कराड नगरपालिकेस या कामासाठी मिळाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार ; आफिक्रेत झाला गौरव
चांगभलं न्यूज | कराड प्रतिनिधी
पाणी पुरवठा, सांडपाणी व मैला व्यवस्थापनात पर्यावरणपूरक व स्मार्ट यंत्रणांचा वापर आणि स्मार्ट व्यवस्थापन केल्याबद्दल कराड नगरपालिकेस जागतिक पातळीवरील आंतरराष्ट्रीय जल संघटनेतर्फे आऊटस्टॅण्डींग क्लायमेट स्मार्ट युटीलिटी या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
आफ्रिकेतील रवांडा देशातील किगाली या शहरात विशेष कार्यक्रमात कराड नगरपालिकेस गौरवण्यात आले आहे. नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या निर्देशानुसार कार्बन न्युट्रल सिटीज्ची संकल्पना राबवण्यासाठी अहमदाबादच्या सेप्ट युनिव्हर्सिटीचा कराड नगरपालिकेशी सामंजस्य करार झाला आहे. कराड पालिकेच्या वतीने सेप्ट युनिव्हर्सिटीचे प्रोग्रॅम लीड असीम मनसुरी यांनी मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला आहे.
कराड नगरपालिकेच्या पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन व मैला व्यवस्थापन याचे स्मार्ट व्यवस्थापन करण्यात आले आहे. तसेच यासाठी लागणाऱ्या सर्व यंत्रणा स्मार्ट पद्धतीने कार्यरत आहेत. शिवाय सेप्ट युनिव्हर्सिटीच्या वतीने कराड पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या शेडवर 72 किलो वॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. यातून रोज 348 युनिट विजेची निर्मिती होते. ही वीज सांडपाणी प्रक्रिया केंद्राला देण्यात येते. तसेच घनकचरा प्रकल्पातील 1 एकर जागेत 1800 जंगली झाडांचे रोपण करून मियावाकी प्रकल्प साकारण्यात आला आहे. याशिवाय आरोग्य कर्मचाऱ्यांना स्वच्छता विषयक प्रशिक्षण देण्यात येते. यासाठी पालिकेच्या जलनिस्सारण विभागाचे अभियंता एस. आर पवार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी तसेच आरोग्य विभागाचे सहकार्य लाभले आहे.
सेप्ट युनिव्हर्सिटीचे अर्बन प्लॅनर परिक्षित चितोडे यांनी या प्रकल्पांचे डॉक्युमेंटेशन आंतरराष्ट्रीय जल संघटनेकडे केले होते. त्याची दखल घेऊन हा पुरस्कार कराड नगरपालिकेस देण्यात आला आहे.
कराड पालिकेने 2023 सालच्या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये पाच राज्यांच्या पश्चिम विभागात पहिला क्रमांक पटकावला आहे. याबरोबरच आंतरराष्ट्रीय जल संघटनेनेही पालिकेला गौरवल्याने कराडकर नागरिकांनी पालिकेचे कौतुक केले आहे.