संगीतबारीला वेगळं करा! लोकनाट्य तमाशाच्या बदनामीविरोधात आझाद मैदानावर ढोलकी-हलगीसह तमाशा कलावंत करणार आंदोलन

मुंबई, दि. १८ | चांगभलं वृत्तसेवा
लोकनाट्य तमाशा आणि तथाकथित संगीतबारी या कलाप्रकारांमधील गोंधळामुळे तमाशा कलावंतांची सातत्याने बदनामी होत असल्याचा आरोप करत अखिल भारतीय लोककलावंत मराठी तमाशा परिषद या संघटनेने राज्य सरकारकडे गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली आहे.
परिषदेने दिलेल्या निवेदनात, संगीत बारीच्या नावातून ‘तमाशा’, ‘लोकनाटय’ हे शब्द वगळावेत, हा बदल त्वरित न झाल्यास २४ सप्टेंबर २०२५ पासून अध्यक्ष संभाजीराजे जाधव यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा तमाशा फड मालक आणि तमाशा कलावंतांकडून देण्यात आला आहे.
परिषदेकडून सांगण्यात आले की, काही बंदिस्त थिएटर मालकांनी त्यांच्या बोर्डांवर ‘लोकनाट्य तमाशा कला केंद्र’ असा उल्लेख करून ‘संगीतबारी’ प्रकार चालवले आहेत. यामुळे प्रत्यक्ष महाराष्ट्राची लोककला संबोधल्या जाणाऱ्या ‘लोकनाट्य तमाशा’ क्षेत्रातील स्त्री व पुरुष कलावंत आणि त्यांच्या कुटुंबांची समाजामध्ये बदनामी होत आहे. पत्रकारितेमध्ये ‘लोकनाट्य तमाशा’ व ‘संगीतबारी’ या मधील फरक न समजल्याने प्रसार माध्यमामधून लोकनाट्य तमाशाबद्दल चुकीची प्रतिमा तयार होत असून, लोकांचा दृष्टीकोनही कलावंतांविषयी विपरीत होत चालला आहे.
तमाशा परिषदेच्या प्रमुख मागण्या :
१) ‘संगीत बारी’ किंवा ‘कला केंद्र’ या प्रकारांना देण्यात आलेल्या ‘लोकनाट्य तमाशा’ नावामध्ये बदल करुन ‘संगीतबारी कला केंद्र’ या नावाने स्वतंत्र उल्लेख करावा.
२) लोककला अनुदान पॅकेज नव्याने सुरू करावे.
३) तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांचे स्मारक उभारण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा.
४) इंदिरा आवास घरकुल योजनेत तमाशा कलावंतांसाठी २% जागा राखीव ठेवावी.
५) आदिवासी विभागातील संगीत रजनी-भजनी मंडळांना अनुदान पॅकेज सुरू करावे.
या संदर्भातील निवेदन याआधीही सांस्कृतिक मंत्री, प्रधान सचिव व सांस्कृतिक संचालक कार्यालयाला वारंवार पाठविण्यात आले होते. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय परिषदेकडून घेण्यात आला आहे.
उपोषणस्थळी ढोलकी, हलगी, टाळ, तुणतुणे यांच्या गजरात आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
आंदोलनात यांचा सहभाग राहणार…
या आंदोलनात अखिल भारतीय लोककलावंत मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव यांच्यासह शेषराव गोपाळ, मोहित नारायणगांवकर, वसंतराव नांदवळकर, आनंद भिसे-पाटील, अविष्कार मुळे, किरण ढवळपुरीकर, मयूर महाजन, ईश्वरबापू पिंपरीकर, सुनिल वाडेकर, तानाजी भोसले, राजे काशिद, रेखा पाटील, बस्तीराम नाईक, रेखा चव्हाण, हसन शेख, सविता पुणेकर, राजू देवठाणकर तसेच राज्यभरातील तमाशा फड मालक, चालक व कलावंत सहभागी होणार आहेत.