कराडला ‘सोलो ट्रेनिंग’ सुरू असताना विमान कोसळले प्रशिक्षणार्थी पायलट जखमी ; कराडला वैमानिक प्रशिक्षण केंद्रावर प्रथमच घटना
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराडच्या विमानतळावर प्रशिक्षणार्थी वैमानिकास विमान चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत असताना प्रशिक्षणार्थी पायलटचे नियंत्रण सुटून विमान हवेतून काही फूट अंतरावरुन खाली जमिनीवर कोसळले. या अपघातात पायलट जखमी झाला. गुरूवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ‘सोलो ट्रेनिंग’ सुरु असताना हा अपघात झाला.
मुंबईच्या दमानिया एअरवेजच्या अॅम्बिसिअन्स फ्लाईग क्लबने आठ महिन्यांपासून कराड विमानतळावर वैमानिक
प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. येथे वीस प्रशिक्षणार्थीची पहिली बॅच प्रशिक्षण घेत आहे. सध्या ‘सोलो ट्रेनिंग’ म्हणजे प्रशिक्षणार्थीने एकट्याने विमान चालविणे हे प्रशिक्षण सुरू आहे.
गुरूवारी सकाळी सोलो ट्रेनिंग घेणाऱ्या प्रशिक्षणार्थीने विमान चालवण्यास घेतले. हे फोर सीटर विमान धावपट्टीवरुन हवेत उडाल्यानंतर काही क्षणातच ते धावपट्टीवर दक्षिण बाजुच्या संरक्षक भिंतीजवळ कोसळले. त्यानंतर प्रशिक्षणार्थांसह अधिकारी व सुरक्षारक्षकांनी त्याठिकाणी धाव घेतली . जखमी प्रशिक्षणार्थीला अपघातग्रस्त विमानातून बाहेर काढले.
दरम्यान , अपघातापूर्वी चालकाचे नियंत्रण सुटल्याने विमान हवेत हेलकावे खात असल्याचे काही ग्रामस्थांनी पाहिले होते. त्यानंतर काही वेळातच विमान भिंतीच्या आतील बाजूला कोसळले, असे प्रत्यक्षदर्शी वारूंजी गावच्या ग्रामस्थांनी सांगितले.