कराड अर्बन बँकेची ६३ वी शाखा एम.आय.डी.सी. सातारा येथे ग्राहक सेवेत रुजू

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
दि कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक. लि., कराड ची ६३ वी शाखा एम.आय.डी.सी. सातारा येथे दि. ०५ ऑगस्ट पासून पहिल्या श्रावणी सोमवाराचे औचित्य साधून सुरू झाली. नवीन शाखेचा शुभारंभ बँकेचे ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी यांच्या हस्ते व अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी व मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. यावेळी शाखेच्या ठिकाणी सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते.
रिझर्व्ह बँकेने बँकेची सदृढता व सक्षमतेच्या आधारावर नवीन पाच शाखांना परवानगी दिली. याअनुषंगाने सदर बझार सातारा शाखेशी संलग्न असणा-या सातारा एम.आय.डी.सी. येथील विस्तारीत कक्षाचे नवीन शाखेत रूपांतर करण्यात आले. पहिल्याच दिवशी एम.आय.डी.सी. येथील ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खाती उघडून मुदत ठेवी ठेवल्या अशा ठेवीदारांना ठेव पावत्यांचे वितरण ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.
बँक गेल्या १०७ वर्षांपासून विश्वासार्ह ग्राहकसेवा देत आहे. सर्वसामान्यांची विश्वासाची बँक अशी आपल्या कराड अर्बन बँकेची ओळख आहे. बँकेने अनेक होतकरू व कष्टाळू युवकांना पतपुरवठा करत यशस्वी होण्यासाठी मदत केली असून एम. आय. डी. सी. भागातील उद्योजकांनी आपले व्यवहार सुरू करून बँकेस सेवेची संधी देण्याबाबतचे आवाहन यावेळी अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी नवीन शाखा परिसरातील ग्राहकांना केले.
कराड अर्बन बँकेद्वारे अल्प व्याजदराच्या विविध कर्ज योजना दिल्या जातात. यामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या सबसिडीचा लाभ देणाऱ्या विविध योजनांचासुद्धा सहभाग आहे. याचप्रमाणे बचतीसाठी तुलनेने उत्तम व्याज परताव्याच्या ठेव योजनासुद्धा दिल्या जातात. बचत व चालू ठेव खात्यांना रूपे ए.टी.एम. कार्ड, क्यू.आर कोड, व्हॉट्स अप बँकींग, आर.टी.जी.एस./एन.ई.एफ.टी., आय.एम.पी.एस./एम.पी.ओ.एस. या सेवांचा समावेश केला असून ग्राहकांच्या संरक्षणासाठी लाईफ व जनरल इंश्युरन्स सेवासुद्धा उपलब्ध करून दिली आहे. याचबरोबर नुकतीच रिझर्व्ह बँकेने मोबाईल बँकिंगसाठी परवानगी दिली असल्याचे यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांनी बँकेच्या विविध योजनांची माहिती देत असताना सांगितले.
यावेळी बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी व सर्व संचालक, महाव्यवस्थापक, बँकेचे सेवक तसेच शाखा परिसरातील ग्राहकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती दर्शवली.
यादोगोपाळ पेठ शाखेचे नवीन जागेत स्थलांतर
बँकेच्या यादोगोपाळ पेठ शाखेचे लक्ष्मी निवास सि.एस.एन. ३४६ यादोगोपाळ पेठ, सातारा- ४१५००२ येथून शॉप नं. यु जी २,३,४,५,६ चव्हाण हाऊस, सी.टी.एस.नं. १०१४, अदालत वाडा जवळ, शनिवार पेठ, सातारा ४१५००२ या नवीन जागेत दि.०५ ऑगस्ट रोजी स्थलांतरीत करण्यात आली. नवीन जागेतील शाखेचा शुभारंभ बँकेचे ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बँकेचे अध्यक्ष सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी व सर्व संचालक, महाव्यवस्थापक, बँकेचे सेवक तसेच सभासद, ग्राहक व हितचिंतक उपस्थित होते.