कराड अर्बनला रिझर्व्ह बँकेकडून मोबाईल बँकिंगसाठीची परवानगी ; डॉ. सुभाष एरम
रविवारी वार्षिक सर्वसाधारण सभा
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
दि कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., कराडची १०७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. २८ जुलै रोजी पंकज मल्टीपर्पज हॉल, कराड येथे आयोजित केली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी दिली.
कराड अर्बन बँकेस रिझर्व्ह बँकेकडून आजच मोबाईल बँकिंगसाठीची परवानगी मिळाली असून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वसंध्येलाच मागील सर्वसाधारण सभेची आश्वासन पूर्ती केल्याचा आनंद होत असल्याचे सांगत रविवार दि. २८ जुलै रोजी सकाळी ११.३० वा. पंकज मल्टीपर्पज हॉल, हॉटेल पंकजचे मागे, कोल्हापूर नाक्याजवळ, कराड येथे आयोजलेल्या १०७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सभासदांनी उपस्थिती नोंदविण्याचे आवाहन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी सर्व सभासदांना केले आहे. सदरच्या सभेची नोटीस सर्व सभासदांना यापूर्वी त्यांच्या पत्त्यावर पाठविण्यात आलेली आहे.
यावेळी माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी, उपाध्यक्ष समीर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी व संचालक उपस्थित होते.