रसिकांच्या टाळ्या अन् शिट्ट्या घेऊन आपल्या राहुटीत परतणाऱ्या मंगलाताईंना त्या दिवशी डोळ्यात अश्रू घेऊन आपल्या राहुटीत परतावं लागलं! – changbhalanews
कलारंजन

रसिकांच्या टाळ्या अन् शिट्ट्या घेऊन आपल्या राहुटीत परतणाऱ्या मंगलाताईंना त्या दिवशी डोळ्यात अश्रू घेऊन आपल्या राहुटीत परतावं लागलं!

चांगभलं ऑनलाइन | अरुण खरात

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे गावचा शनिवारचा आठवडे बाजार…… आपला धंदा चांगला होईल या आशेने महाराष्ट्रातील नावाजलेला मंगला बनसोडे सह नितीन बनसोडे यांचा तमाशा आशेनं आलेला….. चार-पाच दिवसांपूर्वीच स्थानिक ग्रामपंचायत , पोलीस स्टेशन, जागा मालक यांची परवानगी काढलेली…… सगळ्या गावात वाड्या वस्त्यावरती पोस्टर लावली जातात…. शनिवारी सकाळीच शंभर किलोमीटर अंतराचा प्रवास करून तमाशाच्या गाड्या ठरलेल्या जागेवरती येऊन थांबतात…. सकाळपासूनच जागेची साफसफाई करणे, राहुटी उभी करणे, गेट उभे करणे, तंबू उभा करणे , स्वयंपाक बनवणे यासाठी कामगारांची लगबग सुरू होते….. कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी सकाळीच प्रचाराची गाडी गावच्या बाजारात व आजूबाजूच्या गाव खेड्यावरती पाठवली जाते…. तमाशाची अलाउन्सींग करणारा आपल्या ढंगात बाजारात व आजूबाजूच्या गाव खेड्यात जाऊन ” व्हो पावनं, व्हो टोपीवालं , व्हो धोतरावालं , व्हो पॅन्टवालं पावनं…व्हो ताई माई अक्का… विचार करा पक्का.. रातच्याला राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे सह नितिनकुमार बनसोडे लोकनाट्य तमाशाला यायचं बरका… सर्वांसाठी तिकीट दर फक्त शंभर रुपये.. शंभर रुपये… शंभर रुपये… आजचा एकच खेळ आणि एकच मुक्काम उद्या कंपनी पुढील दौऱ्यावर जात आहे….. असा प्रचार करत करत छोटी मोठी दहा-बारा गाव खेडेत प्रचाराची गाडी फिरून संध्याकाळी माघारी येते…. संध्याकाळी तमाशाची कनात बांधल्या जाते… वगनाट्याची तयारी म्हणून रंगमंचाच्या बाजूला भव्य दिव्य चंद्रयानची प्रतिकृती उभारल्या जाते…अंधार पडू लागताच जनरेटर चालू करून रंगीबेरंगीसह सर्व लायटिंग लावण्यात येते… ह्या लाइटिंगच्या झगमगाटात गलिच्छ हागणदारी व शेजारील भितीदायक वाटणाऱ्या स्मशानभूमीचेही रूपडे पालटते….श्री गणेशाच्या आरतीने लाऊडस्पिकर चालू होतो…. काही कलाकार आपापल्या पेटी समोर मेकअपसाठी बसतात… काही मेकअप करून कार्यक्रमासाठी तयार आहेत… काही नृत्यांगना पायात चाळ बांधण्यात व्यस्त आहेत…..

नितीनदादांना ‘शो कॅन्सल’ झाल्याची घोषणा करावी लागली…

आता वेळ आली होती तिकीट बुकिंग चालू करण्याची परंतु चिंतेची बाब म्हणजे अजूनही तमाशाच्या गेट वरती पाहिजे तेवढी पब्लिक दिसत नव्हती. रात्रीचे साडेनऊ वाजले तरीही फक्त दिडशे दोनशेच लोकच जमलेली…! सर्वांनी ठरवले की दहा वाजेपर्यंत वाट बघूया मात्र दहा वाजता होती त्यातलीही बरीचशी पब्लिक गायब झाली. मग मंगलताईंनी निर्णय घेतला की ‘आता तिकीट बुकिंग चालू करू नका आता पब्लिक येणे शक्य नाही आणि एवढ्या पब्लिक मध्ये आपल्याला शो करणे परवडणार नाही….’ काही वेळानंतर मोठ्या कष्टाने नितीनदादांना ‘शो कॅन्सल’ झाल्याची घोषणा करावी लागली.

