Karad | महादेवराव मनवकर तमाशा मंडळ सादर करणार ‘पारंपरिक तमाशा!’
बेल्हे लावणी महोत्सवात मिळालीय संधी
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
तमाशा सम्राट संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांच्या पुण्यतिथी निमित्त पुणे जिल्ह्यातील बेल्हे (ता. जुन्नर ) गावात होणाऱ्या लावणी महोत्सवात कराडचा सांस्कृतिक ठेवा म्हणून ओळख असणाऱ्या तमाशा सम्राट महादेवराव मनवकर यांचा लोकनाट्य तमाशा पारंपारिक पद्धतीने दिनांक 2 डिसेंबर रोजी सादर होणार आहे. सवाल-जवाब पायपेटी, सुरतींची झेल असं बरंचकाही या पारंपारिक सादरीकरणात रसिकांना पाहायला मिळणार आहे.
महाराष्ट्राचे वैभवशाली तमाशा सम्राट संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांच्या पुण्यतिथी निमित्त तमाशा कलावंताचे आश्रयदाते बेल्हे गावचे सुपुत्र वसंतराव जगताप यांच्या नियोजनाने बेल्हे नगरीमध्ये तमाशा महोत्सव व लावणी महोत्सव प्रत्येक वर्षी सादर होत असतो. यंदा दिनांक 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2023 या कालावधीत हा तमाशा महोत्सव व लावणी महोत्सव होत आहे. त्यामध्ये कराडचा सांस्कृतिक ठेवा असणाऱ्या तमाशा सम्राट महादेव मनवकर लोकनाट्य तमाशा मंडळ मनव या तमाशा मंडळास पारंपारिक तमाशा सादरीकरण करण्यासाठी दिनांक 2 डिसेंबर 2023 रोजी सकाळी साडेदहा वाजता संधी दिली गेली आहे.
पारंपारिक तमाशा असा असणार…
आताचा तमाशा रंगीतसंगीत आहे. काळानुसार त्यामध्ये बदल होत आला आहे. मात्र मुळचा तमाशा कसा होता ते रसिकांना या पारंपारिक तमाशामध्ये बघायला मिळणार आहे. या तमाशा सादरीकरणात पारंपरिक वाद्य म्हणजे हार्मोनियम, पाय पेटी, हलगी, ढोलकी, टाळ, तुणतुणे, पारंपारिक गणगवळण, छक्कड, सवाल-जवाब, सुरतींची झेलकरी, पोवाडा, शिलकार, वगनाट्य तिला म्हणणी, समाज प्रबोधन असं बरंचकाही पारंपारिक महादेवराव मनवकर लोकनाट्य तमाशात पहायला मिळणार आहे. हा तमाशा पूर्ण पारंपारिक असतो. तमाशाचा मुळचा बाज यामध्ये पहायला मिळणार आहे.
हा महादेवराव मनवकर तमाशा मंडळाचा सन्मान…
“महाराष्ट्रातील सर्व तमाशा फड मालक व कलावंत यांच्या आशीर्वादाने तसेच रसिक मायबाप यांच्या आशीर्वादाने आमच्या शब्दाला मान देऊन जगताप अण्णांनी आम्हाला बेल्हे गावात होणाऱ्या तमाशा महोत्सवात पारंपारिक तमाशा सादरीकरणाची संधी दिली. हा आमच्या तमाशा मंडळाला मिळालेला एक बहुमान आहे. तमाशा रसिकांनी यावेळी आवर्जून हजेरी लावून आनंद घ्यावा.”
– महादेवराव मनवकर