ऐतिहासिक उच्चांकी व्यवसायवृद्धीसह कराड अर्बनने व्यवसायाचा रु.५८०० कोटींचा टप्पा ओलांडला – डॉ. सुभाष एरम – changbhalanews
Uncategorized

ऐतिहासिक उच्चांकी व्यवसायवृद्धीसह कराड अर्बनने व्यवसायाचा रु.५८०० कोटींचा टप्पा ओलांडला – डॉ. सुभाष एरम

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
गतवर्षाच्या तुलनेत व्यवसायामध्ये जवळपास रु.६५० कोटींची विक्रमी वाढ नोंदवित कराड अर्बन बँकेने मार्च २०२५ अखेर रू.५८३७ कोटींची व्यवसायपूर्ती केली असून नेट एन.पी.ए.चे प्रमाणदेखील ‘शून्य’ टक्के राखत यशाची ऐतिहासिक परंपरा कायम ठेवली आहे. बँक मोबाईल बँकिंग व यूपीआय सेवांच्या प्लॅटफार्मवर येत असतानाच सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी बँकेने गुढीपाडव्याच्या शुभमूहुर्तावर ‘सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर’चा शुभारंभ केला आहे. कोणत्याही प्रकारच्या सायबर हल्ल्यांना रोखण्यास सक्षम असणारे हे अद्ययावत व रिअल टाईम मॉनिटरिंग करणारे पश्चिम महाराष्ट्रातील पहिलेच सेंटर असून यामुळे ग्राहकांच्या सर्व आर्थिक व्यवहारांना सुरक्षिततेचे कवच लाभले आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

मार्च २०२४ मध्ये बँकेने रु.५००० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा ओलांडला होता आणि मोबाईल बँकिंग व यू.पी.आय. सेवा सुरू करण्याचा संकल्प करीत नव्या आर्थिक वर्षाचा शुभारंभ केला होता. वर्षभरातील वाटचालीचा आराखडा तयार करून बँकेने नियोजनबद्ध वाटचाल करीत मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात यशाचे विविध ऐतिहासिक टप्पे गाठले आहेत.

बँकेच्या मार्च २०२५ पर्यंत एकूण ६७ शाखा कार्यरत असून संपलेल्या आर्थिक वर्षात नव्या पाच शाखा वाई, बार्शी, पंढरपूर, सांगोला, एम.आय.डी.सी. सातारा या शाखा ग्राहकसेवेत नव्याने रुजू झाल्या आहेत. तसेच, सप्टेंबर २०२४ पासून मोबाईल बँकिंग व यू.पी.आय. आधारित सुविधांचे लोकार्पण करण्यात आले. बँकेने साध्य केलेली प्रगती व आर्थिक सक्षमतेच्या जोरावर रिझर्व्ह बँकेने नुकतीच हडपसर, चाकण, शिरवळ, इचलकरंजी, नातेपुते अशा नव्या पाच शाखांना मान्यता दिली असून पहिल्या तिमाहीतच या शाखा ग्राहकांच्या सेवेत रूजू होतील आणि त्यामुळे शाखाविस्तार ७२ पर्यंत पोहोचणार आहे. ग्राहकसेवा हाच केंद्रबिंदू मानून वेगवेगळ्या योजनांमार्फत ग्राहकांच्या अपेक्षानुरूप योजना बँक कार्यान्वित करते आहे , असे प्रतिपादन बँकेचे कुटुंबप्रमुख व माजी अध्यक्ष सुभाषराव जोशी यांनी केले.

रिझर्व्ह बँकेचे दूरदर्शी निकष आणि सर्व निर्धारित प्रमाणकांची पूर्ती बँकेने साध्य केलेली असून भांडवल पर्याप्तता प्रमाण (सी.आर.ए.आर.) १४.९४% इतके राखून आपली सक्षमता आणि सुदृढता कायम राखली आहे. बँकेस एकूण रू.४५ कोटी इतका ढोबळ नफा तर सर्व कर व तरतुदी वजा जाता रू.२६.४७ कोटी इतका निव्वळ नफा झाला आहे. बँकेच्या २९ शाखांना रु.१ कोटींपेक्षा अधिक नफा झाला असून यामध्ये सर्वाधिक नफा मिळालेल्या सदरबझार सातारा शाखेने रु.७ कोटींचा उच्चांकी टप्पा ओलांडला आहे. तसेच, ४० शाखांनी एन.पी.ए.चे प्रमाण ‘शून्य’ राखण्यात यश मिळवले आहे, अशी माहिती बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी यांनी दिली.

