कराडला आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा एकवटला
छ. शिवाजी महाराज स्टेडियमवर आतुरता मनोज जरांगे-पाटील यांच्या आगमनाची

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाज आज, शुक्रवारी रात्री येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर एकवटला आहे. सर्वत्र भगव्या टोप्या, भगवे झेंडे असे भगवेमय वातावरण तयार झाले आहे. ‘एक मराठा… लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं.. नाही कुणाच्या बापाचं’, ‘मनोज जरांगे पाटील साहेब, तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा परिसर दणाणून सोडत आहेत.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन , ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या जरांगे पाटील यांच्या आज दिवसभरात मायणी, विटा, इस्लामपूर, तसेच अन्य ठिकाणी सभा झाल्या आहेत. काही वेळातच त्यांची जाहीर सभा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर होणार आहे.
या सभेसाठी कराड तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी गेल्या काही दिवसांपासून मोठे परिश्रम घेतले आहे. त्यामुळे आजच्या मराठा आरक्षण सभेसाठी कराड शहरासह तालुक्यातील विविध भागातून, तसेच पाटण व अन्य तालुक्यातून मराठा बंधू-भगिनींचे जथेच्या जथे छत्रपती शिवाजी स्टेडियमवर दाखल होत आहेत. ‘एक मराठा लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचं’, ‘मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी कराड शहर दणाणून जात आहे.
नेत्रदीपक विद्युत रोषणाई, भव्य लाऊड स्पीकर सिस्टम
छत्रपती शिवाजी स्टेडियमवर या सभेसाठी नेत्रदीपक अशी रोषणाई करण्यात आली आहे. ठिकठिकाणी प्रकाशझोत टाकणारे दिवे बसविण्यात आले आहेत. उपस्थित सर्वांना ही सभा व्यवस्थित पहाता यावी यासाठी सभा स्थळावर अनेक एलसीडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. या सभेचे थेट प्रक्षेपण ही सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, सोबतीला स्वयंसेवक…
सभेच्या परिसरात विजय दिवस समारोह चौकापासून ते छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमपर्यंत ठीक ठिकाणी बॅरिगेट लावून पोलिसांनी बंदोबस्त सज्ज ठेवला आहे. सभेच्या ठिकाणी डी झोन करण्यात आला असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परिसरात दाखल होणाऱ्या प्रत्येक वाहनांची आणि सभास्थळी येणाऱ्या प्रत्येकाची पोलिसांकडून कसून तपासणी करण्यात येत आहे.
आतुरता आहे जरांगे-पाटील यांच्या आगमनाची….
छत्रपती शिवाजी स्टेडियमवर उपस्थित मराठा बांधवांचे डोळे क्रांती योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या आगमनाकडे लागले आहेत. काही वेळातच मनोज जरांगे पाटील स्टेडियमवर दाखल होणार आहेत. त्यापूर्वी मराठा संयोजकांकडून समाज बांधवांना शिस्तपालन संदर्भातल्या विविध सूचना लाऊड स्पीकर वरून देण्यात येत आहेत.