अनधिकृत फ्लेक्स काढल्याने लोणंद शहराने घेतला मोकळा श्वास
लोणंद प्रतिनिधी | गणेश भंडलकर
लोणंद शहराच्या विद्रूपीकरणात भर घालत असणारे मुख्य रस्त्यावर तसेच चौकाचौकात लावलेले फ्लेक्स बोर्ड नगरपंचायतीकडून काढण्यात आल्याने शहराने एकदाचा मोकळा श्वास घेतला आहे.
गेले अनेक वर्षांपासून लोणंद शहरात ठिकठिकाणी चौकाचौकात दादा, भाऊ, मामा, साहेब, काका, आबा, अण्णा अशा नावांनी ओळख असणाऱ्यांचा वाढदिवस असो किंवा महापुरुषांच्या जयंत्या असो; या साजऱ्या करताना महापुरुषांच्या , पुढाऱ्यांच्या फोटो शेजारी स्थानिक कार्यकर्त्यांचे डझनाहून अधिक फोटो फ्लेक्सवर छापून चमकोगीरी करणारांमुळे शहराच्या विद्रूपीकरणात सातत्याने भर पडत होती. मात्र लोणंद नगरपंचायतीचे मुख्याधीकारी दत्तात्रय गायकवाड यांच्या सूचनेवरून आरोग्य विभागाचे रामदास तुपे यांच्या नेतृत्वातील पथकाने शहरातील सर्व फ्लेक्स काढून शहर फ्लेक्स मुक्त केले.
लोणंद शहरातील नगरपंचायत चौक, बसस्थानक परिसर, शास्त्री चौक, बाजारतळ, सातारा-लोणंद रोड, खंडाळा रोड अशा सर्वच ठिकाणी फ्लेक्स लावलेले होते. नगरपंचायतीकडून अशा सर्वच ठिकाणचे फ्लेक्स काढण्यात आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून….
राज्यात मराठा आरक्षणाचे वातावरण सध्या चांगलेच तापलेले आहे. या आंदोलनांच्या दरम्यान अनेक ठिकाणी फ्लेक्सवर फोटो असलेल्या मोठ्या नेत्यांच्या चेहर्यावर काळे फासण्याचा प्रयत्न आंदोलकांकडून करण्यात आल्याच्या घटना ताज्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून लोणंद शहरातील सर्व फ्लेक्स घाईगडबडीत काढण्याचा आदेश देण्यात आला असावा अशी शक्यता लोणंदकर नागरिक व्यक्त करत आहेत.