मराठा आरक्षणासाठी कराडला राज्यमंत्र्यांच्या पक्षातील ‘या’ पदाधिकाऱ्यानं दिला राजीनामा
हैबत आडके | कराड प्रतिनिधी
एका हातात पक्षाचा झेंडा आणि एका हातात मराठा आरक्षणाचा मुद्दा दोन्ही झेंडे घेऊन मी काम करू शकत नाही, असे म्हणत राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या कराड तालुकाध्यक्षांनी आज मराठा क्रांती मोर्चा आंदोलनादरम्यान शिवतीर्थ दत्त चौक येथे आपल्या पदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा बच्चू कडू यांच्या कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे.
सतीश विष्णू पाटील रा. कराड असे राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांचे नाव आहे. सतीश पाटील हे मराठा आरक्षण लढ्यात सक्रिय आहेत. प्रहार जनशक्ती पक्षांच्या माध्यमातून बच्चू कडू यांचे काम कराड तालुक्यात पोहोचविण्यासाठी त्यांनी गेल्या काही वर्षात मोठे योगदान दिले आहे. मात्र मराठा आरक्षणाच्या मागणीकडे राज्य शासनाचे होत असलेले दुर्लक्ष विचारात घेऊन सतीश पाटील यांनी आपल्या पदाचा आज राजीनामा दिला.
“एका हातात पक्षाचा झेंडा आणि एका हातात मराठा आरक्षणाचा मुद्दा असे दोन्ही झेंडे घेऊन मी काम करू शकत नाही, त्यामुळे शिवतीर्थ दत्त चौक कराड येथे सकल मराठा आरक्षण मोर्चामध्ये मी माझ्या कराड तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. मराठा समाजाला तातडीने आरक्षण मिळावे आणि या आंदोलनात सक्रिय राहता यावे यासाठी आपण आनंदाने आणि स्वमर्जीने या पदाचा राजीनामा देत असून आपणही मराठा आरक्षणासाठी प्रयत्न कराल” अशी अपेक्षा पाटील यांनी त्यांच्या राजीनामा पत्रात राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे व्यक्त केली आहे. कराडच्या सकल मराठा समाज बांधवांमध्ये व राजकीय क्षेत्रात या राजीनाम्याची चर्चा सुरू आहे.
आज सातारा बंदची हाक
दरम्यान, मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावत चालली असून मराठा आरक्षणाबाबत सरकारने अजून निर्णय घेतलेला नाही. असे सांगत मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी उद्या सातारा बंदची हाक दिली आहे.
बंद शांततेत पार पाडण्याचं आवाहन
मराठा क्रांती मोर्चाचा आरक्षणासाठीचा लढा शांततेच्या मार्गाने लढण्याचा मोर्चाच्या समन्वकांचा मानस, विचारधारा आहे. कोणीही कायदा व्यवस्था बिघडवून शांततेच्या मार्गाने चांललेल्या आंदोलनाला गालबोट लावू नये. महामार्गावर चक्काजाम करण्याचे कोणालाही सांगण्यात आलेले नाही. महामार्गावर अशा पध्दतीने कोणी कृत्य केल्यास त्याची जबाबदारी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक यांचेवर रहाणार नाही याची दखल संबंधितांनी घ्यावी, असे मराठा क्रांती मोर्चाच्या सातारा येथील समन्वयकांनी स्पष्ट केले आहे.