महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माती व हवामान तज्ञांनी शेतकऱ्यांना दिला ‘हा ‘ महत्त्वाचा सल्ला
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
वृक्षतोड, वाढती वाहने व अन्य घटकांच्या माध्यमातून उत्सर्जित होणाऱ्या कार्बनचे हवेतील वाढते प्रमाण आणि प्रदूषण आदींमुळे हवामानात मोठा बदल होत आहे. त्यामुळे दुष्काळ आणि अतिवृष्टी हे हवामान बदलाचे दोन मोठे विभिन्न परिणाम दिसत असून शेतीक्षेत्रावर याचा मोठा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे पर्जन्यमनातही अनिश्चितता दिसून येत असल्याने हवामान बदलानुसार शेतकऱ्यांनी शेती व्यवस्थापनातही आवश्यक बदल करायला हवा, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माती विभागप्रमुख व ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी केले.
य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना पुरस्कृत कराड येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर आयोजित कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवातील कृषी चर्चासत्रात ‘हवामान बदल व शेती व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. अशोक फरांदे होते. कृष्णा कृषी परिषदेचे अध्यक्ष गजेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. साबळे म्हणाले, हवामान बदलामुळे एकीकडे दुष्काळ, तर दुसरीकडे अतिवृष्टी अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येते. यामुळे उघड्यावर असलेल्या शेती क्षेत्रावर व पिकांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत आहे. मान्सून नैसर्गिक संपत्ती असून भारताची अर्थव्यवस्था ही मान्सूनवरच अवलंबून आहे. महागाई, वीज निर्मिती, अन्न सुरक्षितता, भारतीय अर्थव्यवस्था ही मान्सूनवरच अवलंबून आहे. ८८९ मिलिमीटर इतकी भारतातील मान्सूनची क्षमता असल्याचे सांगत एल नीनो आणि ला नीनाचा प्रभाव मान्सूनवर कसा पडतो, याचे सविस्तर विवेचनही त्यांनी यावेळी केले.
ते म्हणाले, शेतकऱ्यांनी मान्सूनचा चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. पीक पद्धतीत हवामान अंदाजानुसार बदल करायला हवा. यासाठी मान्सूनचा अंदाज अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो. शेतकऱ्यांनी स्थानिक हवामान अंदाजही घ्यायला हवा. तसेच शेतकऱ्यांसाठी अचूक हवामान अंदाज देणारी एखादी वाहिनी सरकारने उपलब्ध करून द्यायला हवी. अमेरिकन सरकारने ३० वर्षांपूर्वीच ही सुविधा तेथील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. हल्ली कोणीही हवामान अंदाज व्यक्त करतो, हा शेतकऱ्यांच्या जीवाशी चाललेला खेळ असल्याचे त्यांनी सांगितले.
दुसऱ्या सत्रात डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन प्रकल्प (आत्मा), सातारचे संचालक फिरोज शेख हे ‘सेंद्रिय शेती’ विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले, सेंद्रिय शेती ही काळाची गरज बनली आहे. वाढते प्रदूषण, रासायनिक खतांचा वारेमाप वापर, जमिनीचा खालावणारा पोत आदींमुळे शेती संकटात सापडली आहे. रासायनिक खतांमुळे उत्पादन वाढले. मात्र, त्यामुळे विविध आजार उद्भवू लागले आहेत. मानवी आरोग्य आणि शेतीचे आरोग्य सुधारण्यासाठी सेंद्रिय शेती हाच मार्ग अवलंबायला हवा.
दरम्यान, कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या शेती स्पर्धेत भाग घेतलेल्या प्रगतशील शेतकऱ्यांना कृष्णा कृषी परिषदेचे अध्यक्ष गजेंद्र पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी शेतकरी व कृषी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.