कॉम्रेडस’मध्ये उंचावली महाराष्ट्राची शान – मत्स्य उद्योजक कृष्णा गोसावी यांचा जागतिक पराक्रम!”

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
डोंगरदऱ्यांच्या रानवाटा… 90 किमीचा थरार.. अन् काळजाला हात घालणारी जिद्द… हे चित्र होते दक्षिण आफ्रिकेतील ‘कॉम्रेडस अल्ट्रा मॅरेथॉन 2025’चे! आणि या जागतिक स्पर्धेच्या गगनभरारीत उंचावले कराड तालुक्यातील कोळेवाडी गावाचे आणि महाराष्ट्राचे नाव — श्री कृष्णा यशवंत गोसावी यांनी!
कोळेवाडीच्या या सुपुत्राने F10425 या क्रमांकाने धावत “The Ultimate Human Race” या बिरुदाची खरीखुरी व्याख्या साकार करून दाखवली. अवघ्या 10 तास 32 मिनिटांत 90 किमीचे अंतर पार करत त्यांनी ‘कॉम्रेडस मॅरेथॉन’ स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली आणि जागतिक स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला.
कृष्णा गोसावी हे केवळ यशस्वी मत्स्य उद्योजकच नाहीत, तर समाजासाठी झिजणारे, नवतरुणांना प्रेरणा देणारे आणि मातीशी नाळ जपणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या या यशाबद्दल कोळेवाडी, शिंदेवाडीसह संपूर्ण सातारा जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांची ही कामगिरी गावाच्या ‘नव्या इतिहासात भर घालणारी’ ठरली आहे.
दक्षिण आफ्रिकेतील ‘कॉम्रेडस मॅरेथॉन’ ही जगातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठेची अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा मानली जाते. 1921 मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा यंदा आपल्या 98व्या पर्वात होती.
या जागतिक स्तरावरील कठीणतम शर्यतीत कोळेवाडीचे सुपुत्र व मुंबईस्थित मत्स्य उद्योजक कृष्णा यशवंत गोसावी, तसेच कराडच्या महाजन हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. सी. व्ही. महाजन, डॉ. शैलेश पाटील आणि संदीप पाटील या अल्ट्रा रनर यांनी अभिमानास्पद सहभाग नोंदवला.
या वर्षीच्या स्पर्धेत ८० पेक्षा अधिक देशांतील सुमारे २४,००० धावपटूंनी सहभाग घेतला होता, ज्यामध्ये ४१५ भारतीय धावपटूंचा समावेश होता. यातील तब्बल १६० पेक्षा अधिक धावपटू महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत होते.
८ जून, रविवार रोजी पहाटे ५:३० वाजता सुरू झालेली ही थरारक शर्यत पीटरमारिट्झबर्ग येथून सुरू होऊन डर्बन येथे संपली. स्पर्धकांना १२ तासांच्या आत ९० किलोमीटरचे आव्हान पेलावे लागते, आणि हे आव्हान पूर्ण करणे हेच या स्पर्धेचे वैशिष्ट्य!
या अत्यंत खडतर चढ-उतारांनी भरलेल्या रस्त्यांवरून धावत, कृष्णा गोसावी यांनी १० तास ३२ मिनिटांत ही धाव पूर्ण केली व जागतिक स्तरावर आपली कामगिरी सिद्ध केली. त्यांच्या यशाबरोबरच डॉ. महाजन, डॉ. पाटील आणि संदीप पाटील यांनी देखील यशस्वीपणे ही स्पर्धा पूर्ण करत कराड आणि महाराष्ट्राचा झेंडा उंचावला.
“कृष्णा गोसावी यांचे हे केवळ धावणे नाही, तर स्वप्नांना साकार करणारी झेप आहे!”– स्थानिक ग्रामस्थ