कराड अर्बन को-ऑप. बँकेस आणखी पाच नवीन शाखा सुरू करण्यास रिझर्व्ह बँकेकडून मान्यता
कराड अर्बन बँकेचा १०८ वा वर्धापन दिन सोहळा साजरा
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड अर्बन बँकेचा १०८ वा वर्धापन दिन सोहळा सत्यनारायण पुजेसह मोठ्या श्रध्देने आणि उत्साहात बँकेच्या मुख्य कार्यलयात साजरा करण्यात आला. पवित्र सत्यनारायण पुजा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव व त्यांच्या सुविद्य पत्नी तसेच अर्बन बझार व स्व.डॉ.द.शि. एरम अपंग सहाय्य संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. जयश्री गुरव यांच्या हस्ते करण्यात आली. याच शुभप्रसंगी बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांच्या सुविद्य पत्नी व बँकेच्या संचालक सौ. रश्मी एरम यांचाही वाढदिवस साजरा करण्यात आला.
या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे बँकेचे महाव्यवस्थापक (ट्रेझरी) श्री सलीम शेख यांना त्यांच्या सहकार क्षेत्रातील अतुलनीय योगदानाची दखल घेऊन यशवंत नगरी न्युज नेटवर्क यांनी यशवंतराव चव्हाण सहकार गुणवंत अधिकारी पुरस्कार २०२५ साठी जाहिर करण्यात आला.
आधुनिक युगातील पुर्णपणे डिजिटलायज्ड व सायबर सुरक्षेने परिपुर्ण असलेल्या दि कराड अर्बन को-ऑप. बॅंक लि., कराड बँकेस सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात आणखी पाच नवीन शाखा सुरू करण्यास रिझर्व्ह बँकेकडून मान्यता मिळाली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाषराव एरम यांनी दिली.
सभासद-खातेदारांसाठी बँकेने नुकतेच यु.पी.आय. व सकल पे या मोबाईल बँकींग सेवेचा शुभारंभ केला असुन सध्याची असणारी मजबूत आर्थिक स्थिती व भविष्यातील शिस्तबद्ध नियोजन यांचा अभ्यास करून बँकेने डिसेंबर २०२४ अखेर रु. ५५०० कोटी व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. तसेच डिसेंबर २०२४ मध्ये नवीन शाखांना परवानगी मिळण्यासाठीचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे सादर केला होता. या प्रस्तावास रिझर्व्ह बँकेने अवघ्या एका महिन्यात सकारात्मक प्रतिसाद देत हडपसर (जि. पुणे), चाकण (जि.पुणे), शिरवळ (जि. सातारा), इचलकरंजी (जि. कोल्हापूर) आणि नातेपुते (जि. सोलापूर) येथे शाखा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यापूर्वी मागील आर्थिक वर्षामध्ये म्हणजेच सन २०२४- २५ मध्ये बँकेस नवीन पाच शाखा बार्शी, पंढरपूर, सांगोला, वाई व सातारा एम.आय.डी.सी. येथे सुरू करणेस रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली होती. सदर पाचही शाखा ग्राहक सेवेत दाखल झाल्या असून आणखी नवीन पाच ठिकाणी शाखा सुरू करण्यास परवानगी मिळाल्यामुळे बँकेस व्यवसाय वाढीसाठी संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती ज्येष्ठ संचालक व माजी अध्यक्ष सुभाषराव जोशी यांनी दिली.
सध्या सहकार क्षेत्रामध्ये बँकींग करत असताना येणाऱ्या विविध अडी-अडचणी, रिझर्व्ह बँकेचे बदलणारे नियम आणि सहकारी बँकांवर असणारे बारीक लक्ष व नियंत्रण या सगळ्यांचा ताळमेळ राखत कराड अर्बन बँक सहकारी वित्तीय क्षेत्रामध्ये घट्ट पाय रोवून स्थिरावलेली आहे. बँकेने चालू वर्षाअखेरीस रू.५,६०० कोटी एकूण व्यवसायाचा टप्पा पार करण्याचे उद्दीष्ठ ठेवले असून सर्व सेवकांच्या प्रयत्नाने ते पूर्ण करणारच असल्याचा विश्वास व्यक्त करून यापुढील काळातही बँक अतिउच्च ग्राहकसेवा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांनी सांगितले.
यावेळी बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, ज्येष्ठ संचालक व माजी अध्यक्ष सुभाषराव जोशी, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए, दिलीप गुरव, बँकेचे संचालक व व्यवस्थापन मंडळ सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.