मराठा आरक्षणासाठी जीवही गेला तरी मागे हटणार नाही
मनोज जरांगे - पाटील : जातीय दंगली घडवण्याचा काहींचा डाव

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
काहीही झालं तरी मराठ्यांच्या लेकरांना आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी माझा जीवही गेला तरी मागे हटणार नाही. आणि मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, असा शब्द मराठा क्रांती युद्ध मनोज जरांगे पाटील यांनी आज कराड येथे मध्यरात्री झालेल्या जाहीर सभेत दिला. दरम्यान, गाव पातळीवरचे ओबीसी समाज बांधव मराठा समाजात सोबत असून ते सुखदुःखात सहभागी होत असतात. असं असताना काही जण मराठा समाजाला उचकवून स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी जातीय दंगली घडविण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांचा तो डाव आहे, असा थेट आरोप मनोज जरांगे-पाटील यांनी ओबीसी नेत्यांचे नाव न घेता केला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कराड तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर शुक्रवारी रात्री सात वाजता आयोजित केलेली जाहीर सभा प्रत्यक्षात मनोज जरांगे पाटील यांच्या आगमनानंतर मध्यरात्री एकच्या सुमारास सुरू झाली. तोपर्यंत स्थानिक कार्यकर्ते आणि अंतरवाली सराटी येथून आलेले मराठा समाजाचे काही कार्यकर्ते, महिला भगिनी यांनी सभेचे मैदान गाजवले. हुडहुडणाऱ्या थंडीत ही मराठा समाज बांधव रात्री एक वाजेपर्यंत मनोज जरांगे पाटील यांची वाट पाहत छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये ठाण मांडून बसले होते. रात्री एकच्या सुमारास जरांगे पाटील यांचे सभास्थळी आगमन झाले. मंचावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून झाल्यानंतर प्रत्यक्ष सभेला सुरुवात झाली.
जरांगे पाटील म्हणाले,
कराड मधील या सभेला खूप उशीर झाला. पण मी तरी काय करणार. प्रत्येक गावागावात हजारो मराठी आज रस्त्यावर उभा आहेत. मी त्यांना तुमचं गाव दौऱ्यात नाही , असं म्हटलं तर ते गाडीच्या आडवं पडायला मागे पुढे बघेना झालेत आणि दहा मराठा जरी उभा दिसले तरी त्यांना डावलून पुढे जायची माझी पैदास नाही. आज तुम्ही या सभेला नाही आलात. कारण या सभेला मी सभा मानत नाही तुमच्या लेकरांच्या वेदना घेऊन आज तुम्ही इथे आला आहात. आत्तापर्यंत आपण आपल्या मराठा आरक्षणाची लढाई सत्तर टक्के जिंकली आहे, ३० टक्के बाकी आहे.
असं वारंवार म्हटलं जात होतं की पश्चिम महाराष्ट्रातील मराठा कधी एक होत नाहीत, पण आज कराड मधील सभेने एक रेकॉर्ड केले आणि तो समज मोडीत काढला. जो कोणी असं म्हणत असेल तर त्यांना कराड मधील ही सभा बघा असं सांगा. आज मराठा आरक्षणाच्या सभेसाठी विटा शहरान गाव बंद ठेवलं हे महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडलं.
मराठ्यांनी एकजूट दाखवली की पुरावे सापडू लागले..
आत्तापर्यंत मराठा आरक्षणाचा विषय आला की पुरावे सापडत नाहीत त्यामुळे मराठ्यांना आरक्षण देता येत नाही असं सांगितलं जात होतं. पण महाराष्ट्रातील मराठ्यांनी एकजूट केली आणि आपल्या एकजुटी पुढे सरकारला नंतर घ्यावं लागलं नेमलेली समिती काम करू लागली. १९६३ आणि त्यापूर्वीच्याही, सध्याच्या २०२३ पर्यंत पुरावे शोधण्याचे काम सुरू झालं. आता समितीला लाखोने पुरावे सापडायला लागले. याचा अर्थ मराठ्यांना पूर्वीपासूनच आरक्षण होतं पण त्याचे पुरावे कोणीतरी लपवून ठेवले होते. त्यामुळे ते सापडत नव्हते. आरक्षण जर पूर्वीच आम्हाला मिळाला असतं तर आज जगातली एक प्रगत जात म्हणून मराठा समाज पुढे आला असता.
