“रास्ता रोकोचा जमाना गेला; आता लाईट रोको! पाच जिल्ह्यांत वीज खंडित करण्याचा इशारा”

कराड प्रतिनिधी, दि. ८ जुलै | चांगभलं वृत्तसेवा
सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांनी संयुक्तपणे महापारेषण विभागाला विविध सामाजिक मागण्यांसाठी निवेदन दिले असून, त्या मागण्यांकडे सरकारने तत्काळ लक्ष न दिल्यास सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या पाच जिल्ह्यांची वीज सप्लाय लाईन बंद करण्याचा तीव्र इशारा दिला आहे.
विविध सामाजिक संघटनांतर्फे महापारेषणच्या विजयनगर (कराड ) येथील मुख्य कार्यकारी अभियंता प्रज्वल कांबळे यांना निवेदन सादर करण्यात आले. सरकारकडे विविध सामाजिक मागण्या मांडत, त्या त्वरित मान्य न झाल्यास सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यांचा वीजपुरवठा बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनामध्ये मागण्या पुढीलप्रमाणे करण्यात आल्या आहेत :
१ नागपंचमी निमित्त जिवंत नाग पकडण्यास कायदेशीर मान्यता मिळावी.
२. पुरुष शोषण विरोधी ॲक्टची अंमलबजावणी करावी.
३. बेरोजगार तरुणांना बिनव्याजी कर्ज आणि ५० टक्के अनुदान मिळावे.
४. रस्ते अपघात रोखण्यासाठी गतिरोधक कायदा अंमलात आणावा.
५. कैकाडी समाजावरील क्षेत्रीय बंधन उठवावे.
६. अंगणवाडी सेविकांना प्राथमिक शिक्षिकेचा दर्जा देण्यात यावा.
७. शेतकऱ्यांसाठी फार्मर ॲक्ट लागू करावा.
या मागण्यांबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्यात आला नाही, तर महापारेषणच्या लाईन बंद करून पाच जिल्ह्यांमध्ये वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भिमराव माने (शिराळा), चंद्रकांत पवार (संस्थापक अध्यक्ष, शिवराष्ट्र युवक संघटना महाराष्ट्र राज्य), विजय पाटील (शेतकरी संघटना), अशोक पाटील (जिल्हा संघटक, शेतकरी संघटना), गणपती माने, तसेच अनिल जाधव (कार्यकारी संघटक, शिवराष्ट्र युवक संघटना) हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी एकमुखाने या मागण्या सरकारने लवकरात लवकर मान्य करून तातडीने कृती करण्याची मागणी केली.
या आंदोलनाच्या पद्धतीत पारंपरिक मार्गांऐवजी वीजपुरवठा रोखण्याचा इशारा देणे, हे एक वेगळे आणि लक्षवेधक पाऊल मानले जात आहे.