कराड मर्चंट देणार घरपोहोच बँकींग सेवा व ५० हजार वैद्यकीय अनुदान – सत्यनारायण मिणियार
कराड मर्चंटची 38 वी वार्षिक सभा खेळीमेळीत ; सभासदांना 11 टक्के लाभांश जाहीर
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड मर्चट सहकारी क्रेडीट संस्थेची नुकत्याच संपलेल्या सन २०२३-२४ या अर्थिक वर्षाची ३८ वी वार्षीक सर्वसाधारण सभा पार पडली. सभेचे प्रास्ताविक संचालक डॉ. शरद क्षीरसागर यांनी केले. यानंतर विषयाचे वाचन झाले. सर्व विषय सर्वानुमते मंजुर झाले. ऐनवेळीच्या विषयामध्ये सभासदांनी मांडलेल्या सुचनेनुसार संस्थेच्या शेअर्सची रक्कम रु.२५०० करावी अशी सुचना मांडली, ती सर्वानुमते मंजुर करण्यात आली. अध्यक्षस्थानी चेअरमन माणिकराव पाटील होते.
सभेस मार्गदर्शन करताना संस्थेचे संस्थापक सत्यनारायण मिणीयार यांनी सांगितले की, संस्थेने नुकत्याच संपलेल्या सन २०२३-२४ या अर्थिक वर्षात गतवर्षीच्या तुलनेत ठेव व कर्जात १० टक्के एवढी प्रशंसनीय वाढ केली असुन संस्थेचा एकत्रित व्यवसाय ७७५ कोटी झाला आहे. चालु वर्षी संस्थेने सर्व सभासदांच्या सहकार्याने संस्थेची गुणात्मक वाढ करीत संस्थेकडून ३१२ कोटीची कर्जे वितरीत केली असुन गत वर्षीच्या तुलनेत वसुली कारवाई व सततचा संपर्क गतिमान ठेवल्याने नक्त एन पी ए शुन्य टक्के राखण्यात यश मिळविले आहे. सभासदांनी संस्थेवर दाखविलेल्या विश्वासामुळे गुंतवणुक मोठी झाली असून संस्थेच्या ठेवी ४६३ कोटीच्या झाल्या आहेत. तर १३ कोटी ४५ लाखांचा ढोबळ नफा झाला आहे. संस्थेचे कामकाज विविध २७ शाखातुन सुरु असुन १९ शाखा स्वमालकीच्या जागेत कार्यरत आहेत तसेच सभासदांना ११ टक्के लाभांश देत आहोत.
मिणियार यांनी पुढे सांगीतले की, बँकीग क्षेत्रात वेगवेगळ्या नवनविन सुविधा उदा. इंटरनेट बँकींग, मोबाईल बँकींग, आरटीजीएस, एन ई एफ टी सेवा उपलब्ध करुन दिल्या असुन, चालु वर्षी संस्थेने वाहन तारण कर्जास विशेष ९ टक्के व्याजदाराची योजना सुरु केलेली आहे तसेच ठेवीमध्ये २१ महिन्याला ९.१० टक्के तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ५७५ दिवसाला १०.१० टक्के विशेष व्याज दर लागु करण्यात आले आहेत, त्याचा सर्व ग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करणेत आले आहे. संस्थेत विविध उपक्रम राबविले जातात त्यामध्ये ८ मार्च महिला दिन, १ आक्टोबर ज्येष्ठ नागरिक दिन, १४ नोव्हेंबर बालदिन साजरे केले जातात. तसेच ग्राहकांना बँकींग सेवा घरपोहच देणार आहोत, त्याचा हि लाभ सभासदांनी घ्यावा.
सभासदांसाठी सभासद कल्याणनिधी योजना सुरु असुन त्यात एकच वेळ पाच हजार रु. भरलेनंतर ५० हजारापर्यंत वैद्यकीय उपचारासाठी अनुदान मिळते. त्याचा ही लाभ घ्यावा, संस्थेची ५०० कोटी ठेवी पुर्णत्वाकडे वाटचाल सुरु असुन त्यात सभासदांनी भाग घ्यावा , संस्थेच्या ठेवी कशा वाढतील यासाठी प्रयत्नशील रहावे. सभासदांच्या पाठींब्यावर लवकरच संस्था १००० कोटी एकत्र व्यवसायाचा टप्पा पुर्ण करेल, असे संस्थेचे संस्थापक श्री सत्यनारायण मिणीयार यांनी सांगितले.
ते म्हणाले , संस्थेचा फक्त बँकींग व्यवसाय करणे, नफा कमविणे हा उद्देश नसुन चालु अर्थिक वर्षात संस्थेने नेहमी प्रमाणे मर्चंट समुहाच्यावतीने सामजिक बांधीलकीचे भान जपत माधवराव जाधव बालसुधार गृह (रिमांडहोम) कराड येथे गोरगरिब विद्यार्थी यांचेसाठी रक्कम रु.११ लाखातुन दोन शालेय वर्गाचे बांधकाम करुन देणेचे काम केले आहे. तसेच कराड नगरीच्या जडण घडणीत महत्वाची भुमिका बजावत असलेल्या लिबर्टी मजदुर व्यायाम मंडळ यांना ७ लाख ५१ हजार रुपयांची देणगी व्यायाम साहित्य व क्रिडा विकासासाठी दिली आहे. तसेच प्रांताधिकारी, तहसिलदार कराड यांचे कार्यालयात येणाऱ्या लोकांची गैरसाय होवु नये म्हणुन बसण्याचे एअर पोर्ट खुर्चांचे संच व सुशोभिकरणाचे साहित्य देण्यात आले आहे. दि.१ जुलै रोजी जागतिक कृषीदिन व आदरणीय पी डी पाटील साहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधुन रिमांडहोम येथे प्रांताधिकारी कराड, तहसिलदार, उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्या हस्ते वृक्षरोपणाची सुरुवात करणेत आली व संस्थेच्या सर्व शाखांमधुन वृक्षारोपण करणेत आलेले आहे तसेच ज्येष्ठ सभासदांनी संस्थेच्या योजनाचा फायदा घ्यावा, असे आवाहन केले.
यानंतर संस्थेच्या कार्यक्षेत्रातील ज्या शेतकरी सभासदांनी विक्रमी उत्पादन घेतले यामध्ये पुसेगाव येथील शंतनु प्रल्हाद जाधव यांनी एकरी २० ते २५ टन आले उत्पादन घेतले, वाठार कि. येथील शिवानंद किसन गायकवाड यांनी ५ एकरात १५५ गाडी आले उत्पादन घेतले, हेळगाव येथील युवराज वसंतराव पाटील यांनी २० गुंठे क्षेत्रात ६८ टन ऊसाचे उत्पादन घेतले या कामगीरीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला
सभेस संबोधताना संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक माटेकर यांनी विविध विषयांचा आढावा घेतला. यावेळी संस्थेचे व्हा चेअरमन शिवाजीराव जगताप व सर्व संचालक उपस्थित होते. यावेळी संचालिका सौ. अरुणा चव्हाण यांनी सर्व सभासद, ग्राहकांचे आभार मानले. तसेच सर्व सेवकांनी विशेष प्रयत्न व चांगले कामकाज केलेबद्दल त्यांचे कौतुक केले.