‘फेज टू’ मध्ये कराड शहर कात टाकणार ; राजेंद्रसिंह यादव यांचा विश्वास ; 209 कोटींबद्धल कराडकरांकडून सत्कार
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
भुयारी गटार योजना, पाणी पुरवठा योजना या गावाच्या योजना आहेत. या योजनांचे काळानुरूप अद्ययावतीकरण होणे आवश्यक होते. त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून सुमारे 209 कोटी रूपयांचा निधी आणला. मी कोणतेही उपकार केलेले नसून गावाप्रती कर्तव्य केले आहे. वाढते नागरीकरण पाहता शहरी नव्याने जडणघडण होणे आवश्यक असून स्मार्ट कराडसाठी आवश्यक असणारया विकासकामांचा समावेश फेज टुमध्ये केला आहे. या माध्यमातून कराड शहर नव्याने कात टाकेल, असा विश्वास यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव यांनी व्यक्त केला.
शहरी भुयारी गटार योजना, पाणी योजनेसह अन्य विकासकामांसाठी सुमारे 209 कोटी रूपयांचा निधी आणल्याबद्दल कराडकर नागरिकांच्या वतीने राजेंद्रसिंह यादव यांचा सत्कार अर्बन शताब्दी सभागृहात अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी व कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या सत्काराला कराडकरांनी मोठी गर्दी केली होती. दोन्ही योजनांचे सादरीकरण प्रकल्पाचे तज्ञ सल्लागार माधव जवादे यांनी केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांया नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी स्वत:साठी काहीही मागितले नव्हते. शहरासाठी मागितले. योजनांचे डीपीआर बनवले. पैसे वाढत गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 100 कोटी देण्याचा शब्द दिला होता. तो पाळल्याने शहराच्या पुढील 50 वर्षांच्या कामाला चालना मिळाली आहे. पाणी योजना व भुयारी गटर योजनी कामे मूळ शहरासह वाढीव भागात जास्त प्रमाणात होणार आहेत. यासाठी रस्ते टप्प्याटप्प्याने उकरले जातील. ते पुर्ववतही केले जातील. यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. नागरिकांया सुचनांचाही विचार केला जाईल. टाऊन हॉल आणि रविवार पेठ टाकी व वाढीव भागात दोन टाक्या बांधण्यात येणार आहेत. एकूण 52 किलोमीटरची वितरण नलिका टाकण्यात येणार आहे. तर ड्रेनेज योजनेची 46 किलोमीटरची पाईप नव्याने टाकण्यात येणार आहे. हद्दवाढ भागात जास्त प्रमाणात कामे होणार आहेत. या भागात रस्ते जास्त नाहीत. आहेत तेही उकरावे लागणार आहेत. त्यामुळे या भागात सिमेंट रस्त्यांसाठी 150 कोटी रूपयां प्रस्ताव सादर केला आहे. कराडच्या दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांया पुतळयाचा चबुतरा दुरूस्तीची मागणी वारंवार होत आहे. यासाठी चबुतरा मजबुतीकरण व सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजनमधून सुमारे 4 कोटी 68 लाख रूपयांच्या कामालाही मंजुरी मिळणार आहे, असे राजेंद्रसिंह यादव यांनी सांगितले.
विविध प्रकल्पांची आखणी…
यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी ऑडिटोरियम, म्युरल्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महात्मा फुले पुतळा सुशोभीकरण, मल्टीपर्पज पार्किंग व कॉम्प्लेक्स, भुईकोट किल्ल्याचे जतन, संरक्षक भिंतीवर 30 फुटी रस्ता, चौक सुशोभीकरण, सोलर पार्क, भाजी मंडई, फिश मार्केट, अशा विविध प्रकल्पांची आखणी केली आहे. त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहितीही यादव यांनी यावेळी दिली.
माजी नगरसेविका स्मिता हुलवान यांनी प्रास्ताविक केले. हणमंत पवार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ऍङ राजाभाऊ पाटील, सुभाष डुबल, विजय वाटेगावकर, एकनाथ बागडी, राजेंद्र माने, अर्जुन कोळी, प्रमोद पाटील, अनिल घराळ, सागर बर्गे, मनोज माळी उपस्थित होते.
2056 सालपर्यंत पाणी आरक्षणास मंजुरी…
पाणी योजनांच्या यशस्वीतेसाठी नदीतून पाणी उचलण्याला परवानगी मिळणे आवश्यक आहे. कृष्णा लवादामुळे भविष्यात अशी वेळ येईल की, पाणी योजनेसाठी पैसे येतील परंतु नदीतून पाणी उचलण्याचा परवाना नसेल. कराडची 2056 सालापर्यंती 3 लाखापर्यंत पोहोचणारी लोकसंख्या लक्षात घेऊन तितके पाणी कृष्णा नदीतून उचलण्यास शासनी मंजुरी घेतली आहे. त्यामुळे कराडकरांचा पाण्याचा प्रश्न मिटणार असल्यचे यादव यांनी सांगितले.
नव्या नेतृत्वाचा स्मार्ट सिटीचा संकल्प नाविण्यपूर्ण-सुभाषराव जोशी…
राज्यात सरकार बदलले. नवीन लोक सत्तेवर आले. त्यांचा प्रीतिसंगम घडवून राजेंद्रसिंह यादव यांनी गावासाठी निधी आणण्याचे काम केले आहे. त्यांच्यासारख्या नव्या नेतृत्वाने स्मार्ट कराडचे स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात आणण्यासाठी काम करणे हेच नाविण्यपूर्ण आहे. विचारपूर्वक नियोजन, गावाचे भविष्य व जुन्यानव्यांचा संगमही यादव यांनी घडवला आहे. यामुळे कराड शहराला वेगळी ओळख मिळेल, असे सुभाषराव जोशी यांनी आपल्या भाषणात सांगितले.