कोल्हापुरात १८ ऑगस्टपासून सुरू होणार उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच : मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

सातारा | दि. १ ऑगस्ट, चांगभलं वृत्तसेवा
कोल्हापूर विभागातील न्यायासाठी झटणाऱ्या वकिलांसह हजारो न्यायप्रेमींना दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय आज मुंबई उच्च न्यायालयाने घेतला. आता येत्या १८ ऑगस्ट २०२५ पासून कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कार्यान्वित होणार असल्याचे अधिकृत घोषणा महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक अराधे यांनी महाराष्ट्र राज्यपालांच्या मान्यतेनंतर कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूरसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील वकील संघटनांनी, बार असोसिएशन्सनी आणि स्थानिक पक्षकारांनी सर्किट बेंचसाठी पाठपुरावा केला होता. आता अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून हा प्रत्येक न्यायप्रेमीचा विजय असल्याची भावना न्याय क्षेत्रात व्यक्त होत आहे.
या निर्णयामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा आदी जिल्ह्यांतील नागरिकांना मुंबईला न जाता आपल्या विभागातच न्याय मिळवण्याची संधी मिळणार असून न्यायप्रणाली अधिक सर्वसमावेशक होणार आहे.