चांगभलं ऑनलाइन | नवी दिल्ली
महाराष्ट्रातील महायुतीच्या जागावाटपाची बोलणी (Maharashtra Mahayuti Seat Sharing) अंतिम टप्प्यात आहेत. महायुतीचा भाग बनलेल्या अजित पवार गटाला (Ajit Pawar) एक 3 ते 4 जागा मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.
या चर्चेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला 11 ते 12 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिंदे गटाच्या ज्या खासदारांना तिकीट मिळणार नाही त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे समजते. ही महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी झाली असून लवकरच ती अधिकृत रित्या जाहीर करण्यात येणार आहे.
भाजप मुंबईत (Mumbai ) लढणार…
भाजपने मुंबईवर लक्ष केंद्रित केले आहे. मुंबईत भाजपकडून जास्तीत जास्त जागा लढविल्या जाणार आहेत. त्यासाठी शिंदे गटाने मुंबईतील एक जागा भाजपला सोडण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र ठाणे (Thane ) आणि कल्याणची (Kalyan) जागा आपल्या गटाकडे राहावी यावर शिंदे गट ठाम आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून जागावाटपाचा प्रस्ताव सादर करण्यात आल्यानंतर ठाण्याच्या जागेवर भाजपने दावा केला होता. मात्र एकनाथ शिंदे यांच्या वाट्याची मुंबईतील एक जागा त्यांनी भाजपला सोडण्याची तयारी दाखवली.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक अंकी जागा
अजित पवारांनी अमित शाह यांच्यासमोर जागावाटपाचा प्रस्ताव सादर करताना शिंदे गटाला जितक्या जागा दिल्या जाणार आहेत, तेवढ्याच आम्हाला द्याव्यात अशी मागणी त्यांनी केली होती. पण गत लोकसभा निवडणुकीतील जागांचा विचार करून अजित पवारांना 3 ते 4 जागा दिल्या जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
तिकीट न मिळालेल्यांचं शिंदे गट पुनर्वसन करणार
शिवसेना शिंदे गटाच्या ज्या खासदारांचे तिकीट कापले जाणार आहे, त्या खासदारांना विधानपरिषद किंवा विधानसभेवर संधी दिली जाणार असल्याची माहिती शिंदे गटातून पुढे येत आहे.
महाराष्ट्रात भाजप लढवणार सर्वाधिक जागा…
राज्यातील महायुतीच्या जागावाटपाच्या सुरू असलेल्या चर्चेनुसार लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप सर्वाधिक जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. त्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि त्या खालोखाल अजित पवार यांचा राष्ट्रवादी जागा लढवणार आहे.
भाजपच्या डझनभर खासदारांचं वाढलं टेन्शन…
भाजपच्या नेतृत्वाकडून राज्यातील खासदारांचे अंतर्गत तीन सर्व्हे करण्यात आले आहेत . त्यामध्ये डझनभर खासदारांचे काम समाधान कारक नसल्याची माहिती पुढे आली आहे, त्यामुळे या खासदारांच तिकीट कापलं जाऊ शकतं असं वृत्त महाराष्ट्रातील एका आघाडीच्या मराठी वृत्तवाहिनीने दिलं आहे.
या वृत्तानुसार, भाजपच्या सर्व्हेमधून डझनभर विद्यमान खासदारांची कामगिरी समाधानकारक नसल्याची बाब पुढे आली आहे. या खासदारांबाबत लोकांमध्ये नाराजी असल्याचं सर्वे मधून स्पष्ट झालं आहे. शिवाय 3 पेक्षा अधिक वेळा निवडून आलेल्या काहींच्या तिकीटावर आक्षेप घेतले गेले आहेत. बीड, धुळे, सोलापूर, सांगली, लातूर, जळगाव, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, नांदेड, अहमदनगर, वर्धा, रावेर या जागांवर आक्षेप असल्याचं वृत्त या वृत्तवाहिनीने दिलं आहे. त्यामुळे या जागावरील विद्यमान खासदारांचा पत्ता होऊ शकतो आणि नवीन उमेदवारांना संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा राज्यात सुरू आहे.