विलीनीकृत बँकांच्या १० शाखांचे केलेले रिलोकेशन व नवीन ५ शाखांद्वारे नवीन व्यवसायाच्या संधी विस्तारत बँकेने या १५ शाखांद्वारे अल्पावधीतच रु. २५० कोटींपेक्षा अधिक व्यवसाय पूर्णतः नवीन असणाऱ्या ग्राहकांशी व्यवसायाचे नातेबंध दृढ करत साध्य केलेला आहे. सातारा विभागातील १८ शाखांनीदेखील त्यांच्या व्यवसायपूर्तीचा रु. २००० कोटींचा टप्पा ओलांडत सातारा जिल्ह्यात बँकेची नवी ओळख निर्माण केली आहे. अनेक ग्राहक, हितचिंतक व सभासदांच्या नव्याने होणाऱ्या समावेशाने कराड अर्बन कुटुंब असेच विस्तारत आहे. बँकेने केलेली प्रगती केवळ आकडेवारीमधील नसून ती गुणात्मक आहे आणि त्याचमुळे गेल्या तीन वर्षात त्यामध्ये सातत्य असल्याचे दिसून येते, अशी माहिती बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी यांनी दिली.

बँकिंग क्षेत्रातील बदलांचा मागोवा घेत गरजेनुरूप धोरणात बदल करत नियोजनबद्ध प्रयत्नांना कृतीशीलतेची जोड देत सांघिक प्रयत्नांद्वारे केलेल्या कामकाजामुळे मागील वर्षाच्या तुलनेत रु.६५० कोटींपर्यंतची घसघशीत वाढ साध्य करणे शक्य झाले आहे. आजवरच्या बँकेच्या इतिहासातील ही विक्रमी वाढ आहे. चालू आर्थिक वर्षात कर्जावरील व्याजदर अतिशय स्पर्धात्मक ठेवल्यामुळे कर्जव्यवहारात रु.३४० कोटींची विक्रमी वाढ झाली. यामध्ये व्यावसायिक कर्जाची वाढ लक्षणीय आहे. बँकेने एकप्रकारे व्यवसाय, उद्योग उभारणीत आपला सहभाग नोंदविला आहे. ऑनगोईंग एन.पी.ए. व्यवस्थापन पालकत्व संकल्पनेतून प्रभावीपणे केल्यामुळे वर्षअखेरीस एकूण एन.पी.ए. मध्ये केवळ रु.४ कोटींची वाढ झाली तर, जुन्या एन.पी.ए. मधून रु.३० कोटींची वसुली करण्यात आली. गेल्या तीन वर्षांच्या कालखंडात सेवकांना दिलेली उद्दिष्टे त्यांनी नियोजनानुसार पूर्ण केल्यामुळे लहान कर्जाचे तसेच अग्रक्रम क्षेत्रासाठीचे कर्जपुरवण्याचे प्रमाणदेखील निर्धारित वेळेपूर्वी गाठणे शक्य झाले असून रिझर्व्ह बँकेच्या सर्व निकष व प्रमाणकांची पूर्तता बँकेने केली आहे. भविष्यकालीन वाटचालीतदेखील शून्य टक्के एन.पी.ए. कायम राखणे, व्यवसायवाढीत सातत्य ठेवत वाटचाल आणि बँकेचा महाराष्ट्रभर विस्तार करणे हेच आमचे प्रमुख ध्येय राहील. बँकिंगबरोबरच बँकेने स्थापनेपासून समाजाभिमुख कार्य करण्याचा वारसा जपला आहे. समाजऋणात राहण्यासाठी हे कार्यदेखील भविष्यकाळात अधिक विस्तारत नेऊ आणि बँकेची वेगळी ओळख कायमस्वरूपी जपू , असे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांनी सांगितले.

याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, ज्येष्ठ संचालक व माजी अध्यक्ष सुभाषराव जोशी, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव, बँकेचे संचालक व व्यवस्थापन मंडळ सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close