कुणबी ही मराठ्यांची पोटजात नाही का?
१९६७ ला शासनाने एक निर्णय घेतला आणि व्यवसायाच्या आधारावर जाती निर्माण झाल्या आणि त्यांना आरक्षण वाटप झालं. हे आरक्षण व्यवसायाच्या आधारावरच वाटप झालं. मी उपोषणाला बसलो होतो तेंव्हा एक मंत्री आले मला म्हणाले , तुम्हाला कुणबी आरक्षण देता येत नाही’, मग मी त्यांना म्हटलं तुझी जात कशाच्या आधारे आरक्षणात गेली ते अगोदर सांग. विदर्भातील मराठ्यांना आरक्षण देताना कोणता निकष लावला गेला. पोट जातीच्या आधाराने आरक्षण दिलं गेलं असेल तर कुणबी ही मराठ्यांची पोट जात होत नाही का? असं मी म्हटलं. ते ऐकून माझ्याशी बोलायला आलेले नेते, अधिकारी जे गेले ते परत आले नाहीत.
मी दिसतो बँडमधील खुळखुळा वाजवणाऱ्यासारखा पण…
खरंतर माझ्या दिसण्यावर अनेक जण गेले आहेत. कारण मी दिसतोपण बँडमध्ये खुळखुळा वाजवायला असल्यासारखा. त्यामुळे आरक्षण मोडून काढणं सोपं आहे, मला सहज गुंडाळता येईल, असं अनेकांना वाटलं होतं. त्यासाठी बरेच डाव टाकून झाले, मात्र मी एकही यशस्वी होऊ दिला नाही. कारण हे आंदोलन मी कुठल्या समझोत्यासाठी नव्हे तर माझ्या जातीला आरक्षण मिळवून देण्यासाठी उभं केलं आहे.
…. मग तुम्हाला ज्यांचे झेंडे उचलायचे त्यांचे उचला!
आरक्षण नसल्याने एका एका टक्क्यासाठी आमच्या लेकरा मुलांचं आयुष्य उध्वस्त झालंय. मायबाप रात्रंदिवस कष्ट करत आहेत मुलगा शिकून मोठा अधिकारी होईल म्हणून. पण आरक्षण नसल्याने हजारोने आणि लाखोने आमची लेकरं बेकार पडली आहेत, असं सांगून जरांगे पाटील पुढे म्हणाले, मराठ्यांनी आरक्षण समजून घ्यायला खूप उशीर केला आहे. आरक्षण आपल्या हक्काचं आहे पण आपण राजकीय नेत्यांवर, त्यांच्या पक्षावर विश्वास ठेवला आणि त्यांनी स्वतःच हित पाहिलं. आरक्षणाच्या विरोधातली भूमिका घेतली. आपण राजकीय नेत्यांच्या पोराला सुद्धा भैया भैया म्हणून मोठं केलं. पण आज तेच पोरगं सात-आठ दिवस आपलं पोम्प्लेट चिकटवायला ये असं म्हटलं तर येतंय का बघा. म्हणून सांगतो अगोदर आपल्या लेकरांना आरक्षण मिळवून घेऊया मग तुम्हाला ज्यांचे झेंडे उचलायचे असतील त्यांचे उचला.
माझं पहिलं आंदोलन सुरू होतं त्यावेळी हैदराबाद निजामाच्या कडील नोंदीवरून आमच्या भागातील मराठ्यांना कुणबी नोंदीचे दाखले देण्याचं सरकारने आश्वासन देऊ केलं होतं. पण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र, कोकण , विदर्भ असा यामुळे भेदभाव होऊ शकतो हे आपण सरकारला ठणकावून सांगत सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्यावेत आणि ओबीसी मधून आरक्षण द्यावं असं सांगितलं. आता तर ज्यांचे पुरावे सापडले आहेत, त्यांना कुणबी दाखले मिळायला सुरुवात झाली आहे. मात्र ज्यांच्या नोंदी नाहीत पुरावे नाहीत त्यांनी ही घाबरून जायचं काही कारण नाही कारण त्याच अहवालाच्या आधारे कायद्यानुसार तुम्हाला कुणबी आरक्षण देण्यात येणार आहे.