पब्लिकची मदत मंगलाताईंनी नम्रपणे नाकारली!

तमाशा रद्दची घोषणा ऐकताच थांबलेली पब्लिक चिडलं….. आम्ही तिकीट काढतो परंतु तमाशा चालू करा…. परंतु एवढ्या कमी पब्लिकसाठी सर्व यंत्रणा राबवणे परवडणारे नव्हते. थांबलेल्या पब्लिकला हे सर्व समजून सांगताना नाकीनऊ आले. मंगलाताई या राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या तमाशा सम्राज्ञी आहेत. ज्यांनी अनेक शाळा, मंदिर यासाठी मोफत कार्यक्रम केलेले आहेत. कोल्हापूर सांगलीच्या पूरग्रस्तांना अन्नधान्य, फूड पॉकेट व कपड्यांची मदत केलेली आहे. अशा मंगलताईंना उपस्थित पब्लिकमधील काही लोकांनी कोणी शंभर रुपये , कोणी पन्नास रुपये मदत म्हणून देऊ लागले, मात्र मंगलताईंनी ह्या गरीब , कष्टकरी रसिकांच्या मदतीला नम्रपणे नकार दिला.

टाळ्या व शिट्ट्या घेऊन आपल्या राहुटीत परतणाऱ्या मंगलाताईंना आज डोळ्यात अश्रू घेऊन राहुटीत परतावे लागले!

सर्व प्रकार मी प्रत्यक्ष बघितला आणि लागलीच गावचे माजी उपसरपंच केशवराव होन यांना फोन करून सर्व परिस्थिती सांगितली. ते लगेचच तेथे आले तेव्हा मंगलाताई बनसोडे व नितीन कुमार बनसोडे यांचा मी व केशवराव होन यांनी शाल, श्रीफळ देऊन आपल्या गावात आलेल्या ह्या कलाकार पाहुण्यांचा सत्कार केला व त्यांना मदत म्हणून पाच हजार रुपये दिले…..ती रक्कम मंगलताई घेत नव्हत्या…त्या म्हणाल्या की ” मी तुमच्या गावात कार्यक्रमच केला नाही तर मला हि रक्कम नको आहे ..” परंतु मी व केशवराव होन यांनी आमच्या गावच्यावतीने आजचा तुमचा जेवणाचा खर्च भागविण्यासाठी ह्या तुटपुंज्या रक्कमेचा स्विकार करा , अशी विनंती केली. तेंव्हा मंगलाताईंनी ही रक्कम स्विकारली. ज्या तमाशा मंडळाचा दररोजचा खर्च पन्नास साठ हजार रुपये आहे तिथे ही पाच हजार रुपयेची मदत अगदी किरकोळ. परंतु ही मदत स्वीकारताना तमाशा सम्राज्ञी मंगलाताईंना गहिवरून आले. डबडबलेल्या डोळ्यातील अश्रू पुसत त्या म्हणाल्या की “गाव गाव असे दर्दी लोक आहेत म्हणून हि तमाशा लोककला व कलावंत टिकून आहेत नाहीतर ह्या डिजिटल जमान्यात हि लोककला नामशेष व्हायला वेळ लागणार नाही… “ मंगलताईंनी माझे व केशवराव होन यांचे आभार मानले. आजच्या ओढवलेल्या प्रसंगामुळे व लोककलेच्या भविष्यातील चिंतेमुळे आपल्या डोळ्यात आलेले अश्रू पुसत त्या आपल्या राहुटीत निघून गेल्या. स्टेजवर आपले नृत्य व गायनाचे सादरीकरण करून रसिक प्रेक्षकांच्या टाळ्या व शिट्ट्या घेऊन आपल्या राहुटीत परतणाऱ्या मंगलाताईंना आज डोळ्यात अश्रू घेऊन आपल्या राहुटीत परतावे लागले , हा प्रसंग मनाला वेदना देणारा आहे..!

