कराड-पाटणकरांनी गाजवला महाराष्ट्र!
चांगभलं ऑनलाइन | हैबतराव आडके
कराड-पाटण म्हणजे कृष्णा कोयनेचा प्रतिसंगम. मोती पिकवणारी आणि नवरत्न घडवणारी माती. मग क्षेत्र कोणतेही असो, कराड पाटणकरांनी आजवर महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात तोरण पताका फडकवल्या आहेत. राजकीय क्षेत्रात तर कराड अन् पाटणचा झेंडा कायम फडकत असतो. महाराष्ट्राला पहिले मुख्यमंत्री दिले ते कराडनेच. महाराष्ट्राचे पोलादी पुरुष म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब देसाई हे आपल्याच पाटण तालुक्यातले. अनेक शोधांची जननी कराड आणि पाटण तालुकाचा आहे. इथल्या निसर्गानं, पर्यावरणानं , संस्कृतीने , संस्कारानं कधी कोयनेच्या पाण्यासारखं अवखळ खट्याळ आणि कृष्णाच्या पाण्यासारखं संयमी आणि सर्वगुणसंपन्न बनवला आहे. याची चूणूक राजकीय क्षेत्रातील मंडळींच्या कार्यप्रतिभेमुळे नेहमीच अवघ्या महाराष्ट्राला जाणवत असते. यंदाही नुकत्याच पार पडलेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कराड-पाटण तालुक्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळींनी अवघा महाराष्ट्र गाजवला! याची चर्चाही आपल्या सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात वारंवार होत आहे .
काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण पाटण तालुक्याचे सुपुत्र असले तरी कराड हे त्यांचे कर्मभूमी. त्यांनी सातारा जिल्ह्यातील विविध सभा गाजवल्याचं. पण आपल्या अभ्यासपूर्ण शैलीने केंद्र सरकारच्या विविध धोरणांच्या वर कठोर टीका केली. त्यांनी महाविकास आघाडी तथा इंडिया आघाडीच्या अनेक उमेदवार यांच्या प्रचार सभांना जिल्ह्याबाहेर आवर्जून उपस्थिती लावली. काही ठिकाणी रोड शो केले. त्यांच्या भाषणाला उदंड प्रतिसाद मिळाला. काय ठिकाणी उमेदवारांच्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदा ही घेतल्या. महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणणे याला त्यांनी प्राधान्य दिले होते. सुरुवातीच्या काळात सातारा लोकसभेतून संधी मिळाल्यास काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची त्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती, मात्र हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडला गेला . तरीही कोणतेही शल्या न बाळगता महाराष्ट्रात शरद पवार , उद्धव ठाकरे यांच्या बरोबरीने त्यांनी अनेक सभा गाजवल्या.
पाटण तालुक्याचे सर्वेसर्वा आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराजे देसाई यांचे पाटण तालुका ही कर्मभूमी. ते राहतात सातारा येथे. पण राज्यातील आणि देशातील विविध विषयावर अभ्यासपूर्ण आणि बेधडक टिप्पणी करणाऱ्या शंभूराजे देसाई यांच्या सभा महाराष्ट्रात तेवढ्याच गाजतात. मीडियामध्ये त्यांनी एक शब्द बोलला तरी त्याची बातमी होते. त्यांची ही लोकाभिम वृत्ती, धाडसीपणा, अभ्यासूपणा महायुतीच्या नेत्यांनी अचूक हेरला होता. त्यामुळे त्यांच्या सातारा जिल्ह्या बरोबरच संभाजीनगर, ठाणे , मुंबई अशा कितीतरी ठिकाणी जाहीर सभा आणि रोडशो रॅली शंभूराजे देसाई यांनी केली. बहुतांश सभा त्यांनी महायुतीच्या उमेदवारांच्यासाठी घेतल्या.
