चांगभलं ऑनलाइन | पुणे
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने विशेष अधिवेशन घेऊन कायदा मंजूर करावा, अशी मागणी मनोज जरांगे-पाटील यांनी पुण्यातील राजगुरुनगर खेड येथे झालेल्या जाहीर सभेत केली. सरकारला 5000 पुरावे दिलेत असे देखील जरांगे यांनी सांगितलं.
गेल्या महिना-दीड महिन्यात 14 ते 15 मराठा बांधवांनी आत्महत्या केल्याचं सांगत यापूर्वी देखील मराठा आरक्षणासाठी आत्महत्या झाल्या. त्यांच्या कुटुंबांना मराठा समाज काही कमी पडू देणार नाही, असं जरांगे म्हणाले. मराठा समाजाचे दुःख आणि वेदना सहन होत नाही. त्यामुळे गावोगावी जाऊन मराठा माता भगिनींच्या आशीर्वाद घेत आहे, असं सांगून ते म्हणाले, मराठा आरक्षण आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू आहे. शांततेच्या मार्गाने मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं हा माझा शब्द आहे, त्यापासून आपण मागे हटणार नाही.
मी शेतकऱ्याचा मुलगा असून माझ्या समाजालाच मी आईबाप मानतो. त्यामुळे आपण समाजाशी गद्दारी करणार नाही. आपण मोर्चे खूप काढले सभा घेतल्या, पण घराघरातील लोकांनी आरक्षण समजून घेतलं नाही. त्यामुळे आरक्षण समजून घेणं त्याच्या मुळाशी जाणं महत्त्वाचं आहे, असं जरांगे म्हणाले.
कुणबी म्हणजे शेती करणारा
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावेत, या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. आपण कुणबी प्रमाणपत्राची मागणी केली आहे, मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का यावर काहीच उत्तर दिलं जात नाही, कुणबी याचा अर्थ शेती करणारा असं असल्याचंही जरांगे यांनी सांगितलं.
22 तारखेला काय करायचं ते सांगेन
२२ तारखेला सांगेन पुढं काय करायचं. त्याची सुरुवात २४ पासून होईल. पण तशी वेळ सरकार येऊ देणार नाही, असं वाटतंय. पण त्यापुर्वी उद्यापासून आपला तालुका, आपला विभाग, आपलं गाव पिंजून काढायचं. आरक्षण कशाला लागत प्रत्येक बांधवाला समजून सांगायचं. महत्त्वाचे म्हणजे कोणीही आत्महत्येसारखा मार्ग स्वीकारायचा नाही. ठोकाठोकी करायची पण शांततेच्या मार्गानं, असंही मनोज जरांगे यांनी सांगितलं.
त्या युवकाबरोबर चर्चा करणार….
मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या संदर्भातील पुढील दिशा मांडत असताना एका युवकाने मंचावर येऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, सभा संपल्यानंतर त्या युवकाशी चर्चा करणार असल्याचे जरांगे यांनी सांगितलं.