…कारणं अनेक त्यात सरकारी उदासीनतेची भर!

त्यामुळे यापुढे या लोककलावंतांचे अश्रू पुसण्यासाठी तमाशा रसिकांना पुढाकार घ्यावा लागेल. ‘चवली पावलीत चालणारा तमाशा लाखात गेला व आज हा लाखातला तमाशा परत चवली पावलीवर आलाय काय ?’असा प्रश्न आज निर्माण झाला आहे. आणि ही गोष्ट खरीच आहे की पूर्वी तालुक्याच्या, गाव खेड्याच्या बाजाराच्या दिवशी तमाशाला तुफान गर्दी असायची. आता ती परिस्थिती राहिली नाही. तमाशाचे तिकटावर चालणारे खेळ आता संपले आहेत. आता फक्त यात्रा कमिटीने बिदागी देऊन गावात यात्रेनिमित्त आणलेल्या मोफत तमाशालाच गर्दी राहते. त्यातही ऑर्केस्ट्रा, डिजे लावणी शो, रेकॉर्ड डान्स यांनी शिरकाव केला आहे. त्यामुळे बऱ्याचशा यात्रेच्या सुपाऱ्या ह्याच लोकांना जातात. तमाशाचा खास प्रेक्षक वर्ग असणारा गाव खेड्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांनीही तमाशाकडे पाठ फिरवली आहे. करमणुकीची वेगवेगळी साधनं उपलब्ध झाल्यामुळे हा सर्व परिणाम झाला आहे. त्यातही सरकारची तमाशा कलावंता विषयी वेळोवेळी उदासीनता हे महत्वाचे कारण दिसून येते. नाटक व सिनेमा निर्मिती साठी निर्मात्यांना सरकार जी मदत करते ती मदत तमाशा कलावंतांना सरकार करत नाही.

दररोज कुठं ना कुठं अशा गोष्टींचा लहान मोठ्या तमाशा फडांना सामना करावा लागतो…!

आज रोजी महाराष्ट्रा मध्ये जे काही नावाजलेले तमाशा फड आहेत त्यात अग्रभागी मंगला बनसोडे सह नितीन कुमार बनसोडे यांच्या लोकनाट्य तमाशा फडाचे नाव आहे. एवढ्या मोठ्या तमाशा फडाला रसिक प्रेक्षक नसल्यामुळे तमाशाचा कार्यक्रम रद्द करावा लागतो. मग छोट्या छोट्या तमाशा फडाची काय परिस्थिती असेल..! दररोज कुठे ना कुठे … कुठल्या तरी तमाशा फडाला या गोष्टीचा सामना करावाच लागतो. यात कुठल्याही तमाशा फड मालकाने माझा धंदा चांगला आहे हा बेगडी मोठेपणा सांगू नये. महाराष्ट्रात तमाशाची काय परिस्थिती आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. तमाशा सावकारांच्या जीवावर तग धरून आहे. परंतू तमाशा फडाचा खेळ चालू असो किंवा बंद असो सावकाराकडून घेतलेल्या कर्जाचे व्याज हे चालूच राहते. तमाशात पुरुष कलावंत, महिला कलावंत, बिगारी, वाहन चालक, साऊंड सिस्टिम वाला, जनरेटर वाला, लाइटिंग वाला, स्वयंपाकी, मॅनेजर असे सर्व मिळून सव्वाशे – दीडशे लोकांचा संच असतो. या सर्व लोकांचा दररोजचा जेवणाचा खर्च, गाड्यांचे डिझेल, कलाकारांना दररोज दिला जाणारा भत्ता. दररोज पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत यांच्या परवानगीसाठी लागणारा खर्च जागा मालकाचे भाडे याचा सर्व हिशोब केल्यास तो खर्च 50 ते 60 हजारात दररोजचा जातो. साधारण दसरा सणाच्या आसपास सर्वच तमाशा पार्ट्या दौऱ्यासाठी बाहेर पडतात. चैत्र महिन्यापर्यंत थोड्याफार प्रमाणात गावकऱ्यांकडून यात्रा जत्रांच्या ओपन शोच्या सुपार्‍या भेटतात मात्र संपूर्ण चैत्र महिना हा तमाशाचा हंगाम असतो कारण चैत्र महिन्यात गाव खेडयांच्या यात्रा खूप मोठ्या प्रमाणात असतात. त्यातही गौतमी पाटील, हिंदवी पाटील, राधा पाटील यांनी डीजे शोचा नवीनच प्रकार आणला आहे. तरुण प्रेक्षक वर्ग तिकडे जास्त आकर्षित होतो आहे.

