कृष्णा दिव्यांग मित्र योजना महाराष्ट्रात आदर्शवत ठरेल : डॉ. सुरेश भोसले
कृष्णा हॉस्पिटल व डॉ. अतुलबाबा युवा मंचतर्फे दिव्यांगांना उपयोगी साहित्याचे वितरण
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
समाजातील दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात कृष्णा दिव्यांग मित्र योजना राबविली जात आहे. कृष्णा हॉस्पिटल आणि डॉ. अतुलबाबा युवा मंचने सुरु केलेल्या या योजनेचा लाभ कराड दक्षिणमधील शेकडो दिव्यांग बांधवांना होत आहे. येत्या काळात ही योजना महाराष्ट्रात आदर्शवत ठरेल, असे प्रतिपादन कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी केले. गोळेश्वर (ता. कराड) येथे आयोजित दिव्यांग बांधवांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
कृष्णा हॉस्पिटल आणि डॉ. अतुलबाबा युवा मंचने कराड दक्षिणमधील दिव्यांग बंधू – भगिनींसाठी कृष्णा दिव्यांग मित्र योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून कृष्णा हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांनी गावागावांमध्ये जाऊन दिव्यांगांची तपासणी करुन, त्यांच्यावर उपचार केले आहेत. तसेच गरजूंना व्हीलचेअर, वॉकर, काठी तसेच कृत्रिम अवयव अशाप्रकारचे साहित्य मोफत उपलब्ध करुन दिले जात आहे. गोळेश्वर येथील सिद्धार्थ मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्यात डॉ. सुरेश भोसले आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना विविध साहित्याचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, की दिव्यांगांच्या जणडघडणीमध्ये त्यांच्या आई – वडिलांचे योगदान महत्वपूर्ण आहे. त्यामुळे त्यांचाही सन्मान होणे गरजेचे आहे. येत्या काळात कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी स्वतंत्र उपचार केंद्र सुरु करण्याचा विचार आहे. कृष्णा समूहाने नेहमीच दिव्यांगांच्या कल्याणासाठी प्रयत्न केले आहेत. दिव्यांगांना कृष्णा हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार उपलब्ध असून, अधिकाधिक दिव्यांगांना शक्य त्या ठिकाणीची नोकरीची संधीही मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दिव्यांग बांधवांना स्वावलंबीपणे व सुखकारक जीवन जगता यावे, यासाठी हा उपक्रम आखण्यात आला असल्याचे नमूद करुन, डॉ. अतुल भोसले यांनी या योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांगांनी घ्यावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाला य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक निवासराव थोरात, कृष्णा बँकेचे संचालक विजय जगताप, कराड तालुका शेती उत्पन्न समितीचे माजी सदस्य दिपक जाधव, गोळेश्वरचे सरपंच चंद्रकांत काशीद, उपसरपंच प्रकाश जाधव, पद्मसिंह जाधव, प्रतिक जाधव, प्रशांत पाटील, प्रद्युम्न जाधव, डॉ. जी. वरदराजुलू, डॉ. काशीनाथ साहू यांच्यासह मान्यवर व दिव्यांग बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.