कराडच्या ‘या’ व्यवसायिकाला मिळाला आदरणीय पी. डी पाटील कराड गौरव पुरस्कार
कर्मवीर अण्णांच्या कार्यक्रमात याच व्यवसायिकाच्या वडिलांनी उभारला होता पहिला मंडप
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व स्वर्गीय पी. डी. पाटील या दोन महान व्यक्तींची कर्मभूमी. या शहराचे सलग 43 वर्षे नगराध्यक्ष म्हणून काम करताना पी. डी. पाटील साहेब यांनी कराडचे रूप पालटले. त्यांनी चौफेर कराड शहराचा विकास साधला. त्यांच्यासारखे नेतृत्व लाभणे, हे कराडकरांसाठी अभिमानाची बाब आहे, असे गौरवोद्गार रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील यांनी काढले.
आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानच्यावतीने यंदाचा कराड गौरव पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग जयसिंगराव करपे यांना डॉ. अनिल पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी अनिल पाटील बोलत होते. प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आमदार बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष डॉ. अशोक गुजर, विश्वस्तांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
डॉ. अनिल पाटील म्हणाले, स्वर्गीय पी. डी. पाटील यांचे शिक्षण क्षेत्रातही मोलाचे योगदान आहे. शिक्षण क्षेत्रातील ते एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व होते. कराडच्या करपे कुटुंबाचे व रयत संस्थेचे अनोखे नाते आहे. ज्येष्ठ समाजसेवक जयसिंगराव करपे यांनी मंडप व्यवसायाची सुरूवात केली , तेंव्हा पहिला मंडप त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यक्रमात उभारला होता. त्यावेळी कर्मवीर अण्णांनी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली होती. जयसिंगराव करपे यांनी पुढेही हा वसा सुरू ठेवला. त्यांनी स्वकष्टातून कमावलेल्या संपत्तीतून अनेक दानधर्म केले. त्यांनी रयतच्या शाळा बांधण्यासाठीही निधी दिला. त्यांचे सुपुत्र पांडुरंग करपे यांनीही वडिलांचा हा समाजसेवेचा वारसा आणखी नेटाने पुढे सुरू ठेवला आहे. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने स्वर्गीय पी.डी. पाटील यांच्या नावाच्या कराड गौरव पुरस्काराचे सन्मानार्थि नक्कीच आहेत. त्यामुळेच या पुरस्काराचे एक वेगळे कौतुक कराडकरांसोबतच रयत शिक्षण संस्थेलाही आहे.
आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वच्छ शाळा, सुंदर शाळा, समूहगीत गायन यासारखे उपक्रम राबवण्यात येत आहेत. तर शहर व परिसरात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सन्मान करण्यात येतो. समाजातील इतरांनाही प्रेरणा मिळावी, हा या पुरस्कारामागील हेतू आहे. जयसिंगराव करपे यांनी अत्यंत जिद्द, चिकाटी व मेहनतीने मंडप व्यवसाय केला. त्यांच्या मुलांनी काळानुरूप व्यवसायात बदल स्वीकारत व्यवसाय वाढवला आहे. मात्र स्वकष्टातून मिळवलेल्या संपत्तीतून दानधर्म करण्याचा व समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा जयसिंगराव करपे यांचा वारसा त्यांच्या मुलांनीही पुढे सुरू ठेवला असल्याचे आमदार बाळासाहेब पाटील आवर्जून सांगितले.
मुकंदराव कुलकर्णी यांनी परिचय करून दिला. राजेंद्र माने यांनी आभार मानले.