इनसाइड स्टोरी : शिंदे राहणार की जाणार? कराड दक्षिण काँग्रेसच्या गोटात अस्वस्थतेचे सावट! – changbhalanews
राजकिय

इनसाइड स्टोरी : शिंदे राहणार की जाणार? कराड दक्षिण काँग्रेसच्या गोटात अस्वस्थतेचे सावट!

कराड, दि. 21 जून 2025 | हैबत आडके

कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे हे सध्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. जिल्हा काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत नवनियुक्त जिल्हाध्यक्ष रणजीतभैय्या देशमुख यांनी पक्ष संघटनेत नवचैतन्य फुंकण्याचा निर्धार व्यक्त केला. परंतु या पत्रकार परिषद येतो सर्वात मोठं लक्ष वेधून घेतलं ते मनोहर शिंदे यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चेनं.

🧩 कराड दक्षिण काँग्रेसमधील गळतीमुळे पक्ष अस्थिर, शिंदेंभोवती गूढतेचं वलय कायम…

गेल्या काही वर्षांत कराड दक्षिण काँग्रेसमध्ये सुरू असलेली गळती ही आता लपवण्यासारखी राहिलेली नाही. विधानसभा निवडणुकीपूर्वीच मलकापूरचे माजी नगरसेवक राजेंद्र यादव व इतर काही वरिष्ठ कार्यकर्त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.
त्यानंतर, निवडणूक निकालानंतर एडवोकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी आपले समर्थक घेऊन थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करून काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीला मोठा धक्का दिला.
याशिवाय, काँग्रेसचे जेष्ठ पदाधिकारी व कुस्ती क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व पैलवान नाना पाटील यांच्याबाबतही ते लवकरच शिवसेनेत (उद्धव ठाकरे गट) प्रवेश करतील, अशी जोरदार चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. यामुळे कराड दक्षिण काँग्रेसमधील अंतर्गत अस्वस्थता अधिकच उघड झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर, मनोहर शिंदे यांच्यासारखा पक्षाचा प्रमुख चेहरा अस्वस्थ असल्याची चर्चा आहे आणि ते नेमकी काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

📌“ते कुठेही जाणार नाहीत…” – रणजीतभैय्या ठाम…

पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांनी थेट सवाल उपस्थित केला – “शिंदे यांच्यावर पक्ष सोडण्याचे आरोप का होत आहेत?” यावर रणजीतभैय्यांनी जोरदार प्रत्युत्तर देत, “अफवांवर विश्वास ठेवू नका, ते आमच्याच सोबत आहेत आणि राहतील,” असं ठामपणे सांगितलं.

🤔 पण शिंदेंची ‘खुणेतील’ शांतता काय सांगते..?

या मुद्द्यावर स्वतः मनोहर शिंदे यांनी मात्र मौन स्वीकारलं. जेव्हा पत्रकाराने त्यांना थेट उत्तर द्यायला सांगितलं, तेव्हा शिंदेंनी फक्त हात हलवत ‘मी सध्या इथेच आहे’ असा खुणेने उत्तर दिलं. हसतमुख काहीशी निष्कील मुद्रा होती, पण स्पष्टता नव्हती. काँग्रेससारख्या पक्षात सार्वजनिक मंचावर अशा संवेदनशील विषयावर मौन म्हणजे खास काहीतरी घडतेय याची चाहूल असल्याचे संकेत मानले जात आहेत.

🔍 पक्षांतर्गत हालचाली आणि अस्वस्थता…

गेल्या काही महिन्यांत कराड दक्षिण काँग्रेसमधील काही नेत्यांनी पाठ फिरवली आहे. अशावेळी शिंदे यांच्यासारखा बलाढ्य चेहरा जर पक्षातून बाहेर पडला, तर रणजीतभैय्यांच्या नव्या संघटनात्मक प्रयत्नांना धक्का बसेल, याची जाणीव पक्षश्रेष्ठींनाही आहे. त्यामुळेच रणजीतभैय्यांनी शिंदेंच्या उपस्थितीतच हा विषय आज जाहीरपणे हाताळला.

🧩 शिंदेंचं मौन काय सांगतं…? पुढची चाल काय असेल..?

जर शिंदे काँग्रेसमध्येच राहिले, तर त्यांचा अनुभव संघटनेसाठी मोलाचा ठरेल.
मात्र ते गप्प राहिले तर चर्चा वाढतच जाईल, आणि पक्षात गोंधळाची स्थिती तयार होईल. ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा जोरदार रंगली आहे मात्र सध्यातरी ओपन स्टँड न घेता परिस्थितीचं मूल्यांकन करण्याचा त्यांचा इरादा दिसतोय.

मनोहर शिंदेंनी या विषयावर स्पष्ट बोलणं टाळलंय, पण न बोलून ते बरंच काही सांगून गेल्याचं चित्र निर्माण झालंय. येणाऱ्या काळात रणजीतभैय्यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात काँग्रेस नव्याने उभी राहते का, हे पाहणं रंजक असेलच; पण त्याहूनही जास्त उत्सुकता आहे ती हीच की, शिंदे यांची पुढील चाल काय असेल?

—————————————–

आपलं मत काय?
मलकापूरचे शिंदे काँग्रेसमध्येच राहतील की नवीन राजकीय दिशा घेतील?
या घडामोडींवर तुमचं मत आम्हाला खालील ई-मेलवर नक्की कळवा.
तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत!
changbhalanews@gmail.com
राजकीय अपडेट जाणून घेण्यासाठी वाचत रहा..
👉 www.changbhalanews.com

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close