कराडला विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा मोर्चा

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
४ डिसेंबर २०२३ पासून अंगणवाडी सेविका मदतनिस यांचा बेमुदत संप सुरू झाला आहे. त्या संपातील मागण्यांसाठी येथील तहसील कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून करण्यात आली. एसटी स्टँड मार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्या ठिकाणी कॉम्रेड आनंदी अवघडे व कॉम्रेड अनिता चव्हाण यांची भाषणे झाली. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देऊन जोरदार घोषणा देण्यात आल्या.
सरकारने लवकरात लवकर निर्णय करून सेविका, मदतनिस यांच्या मानधनात वाढ करावी, अशी मागणी करण्यात आली . अंगणवाडी सेविका, मदतनीस हे वैधानिक पद असून त्यांना मिळणारा मोबदला हे वेतनच आहे, असा औरंगाबाद खंडपीठाने निर्णय दिला आहे, त्याची अंमलबजावणी करावी. शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जानुसार सेविका व मिनीसेविकेला २६ हजार रुपये व मदतनीस यांना २० हजार रुपये अशी भरीव मानधन वाढ करावी, मासिक पेन्शन सुरू करावी, सेविका व मदतनिसांना वेतनश्रेणी सुरू करावी, ,ग्रॅज्युइटी देण्यात यावी. अंगणवाडी ही मराठी शाळेला जोडून शिक्षकांप्रमाणे पगार द्यावा, या मागण्या त्वरित मान्य कराव्यात, असे आनंदी अवघडे यांनी सांगितले. या मोर्चामध्ये सुरेखा शेवाळे, माया तडाके , रेखा पिसाळ, पुष्पा माने लतिका हुलवान, माया थोरात, सुनीता हरणे, जगूताई जाधव आदी पदाधिकाऱ्यांसह अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या.