… नाहीतर मातीत बसल्यावरही यथेच्छ करमणूक करणारा तमाशा याच महाराष्ट्राच्या मातीत जायला वेळ लागणार नाही!

महाराष्ट्राचा तमाशा लोककला प्रकार टिकवायचा असेल तर तमाशा फडाला मिळणारी पॅकेज चालू करण्यात यावे, कार्यक्रमाचा महिन्याचा पोलीस परवाना मिळावा, तमाशा गाड्यांना टोल नाका व डिझेल सवलत मिळावी, राष्ट्रीयकृत बँकांकडून शासनाच्या हमीवर विनातारण कर्ज उपलब्ध करून द्यावे, शासनाच्या वतीने तमाशा कलावंतांना विमा संरक्षण द्यावे.तमाशासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे , वयोवृद्ध कलावंतांच्या मानधनात वाढ करावी, कलावंतांना घरकुल योजनेत प्राधान्य द्यावे ह्या तमाशा कलावंतांच्या मागण्या मान्य झाल्या तरच तमाशा टिकेल नाहीतर….जो तमाशा गावच्या मातीत बसून बघायला मज्जा यायची , तोच महाराष्ट्राच्या मातीतला तमाशा मातीत जायला वेळ लागणार नाही…काय सरकार याची वाट बघतेय काय ?

मायबाप सरकार, लक्षात घ्या तमाशाच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आलाय!

ही घटना घडून एक दिड महिना झाला परंतु पुन्हा काल आमच्याच गावच्या जवळ ह्याच तमाशा मंडळाच्या गाड्या थांबलेल्या आहेत असे मित्रांनी सांगितले. मी कामानिमित्त बाहेरगावी होतो तरीही मंगल ताई व नितीन दादांना भेटण्याच्या ओढीने मी गावी येऊन मंगलाताई व नितीन दादांना भेटून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की आज कार्यक्रम नसल्यामुळे विश्रांतीसाठी थांबलो आहे. ज्या तमाशा फडाच्या गाड्याही कधी रस्त्याने दिसत नव्हत्या, ज्या तमाशा फडाला एकही दिवस विश्रांती नव्हती. त्याच एवढ्या मोठ्या तमाशा फडाला पब्लिक नसल्यामुळे कार्यक्रम रद्द करावा लागतो व कार्यक्रम नसल्यामुळे विश्रांतीसाठी कुठेतरी रस्त्याच्या कडेला थांबावं लागतं हे खूपच भयानक आहे. ह्या घटनेमुळे व दोन दिवसांपूर्वी 16 फेब्रुवारी 2024 रोजी शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यातील लोककलावंतांच्या अनेक पथकांना अनुदान पॅकेज जाहीर झाले त्यात खडीगंमत , संगीत बारी , दशावतार , व शाहिरी कलापथके यांना अनुदान जाहीर झाले हरकत नाही आनंद आहे परंतु यात तमाशा फडांना डावलण्यात आले याचे दुःख आहे. सन 2008 पासून सुरूवात झालेल्या अनुदान पॅकेज मध्ये तमाशा फडांचा सहभाग होता परंतु आता का टाळले हे समजले नाही. शासनाच्यावतीने तमाशा लोककलेच्या जतन, संवर्धन आणि संगोपनासाठी कुठलेही प्रयत्न होतांना दिसत नाही एकंदरीत सर्व परीस्थिती बघता सध्या तमाशाच्या अस्तित्वाचा प्रश्न नक्कीच ऐरणीवर आला आहे…..
अरुण खरात
चांदेकसारे, कोपरगाव
मो. 9960838433

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close