कराड अर्बन बँकेची ६४ वी व वाई तालुक्यातील पहिली शाखा वाई येथे ग्राहक सेवेत रुजू
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
दि कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक. लि., कराड ची ६४ वी शाखा वाई जि.सातारा येथे श्रावणी संकष्टीचे औचित्य साधून दि.२२ ऑगस्ट पासून ग्राहक सेवेत रूजू झाली. नवीन शाखेचा शुभारंभ बँकेचे ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी यांच्या हस्ते व अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी व मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. यावेळी शाखेच्या ठिकाणी सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय रिझर्व्ह बँकेने सदृढता व सक्षमतेच्या आधारावर कराड अर्बन बँकेस २०२४-२५ सालात सातारा जिल्ह्यात सातारा एम.आय.डी.सी. व वाई अशा दोन तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, पंढरपूर व सांगोला या तीन अशा एकूण पाच नवीन शाखा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यापैकी आज वाई येथील शाखेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नवीन शाखेच्या कर्जदारांना वैयक्तीक दुचाकी-चारचाकी तसेच व्यवसायिक वाहनांचे वितरण याचबरोबर ठेवीदारांना ठेव पावत्यांचे वितरण ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
बँकेची स्थापना ही स्वातंत्र्यपूर्व काळात झालेली असून बँकेच्या जडणघडणीमध्ये अनेक थोरामोठांचे योगदान लाभले आहे. स्थापनेवेळी ज्या तत्वांच्या आधारे ही बँक स्थापन केली, तीच पारदर्शकता, राजकारण विरहीत व निस्वार्थी कारभार ही तत्वे कायम ठेवत गेल्या १०७ वर्षांपासून विश्वासार्ह ग्राहकसेवा देत आहे. सर्वसामान्यांची विश्वासाची बँक अशी आपल्या कराड अर्बन बँकेची ओळख आहे. बँकेने अनेक होतकरू व कष्टाळू युवकांना पतपुरवठा करत यशस्वी होण्यासाठी मदत केली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी दिली.
कराड अर्बन बँक स्व. डॉ. द. शि. एरम आणि ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी यांच्या मार्गदर्शनाने आणि डॉ. सुभाष एरम यांच्या अध्यक्षतेखाली मोठी होत आहे. बँक चालू वर्षाच्या अखेरील ६७ शाखा आणि एकूण व्यवसायाचा ५७०० कोटींचा टप्पा पूर्ण करणार असल्याचा विश्वास यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांनी व्यक्त केला. बँकेच्या संचालक मंडळाने अधिकारांचे विकेंद्रीकरण करत मुक्त व्यवस्थापन स्विकारले आहे. यामध्ये सेवकांना पदनिहाय अधिकार प्रदान केले, यामुळे निर्णय क्षमता गतिमान झाली आणि पर्यायाने बँकेच्या व्यवसायात वाढ होत आहे. बँकेमध्ये सीए., सी.एस., आय.सी.डब्लू.ए., एल.एल.एम. तसेच तांत्रिक व सिव्हील इंजिनिअर असे उच्च शिक्षित सेवक असल्यामुळे बँकेस कोणत्याही कारणास्तव आउट सोर्सिंग करावे लागत नाही. तसेच बँकेद्वारे अल्प व्याजदराच्या विविध कर्ज योजना राबविल्या जातात. यामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या सबसिडीचा लाभ देणाऱ्या योजनांचासुद्धा सहभाग आहे. याचप्रमाणे बचतीसाठी तुलनेने उत्तम व्याज परताव्याच्या ठेव योजनासुद्धा दिल्या जातात.
बचत व चालू ठेव खात्यांना रूपे ए.टी.एम. कार्ड, क्यू.आर कोड, व्हॉट्सअप बँकींग, आर.टी.जी.एस./एन.ई.एफ.टी., आय.एम.पी.एस./एम.पी.ओ.एस. या सेवांचा समावेश केला असून ग्राहकांच्या संरक्षणासाठी लाईफ व जनरल इंश्युरन्स सेवासुद्धा उपलब्ध करून दिली आहे. याचबरोबर नुकतीच रिझर्व्ह बँकेने मोबाईल बँकिंगसाठी परवानगी दिली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांनी दिली.
बँकेचे उपमहाव्यवस्थापक विजय काकडे यांनी स्वागत व प्रास्ताविक तर आभार सहाय्यक महाव्यवस्थापक संतोष गायकवाड यांनी मानले. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी व सर्व संचालक, महाव्यवस्थापक, बँकेचे सेवक तसेच वाई व परिसरातील ग्राहकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती दर्शवली.
मागील वर्षी दि.२१ ऑगस्ट रोजी विजापूर रोड सोलापूर आणि दि.२२ ऑगस्ट रोजी बारामती या दोन शाखा सुरू करण्यात आल्या होत्या. दोन्ही शाखांनी पहिल्या वर्धापनदिनी अनुक्रमे २५ कोटी व २० कोटींची व्यवसायपूर्ती केली आहे. बँक व्यवस्थापनाने निश्चित केलेल्या उद्दीष्टांपेक्षा दोन्ही शाखांनी दुपटीहून अधिक व्यवसाय साध्य केला असून याबद्दल बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, ज्येष्ट संचालक सुभाषराव जोशी, उपाध्यक्ष समीर जोशी व मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांनी सर्व सेवकांचे अभिनंदन केले आहे.