कराड दक्षिणमधील नदीकाठच्या ‘या’ गावाला डॉ. अतुल भोसलेंच्या प्रयत्नाने मिळाला साडेदहा कोटींचा निधी – changbhalanews
राजकियराज्य

कराड दक्षिणमधील नदीकाठच्या ‘या’ गावाला डॉ. अतुल भोसलेंच्या प्रयत्नाने मिळाला साडेदहा कोटींचा निधी

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड दक्षिण मतदारसंघात भाजपाचे नेते डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विकासाच्या दूरदृष्टीमुळे गेल्या वर्षभरात विविध कामांसाठी १८१ कोटींचा विकासनिधी मंजूर झाला आहे. त्यामुळे कराड दक्षिण मतदारसंघातील रस्त्यांचे जाळे गतिमान बनले आहे. राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून कोट्यवधींचा विकासनिधी आणणाऱ्या डॉ. अतुलबाबांना विधानसभेत आमदार म्हणून काम करण्याची संधी द्यावी, असे आवाहन ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते यांनी केले. खुबी (ता. कराड) येथे १० कोटी ५० लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांच्या भूमीपूजन व उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.

भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून खुबी ते रेठरे बुद्रुक रस्ता रुंदीकरणासह सुधारणा (५.५० कोटी), काळोबा पाणंद ते कृष्णा कारखाना रस्ता डांबरीकरण (२.७० कोटी), कृष्णा कॅनॉल ते कामगार सोसायटी रस्ता डांबरीकरण (१.३० कोटी) जलजीवन मिशनमधून नळ पाणीपुरवठा योजना (५३ लाख), २५/१५ योजनेतून रस्ता क्राँक्रीटीकरण व नाले दुरुस्ती (१० लाख) असा विकासनिधी प्राप्त झाला आहे. तसेच माजी जि.प. सदस्या सौ. शामबाला घोडके यांच्या निधीतून शाळा दुरुस्ती (३ लाख), तसेच माजी पं.स. सदस्य बाळासाहेब निकम यांच्या निधीतून सिद्धनाथ मंदिराजवळ हायमास्ट पोलची उभारणी यासह गावातील मुख्य चौकात पेव्हर ब्लॉक बसविणे, नागनाथ पाणंद रस्ता सुधारणा अशी विकासकामे साकारण्यात येत आहेत. या विकासकामांचे भूमीपूजन व उद्‌घाटन मदनराव मोहिते व डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना मदनराव मोहिते म्हणाले, डॉ. अतुलबाबांच्या विकासाच्या दूरदृष्टीमुळे कराड दक्षिणेत रस्त्यांचे जाळे गतिमान झाले आहे. त्यांच्या प्रयत्नातून ग्रामीण रस्ते व पूलांच्या कामांसाठी १३१ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. तसेच गेल्याच आठवड्यात कराड शहरासाठी ५० कोटींचा निधी मंजूर झाला.

जेवढी विकासकामे गेल्या वर्षभरात अतुलबाबांनी राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिणमध्ये मंजूर करुन आणली, तेवढी विकासकामे कुठल्या आमदाराने तरी आणली का?, असा सवाल उपस्थित करत श्री. मोहिते म्हणाले, डॉ. अतुलबाबा भोसले हे उमदे नेतृत्व आहे. विकासासाठी निधी खेचून आणण्याची त्यांची जिद्द आहे. कराड दक्षिणेतील गावांशी व इथल्या लोकांशी असलेल्या जिव्हाळ्यामुळे या भागात विकासाची एवढी मोठी कामे होत आहेत. कुठलेही सत्तापद नसताना डॉ. अतुलबाबा एवढी विकासकामे करत असतील, तर त्यांना आमदार म्हणून निवडून दिल्यावर ते यापेक्षा मोठी विकासकामे खेचून आणून या भागाचा कायापालट करु शकतात. त्यामुळे त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून, त्यांना विधानसभेत काम करण्याची संधी द्यावी, असे आवाहन मोहिते यांनी केले.

यावेळी सौ. शामबाला घोडके व वैभव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला युवा नेते आदित्य मोहिते, माजी पं.स. सदस्य बाळासाहेब निकम, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाजीराव निकम, कृष्णा बँकेचे अनिल बनसोडे, खुबीच्या सरपंच सौ. जयश्री माने, उपसरपंच राजेंद्र माने, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रकाश माने, सोसायटीचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब काशीद, हणमंतराव माने, कुबेर माने, संदीप माने, प्रकाश माने, सुनील माने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close