श्री संत सेना महाराज केशशिल्पी महामंडळाच्या माध्यमातून ५० कोटींची तरतूद : डॉ. अतुल भोसले
मलकापुरात श्री संत सेना महाराज सकल समाजाचा कौटुंबिक स्नेहमेळावा उत्साहात

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
श्री संत सेना महाराजांनी आपल्या समाजाला प्रतिष्ठा मिळवून दिली. वीर शिवा काशीद, जीवा महाले यांनी तर महाराष्ट्र धर्म वाढवण्याचा प्रयत्न केला. महायुती सरकारने नाभिक समाजाच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी श्री संत सेना महाराज केशशिल्पी महामंडळ निर्माण केले आहे. या महामंडळाच्या माध्यमातून समाजाच्या उत्कर्षासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी केली. मलकापूर (ता. कराड) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या महामंडळावर कराड तालुक्यातून प्रतिनिधीत्व देण्याची ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली.
श्री संत सेना महाराज सकल समाज, कराड दक्षिण आणि भारतीय जनता पाटील कराड दक्षिणच्यावतीने मलकापूर येथील सोनाई मंगल कार्यालयात कौटुंबिक स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.
मेळाव्यात बोलताना डॉ. भोसले म्हणाले, श्री संत सेना महाराज केशशिल्पी महामंडळाचा फायदा येणाऱ्या काळात समाजाला निश्चित होणार आहे. समाज बांधवांना स्वतःचा व्यवसाय निर्माण करण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध दिले जात आहे. याची माहिती आपल्या समाजातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम सर्वांनी केले पाहिजे. या समाजाला बळकटी देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. राज्य सरकार व महामंडळाच्या माध्यमातून आपल्या समाजाला न्याय देण्याची भूमिका असून, महामंडळावरदेखील आपल्या समाजाचा प्रतिनिधी पोहोचवण्याचे काम करू असे अभिवचन दिले.
यावेळी डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते नाभिक समाजातील व्यावसायिकांना संच वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला भाजपाचे तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील, महाराष्ट्र नाभिक संघाचे उपाध्यक्ष प्रकाश वास्के, किशोर काशीद, ज्येष्ठ नागरिक भीमराव वास्के, आनंदराव पवार, माजी नगरसेविका निर्मला काशीद, राजेंद्र यादव, दिगंबर वास्के, आण्णासाहेब काशीद, मनोज शिंदे, जीवन गायकवाड, बाळासाहेब यादव, भाजपा ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष भारत जंत्रे, धनश्री रोकडे, सुरेश पवार, विजय जगताप, भानुदास शिंदे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री संत सेना महाराजांच्या मंदिराचा माझ्याकडे देण्यात आलेला प्रस्ताव मी तातडीने उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई-मेलद्वारे पाठवला आहे. आपण दिलेल्या प्रस्तावाचा शासन स्तरावर पाठपुरावा करुन, या मंदिराच्या उभारणीसाठी मी सर्वस्तरावर आटोकाट प्रयत्न करीन, अशी ग्वाही डॉ. अतुल भोसले यांनी यावेळी बोलताना दिली.