साताऱ्याचे माजी खासदार, राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील साहेब म्हणजे उच्चशिक्षित पण ग्रामीण वळणाची फटकेबाजी करणारे अफलातून नेतृत्व. या निवडणुकीत ते स्वतः उमेदवार नव्हते. त्यामुळे पक्षाने त्यांना त्यांच्याकडील सभा गाजवण्याच्या कौशल्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला. ‘ये रे मोऱ्हं’…. ‘आमच्या वेळेला हे असं होतं’… ‘माझ्याकडे आला शरद रावांची गाठ घातली लगेच काम झालं’ अशा कितीतरी कोट्या… प्रसंगावधान दाखवून केलेले विनोद… लोकांच्या सहज पचनी पडतात. ग्रामीण वळणाची भाषा लोकांना आपलीशी करून टाकते. हे ओळखून श्रीनिवास पाटील यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी पेलत संपूर्ण सातारा जिल्ह्यासह शरद पवार यांच्या बरोबरीने महाराष्ट्रात पुणे व इतर ठिकाणी घमासान सभा घेतल्या. सोशल मीडिया वरून त्या भलत्याच व्हायरल झाल्या.
शिवछत्रपतींचे वंशज, महायुतीचे सातारा उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले म्हणजे युवकांच्या गळ्यातील ताईत. त्यांच्या विशिष्ट डायलॉग आणि वेगवेगळ्या वेळी केलेल्या कृती युवकांना भावतात. विशेषता त्यांची कॉलर उडवण्याची स्टाईल महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. ते जेथे कुठे जातील तेथे लोक त्यांना कॉलर उडवून दाखवण्याची अपेक्षा करतात, अट्टाहास करतात. त्यामुळे त्यांचे रोखठोक, कोणाचा मुलाहिजा न ठेवता केलेले भाषण आवर्जून ऐकले जाते. अगदी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना त्यांच्या भाषणाची उत्सुकता असते . कारण कोणत्या वेळी ते काय बोलतील, कोणावर टीका करतील तर कधी कोणाचे गुणगान गातील, याचा अंदाज कोणी गृहीत धरू शकत नाही. त्यामुळेच त्यांचे भाषण हे एक ग्लॅमर म्हणून बघितले जाते. त्यांनी बीड सह महाराष्ट्रात काही ठिकाणी सभा घेतल्या. कॉलर उडवत त्या गाजवल्याही!
शिवसेनेची (उबाठा) मुलुख मैदानी तोफ म्हणून कराड तालुक्यातील बानुगडेवाडी गावचे सुपुत्र नितीन बानुगडे सर्व महाराष्ट्राला परिचित आहेत. एखादा विषय खोलूवून सांगण्याची आणि तसा प्रसंग उभा करण्याची त्यांची हातोटी आहे. ऐतिहासिक दाखले देत असल्याने , आणि विशिष्ट प्रकारचा त्यांचा आवाज हे त्यांचे भाषण गाजवून जातो. त्यामुळे नितीन बानुगडे पाटील यांची सभा आपल्या कार्यक्षेत्रात व्हावी, इंडिया तथा महावीर कसा आघाडीच्या उमेदवारांचा आग्रह होता. मोठी मागणी होती. त्यामधून पुणे, मुंबई , कल्याण, कोल्हापूर, संभाजीनगर आशा कितीतरी ठिकाणी त्यांनी जाहीर सभा घेतल्या. अपेक्षेप्रमाणे त्या गाजल्या . सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. अनेक मुद्दे त्यांनी अभ्यासातून आणि हसत खेळत मांडले. सभेचा परिणाम बघता ते लोकांना भावले.
कराड तालुक्यातील या वक्तृत्व पट्टू नेत्यांनी खरंतर महाराष्ट्र गाजवला. तुफानी शब्द फेक केली. अनेकांच्या भानगडीवर थेट प्रहार केला. सरकारच्या योजना कशा फसव्या आहेत, हे जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न केला. तर काही नेत्यांनी नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदी असावेत , त्याचे कारण मीमांसा लोकांसमोर स्वतःच्या शैलीत मांडली. आपल्या कराड पाटण तालुक्यातल्या या नेत्यांनी जाहीर सभा , रॅली यामधून धडाकेबाज भाषणे केली आहेत. पण प्रत्यक्ष मतदारांच्या वर त्याचा काय परिणाम झाला, कोणत्या उमेदवाराला कोणत्य नेत्याच्या भाषणाचा, सभांचा काही उपयोग झाला का? हे ४ जून नंतरच स्पष्ट होणार आहे. तूर्तास कराड-पाटणच्या आमच्या सर्व पक्ष नेत्यांनी महाराष्ट्र गाजवला, हे मात्र नक्की!