपतींची भूमी आहे. मला पंतप्रधान पदाचा उमेदवार पक्षाने घोषित केले, तेव्हा मी सर्वप्रथम रायगडावर जाऊन शिवछत्रपतींच्या समाधीसमोर नतमस्तक झालो होतो. या भूमीतून मिळालेले प्रेरणा ही माझी ऊर्जा आहे, त्यामुळे अखंडपणे देशसेवेचे माझे काम सुरू आहे. साताऱ्यात पूर्वी भगवा फडकत होता, यापुढेही तो फडकतच राहील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. सैदापूर (कराड) येथे सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या निवडणूक प्रचारार्थ सोमवारी (दि.२९) आयोजित महा विजय संकल्प सभेत ते बोलत होते.

यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, आ. नरेंद्र पाटील, भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी तथा राज्य कार्यकारणी सदस्य डॉ. अतुल भोसले, भाजपा प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, लोकसभा समन्वयक रामकृष्ण वेताळ, अशोक गायकवाड यांच्यासह मतदार संघातील महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

“कृष्णा काठावर वसलेल्या सातारकरांना माझा नमस्कार” अशी मराठीतून भाषणाची सुरुवात करत नरेंद्र मोदी यांनी अर्ध्या तासाच्या भाषणात विविध मुद्द्यांचे विवेचन केले. ते म्हणाले, साताऱ्याच्या या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीत आल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने आठवते. सन 2013 मध्ये भारतीय जनता पार्टीने मला पंतप्रधान पदासाठी घोषित केले, त्यावेळी मी सर्वप्रथम रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी समोर नतमस्तक झालो होतो. या पवित्र भूमीतून मला जी प्रेरणा मिळाली तीच माझ्या कार्याची ऊर्जा आहे. सातारा ही महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची भूमी आहे. त्यांनी घालून दिलेले आदर्श घेऊन आपण पुढे निघालो आहोत.

सातारा ही शूर वीरांची भूमी आहे. मिल्ट्री अपशिंगे सारखं गाव असो किंवा संपूर्ण सातारा असो, भारतीय सेना आत्मनिर्भर झाल्याचे पाहून आज प्रत्येक आजी-माजी सैनिकांना मनस्वी आनंद होत आहे. आज भारतीय सेनेतील जवानाच्या हातात एक से बढकर एक असे मेड इन इंडिया हत्यार आहे. मात्र हत्यारांची दलाली करणाऱ्या दलालांना हे चांगले वाटत नाही, त्यांना काँग्रेसचेच सरकार चांगले वाटत होते. सैनिकांसाठी वन रँक वन पेंशनची गॅरेंटी मोदीने दिली होती, ती 40 वर्षापासून काँग्रेसच्या सरकारने रखडवली. पण मोदीने ती पूर्ण केली. आत्तापर्यंत या योजनेतून एक लाख कोटी पेक्षा जादा पैसे हे माजी सैनिकांना दिले गेले आहेत.

काँग्रेसने नौसेनेच्या झेंड्यात ब्रिटिशांचे चिन्ह कायम ठेवले होते. मोदीने हे इंग्रजांचे चिन्ह काढून तर टाकलेच, पण भारतीय आरमाराची उभारणी करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला झेंड्यावर स्थान दिले. आणि नौदलाची प्रेरणा आणि ऊर्जा वाढवली. मराठा साम्राज्यातील लोहगड व इतर काही गड किल्ले हे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत समाविष्ट करण्याला केंद्रातील सरकारने प्राधान्य दिलं आहे, असं मोदी यांनी सांगितलं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान हे जम्मू-काश्मीरला लागू नव्हतं. आमच्या सरकारने जम्मू कश्मीर मधील 370 कलम हटवलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान जम्मू-काश्मीरला लागू केले. यामुळे देशाच्या एकतेला बळ मिळाले. संविधानामुळे त्या राज्यातील दलित, ओबीसी, मागासवर्गीय यांना आरक्षणासह इतर अधिकार प्राप्त झाले. आरक्षणाचे गीत गाणाऱ्या काँग्रेस पक्षाने त्यांना या अधिकारापासून वंचित ठेवण्याचे काम 60 वर्ष केले , असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

केंद्र सरकार देशातील 80 कोटी लोकांना मोफत धान्य देत आहे. वीज पाणी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यापूर्वी मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण वाढवण्याची संधी तत्कालीन वाजपेयी सरकारला मिळाली होती. त्यानंतर मोदी सरकारला मिळाली आणि आम्ही हे आरक्षण पुढे वाढवलं. ओबीसी कमिशनला संविधानिक दर्जा दिला. मात्र धर्माच्या आधारावर संविधानानुसार आरक्षण देता येत नसताना कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या सरकारने मुस्लिम समाजाला ओबीसीचं आरक्षण देऊन टाकलं. हा फॉर्मुला काँग्रेसला संपूर्ण देशभर लागू करावयाचा आहे आणि त्यासाठी त्यांनाच संविधान बदलायचे आहे. मात्र मी जिवंत असेपर्यंत असे होऊ देणार नाही.

