कराडला कोयता गॅंगला पोलिसांचा चाप, चार महिन्यात ७ कोयते जप्त, २४ जणांना बेड्या
कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई : कामगिरीत सातत्य ठेवण्याची गरज

चांगभलं ऑनलाइन | हैबत आडके
कोयत्यासह तलवारीसारख्या धारदार शस्त्राचा धाक दाखवून कराड परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने चार महिन्यात मुसक्या आवळल्या आहेत. जुलै महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत पोलिसांनी कोयता गॅंगला चाप लावताना ७ कोयते जप्त करून २४ संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत.
कराड शहरासह तालुक्यातील गुन्हेगारीचा महाराष्ट्रभर बोलबाला आहे. पश्चिम महाराष्ट्रात कराड हे गँगवारच्या केंद्रस्थानी राहिले आहे. त्यामुळे कराड शहर परिसरातील कायदा व सुव्यवस्था हा सातारा जिल्हा पोलीस दलाच्या कायम अजिंडयावरचा विषय राहिला आहे.
कराड शहर परिसरातील गुन्हेगारी टोळ्यांचे अनेक मोहरे मोक्का मध्ये कारागृहात आहेत. काही तडीपार आहेत. मात्र तरीही गेल्या काही महिन्यांपासून गल्ली गुंडांच्या कोयता गँगनी धुडगूस सुरु केला होता. त्यामुळे कोयता घेऊन फिरणाऱ्या या गल्ली दादांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान कराड पोलिसांच्या समोर उभे राहिले होते. रेठरे येथे चार दिवसांपुर्वी कोयत्याने युवकावर हल्ला झाल्याचा प्रकार घडला होता. यानंतर कार्वेनाक्यावर प्रेमसंबधांतून युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून झाला. मात्र शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली योजनाबद्ध मोहिमा आखून कोयता गॅंगचा ‘करेक्ट कार्यक्रम’ सुरू केला. कार्वेनाका खूनाच्या घटनेत कराडच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी या गुन्हय़ातील संशयित हल्लेखोरास अवघ्या दोन तासात पकडले.
चार महिन्यात ७ कोयते जप्त…..
पोलिसांकडील रेकॉर्डनुसार गेल्या चार महिन्यात पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर व पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जुलै २०२३ ते ३० नोव्हेंबरपर्यंत कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या राजू डांगे यांच्या पथकाने तब्बल ७ कोयते आणि १ तलवार हस्तगत केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक आँचल दलाल यांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी कराड पोलिसांना दिलेल्या सुचनेनुसार शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकासह सहाय्यक निरीक्षक अजय गोरड, उपनिरीक्षक प्रविण जाधव यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनीही या कारवाईत वेळोवेळी सहभाग घेतला आहे.
कामगिरीत सातत्य ठेवण्याची गरज….
कराड शहर परिसरात कायम वादळापूर्वी शांतता असते अशी चर्चा गुन्हेगारी वर्तुळात सातत्याने होत असते. गेल्या दोन महिन्यात खुनाच्या दोन घटना घडल्या आहेत. बाबरमाची आणि कार्वेनाका येथे घडलेल्या या खुनाच्या घटनांच्या तपासात पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर व पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी उत्तमच राहिली आहे. मात्र या दोन्ही घटना मोठ्या गॅंगवारशी निगडित नव्हत्या. त्यामुळे या घटनांची व्याप्ती मर्यादित राहिली. मात्र रेकॉर्डवरील गुन्हेगारी टोळ्यांचे मोहरे कराड शहरात पुन्हा कार्यरत होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कोयता गॅंग बरोबरच पिस्तूलबाजांचीही संख्या कराड शहर परिसरात काही कमी नाही. त्यातच लोकसभा, नगरपालिका आणि विधानसभा निवडणुकांची पूर्वतयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर कराड परिसरातील गुन्हेगारी टोळ्यांनी डोके वर काढू नये याची दक्षता कराड शहर व ग्रामीण पोलिसांना विशेषता: कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला घ्यावी लागणार आहे.
प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज…
कराड शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचे कारनामे सुरू होण्यापूर्वीच येणाऱ्या काळात कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्या लागणार आहेत. रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालीवर वॉच ठेवण्याबरोबरच, काही जणांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाया, तसेच आवश्यकता असणाऱ्यांच्यावर तडीपारीच्या कारवाया पोलिसांना प्रभावीपणे कराव्या लागणार आहेत. कराड परिसरातील खबऱ्यांचे जाळेही भक्कम करावे लागणार आहे. कराड परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित आहेत, मात्र गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी पोलिसांना प्रकर्षाने त्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. या संदर्भात काही प्रतिबंधात्मक उपाययोजना कराड शहर पोलिसांनी हाती घेतले असल्याचे समजते. मात्र ठोस कारवाया होतील, तेव्हाच ही बाब समोर येईल.