मुख्यमंत्र्यांच्या निधीने ‘कराड फेज 2’ चा प्रारंभ ; राजेंद्रसिंह यादव यांचा विश्वास
राजेंद्रसिंह यादव यांना शिवसेना पाठबळ देणार - शरद कणसे
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कराड शहरातील भुयारी गटर योजना व पाणी योजनेच्या अद्ययावतीकरणासाठी सुमारे 160 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या दोन्ही योजना कराडकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून या माध्यमातून ‘कराड फेज 2’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ झाला असल्याची माहिती यशवंत विकास आघाडी व शिवसेनेचे नेते राजेंद्रसिंह यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कराड शहरासाठी दोन योजनांच्या 160 कोटींसह एकूण 209 कोटींचा निधी मंजूर झाल्यानंतर राजेंद्रसिंह यादव यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत शिवसेनेचे संपर्कप्रमुख शरद कणसे व जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांचा सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते शिवसेनेचे शहर प्रमुख राजेंद्र माने, माजी नगरसेविका स्मिता हुलवान, हणमंत पवार, सुलोचना पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
राजेंद्रसिंह यादव म्हणाले, स्वर्गीय पी. डी. पाटील यांनी 50 ते 60 वर्षांपूर्वी कराडच्या विकासाच्या दृष्टीने भुयारी गटर योजना उभारली. वाढती लोकसंख्या व नागरीकरण पाहता या योजनेचे अद्यावतीकरण होणं गरजेचं होते. शहरावर वाढणारा ताण पाहता पाणी योजनेचेही अद्ययातीकरण करणे गरजेचे होते. याबरोबरच कराड शहराचे सार्वजनिक जीवन सुखकर होण्यासाठी विविध प्रकल्पांची आखणी नव्याने होणे आवश्यक आहे. त्यासाठीच कराड फेज 2 हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्याचा आमचा मानस आहे. त्या दृष्टीने गेले वर्षभर नगरपालिकेच्या विकास कामांचे विविध प्रस्ताव घेऊन शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कराडची गरज ओळखून दोन मोठ्या योजनांना मंजुरी दिली आहे. यामुळे भविष्यातील दोन ते तीन पिढ्यांच्या दृष्टीने उपयुक्त कामे होणार आहेत.
भुयारी गटर योजनेत मूळ शहरासह वाढीव भागात 47 किलोमीटरची नवी पाईप लाईन टाकण्यात येणार आहे. पंपिंग स्टेशन अद्ययावत करण्यात येणार आहेत. बारा डबरेत नवीन एसटीपी बांधण्यात येणार आहे. पाण्याच्या पुनर्वापर नवीन प्लांटही असणार आहे. पाणी योजनेत 2056 साला पर्यंत लोकसंख्येला पुरेल, या पध्दतीने अद्ययावतीकरण होणार आहे. ही योजना सोलरवर चालणार असून जुन्या पाण्याच्या टाक्या नवीन बांधण्यात येतील. एसडीआर ओझोनेशन पद्धतीने पाण्याचे फिल्टरेशन होणार असून कराडकरांना मिनरल वॉटर मिळणार आहे. सोलर बसवण्याने ही योजना नुकसानीतून फायद्यात येणार आहे.
कराडचे निर्माण झालेले पाणी संकट पाहता कोयना नदीतून हँगिंग ब्रिजवरून पाईपलाईन नवीन शुद्धीकरण केंद्रात आणण्याच्या प्रस्तावावर काम सुरू असल्याचे यादव यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला….!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शब्द पाळणारे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी कराडमध्ये शब्द दिला व तो खरा केला. त्यामुळे एकनाथ शिंदे व नेहमी सहकार्य करणारे पालकमंत्री शंभूराज देसाई तसेच संपर्कप्रमुख शरद कणसे व जयवंत शेलार यांचे आभार मानत असल्याचे यादव यांनी सांगितले.
यादव यांना पाठबळ देणार…
शरद कणसे यांनी राजेंद्रसिंह यादव यांच्या पाठीशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना आणि राज्यशासन ताकदीने उभे राहणार आहे. भविष्यात कराडच्या विकासाच्या वाटचालीत जास्तीत जास्त योगदान यादव देतील, असे सांगितले.