देशात केंद्र सरकारने आयुष्यमान भारत सारखी महत्त्वकांक्षी योजना राबवली आहे. आता सत्तर वर्षाच्या वरील व्यक्तींच्या औषधोपचाराचा खर्चही आयुष्यमान भारतच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आणि ही मोदीची गॅरंटी आहे. मोदीने निवडणुकीपूर्वी आजपर्यंत ज्या ज्या गॅरंटी दिल्या होत्या त्या त्या पूर्ण केल्या आहेत , आता दिलेल्या गॅरंटी ही मोदीच पूर्ण करणार आहे. तुमचं स्वप्न हा माझा संकल्प आहे , तो पूर्ण करण्यासाठी उदयनराजे भोसले यांना कमळाच्या चिन्हा समोरील बटन दाबून आजपर्यंतचे सर्व विक्रम तोडून सर्वाधिक मतांनी निवडून द्या, असे आवाहनही नरेंद्र मोदी यांनी केले.

इंडिया आघाडीचा अनुचित घटना घडवण्याचा डाव…

निवडणुका सुरू झाल्यानंतर विकासाचे मुद्दे नसल्याने इंडिया आघाडीच्या लोकांकडून सोशल मीडियावर माझ्यासह अमित शहा यांचे तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे, भाजपच्या मुख्यमंत्र्यांचे फेक व्हिडिओ तयार करून व्हायरल केले जात आहेत. त्यामध्ये आमचा आवाज काढून दुसराच आवाज डबिंग केला जात आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडेही आपण तक्रार देणार असून असे फेक व्हिडिओ आढळल्यास कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. या माध्यमातून त्यांचा सामाजिक तणाव निर्माण करून अनुचित घटना घडविण्याचा डाव सुरू आहे, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे केला.

महाभकास ऐवजी स्पेलिंग मिस्टेकमुळे महाविकास…

उमेदवार उदयनराजे भोसले म्हणाले , महाविकास आघाडीचे लोक अधोगतीच्या दिशेने निघाले आहेत. त्यांच्यात पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असावा याबाबत अद्याप एकमत झालेलं नाही, काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या नावात कुठेतरी स्पेलिंग मिस्टेक असावी , ही आघाडी महाभकास आघाडी आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला स्थिर सरकार मिळणार आहे. काँग्रेसने एवढी वर्ष सत्ता असताना शेती आणि पिण्याच्या प्रश्न पाण्याचे जिल्ह्यात सोडवले नाहीत. कृष्णा खोरे सारखी महत्त्वकांक्षी योजना आपण गोपीनाथ मुंडे यांना आग्रह केल्यामुळे सुरू झाली. पण त्यावेळी दुष्काळी भागात भाजपचा एकही आमदार खासदार नाही म्हणून ही योजना सुरू करायला मुंडे यांनी नकार दिला नाही. नमो गंगे प्रकल्पाप्रमाणे कृष्णा नदीच्या शुद्धीकरणासाठी ‘जय जय कृष्णे’ हा प्रकल्प सुरू करणार आहे. राजगड-रायगड-सातारा हे स्वराज्य सर्किट तयार करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असेही उदयनराजे यांनी सांगितले.

रामदास आठवलेंच्या कवितांना दाद…

“मोदींना द्यायचा आहे बळ तर
निवडून द्या उदयनराजेंचे कमळ”
अशी काव्यरचना करत रामदास आठवले यांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये केलेल्या भाषणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
“शशिकांत शिंदे निवडणुकीत उभे राहून फसले,
कारण निवडून येणार आहेत उदयनराजे भोसले |
शिंदेंची भानगड पाहून वाशीचे लोक हसले,
अन उदयनराजे लोकसभेत जाऊन बसले |” आठवलेंच्या या काव्यरचनेला जोरदार टाळ्या मिळाल्या.
मोदी जी का सबका साथ सबका विकास का नारा,
जाग रहा है सातारा, और बज रहा है राहुल गांधी का बारा” अशी वात्रटिका त्यांनी केली.

यावेळी ना. शंभूराजे देसाई, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार महेश शिंदे, प्रा. मच्छिंद्र सकटे आदींनी उदयनराजे भोसले यांना विजयी करण्याचे मतदारांना आवाहन केले. प्रारंभी उदयनराजे भोसले यांनी प्रभू श्रीरामचंद्रांची चांदीची मूर्ती भेट देऊन मोदी यांचा सत्कार केला. यावेळी पाच गड किल्ल्यावरून आणलेल्या मातीचा कलश भाजपकडून मोदींना भेट देण्यात आला

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close