दंगली घडवण्याचा काही जणांचा डाव….
मराठा समाजाचे आंदोलन शांततेत सुरू आहे. गेली दहा ते पंधरा दिवस मी गप्प होतो. कारण टप्प्यात आलं की आपण वाजवतो. लगेच कोणाच्या विरोधात जात नाही. पण मराठा आरक्षणाला जर कोण विरोध करत असेल तर मग तो मराठा असो की अन्य कोणी आपण त्याला सोडतच नाही. एकीकडे घटनात्मक पद घ्यायचं आणि दुसरीकडे त्याच्या विरोधी वर्तन करायचं असं त्यांचं काम सुरू आहे. आज तर खूप ओकलेत असं मला कळलं पण मी अजून बघितलेलं नाही , आज संध्याकाळी बघणार आणि मग उद्या कसा दणका असतो ते तुम्हाला कळलंच. तुम्ही सभा घ्यायच्या तर घ्या पण विनाकारण समाजात द्वेष निर्माण करू नका. काहींचा तर जातीय दंगली घडवण्याचा डाव दिसतो आहे. पण माझं मराठा तरुणांना आवाहन आहे की तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका त्यांचा डाव यशस्वी होऊ देऊ नका. त्यांनाही माझं सांगणं आहे की आमचा नाईलाज करू नका जशास तसे उत्तर देण्याची वेळ येऊ देऊ नका. तुम्ही किती आहे हे आम्हाला मोजायला वेळ नाही पण आम्ही पण ५२-५४ टक्के आहोत हे लक्षात घ्या, असं जरांगे पाटील यांनी सुनावलं.
किती पण ताकत लावा ओबीसीत जाणारच…
तुम्ही कितीही ताकद लावा पण शांततेच्या मार्गाने आंदोलन करूनच आम्ही ओबीसी मध्ये जाणार आहोत आणि आरक्षण घेणार आहोत. १९९० ला ओबीसींना आरक्षण फक्त १४ टक्के दिलं गेलं होतं नंतरच्या चार वर्षात ते आणखी १६ टक्के वाढ झालं, हे वाढीव आरक्षण मराठ्यांच्याच हक्काचं होतं. पण खैरात वाटल्यासारखं ते वाटलं गेलं. म्हणून सांगतो मराठा समाजाने आपली एकजूट कायम ठेवावी आणि आपली जात पण वाचवावी आणि आपल्या लेकरा बाळांचे भविष्यही घडवावे. तुम्हाला कोणीही कितीही उचकविण्याचा प्रयत्न केला तरी उचकवू नका, आत्महत्या करू नका, चुकीचे निर्णय घेऊ नका.
१ डिसेंबरपासून गावागावात साखळी उपोषण सुरू करायचं….
छगन भुजबळ यांनी पातळी सोडली आहे, त्यांना किंमत द्यायची गरज नाही, त्यांना व्यक्ती म्हणून विरोध नाही तर त्यांच्या विचारांना विरोध आहे, त्यांना मराठ्यांनीच मोठं केलं आहे, हे त्याने लक्षात घ्यावं असं सांगून जरांगे पाटील पुढे म्हणाले, १ डिसेंबर पासून गावागावात मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू करा. त्याचे निवेदन प्रशासनाला द्या. २४ डिसेंबर पर्यंत आपली कसोटी आहे. लेकरा बाळांचा आयुष्य घडवण्यासाठी आता आरक्षण मिळेपर्यंत पक्ष नको की नेता नको ही भूमिका ठेवा. सर्व नेत्यांना माझं आवाहन आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीमागे तुम्ही खंबीरपणे उभं राहा तसं तुम्ही केलं तर मराठी तुम्हाला डोक्यावर घेतील. पण नाही केलं तर आयुष्यभर तुमच्या डोक्याला गुलाल ही लागू देणार नाहीत, असा इशारा देऊन २४ डिसेंबर नंतर ही आरक्षण लागू केलं गेलं नाही तर मात्र समाजाला विश्वासात घेऊन पुढची दिशा ठरवू, असं ही जरांगे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.