कराडकरांसाठी अभिमानाची बाब! पुष्कराज कुलकर्णी सीए परीक्षेत यशस्वी

कराड, दि. ११ जुलै | चांगभलं वृत्तसेवा
येथील पुष्कराज राहुल कुलकर्णी यांनी प्रथितयश चार्टर्ड अकाउंटंट (CA) परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. पुष्कराज हे कराडचे नामवंत चार्टर्ड अकाउंटंट पी. एल. कुलकर्णी यांचे नातू आहेत. ते कर सल्लागार राहुल कुलकर्णी आणि सौ. शिल्पा कुलकर्णी यांचे सुपुत्र आहेत.
पुष्कराज यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कराडमधील कृष्णा इंग्लिश स्कूलमध्ये झाले. महाविद्यालयीन शिक्षणही कराडमध्ये पूर्ण करत त्यांनी सीएच्या अंतिम परीक्षेत यश संपादन केले असून, त्यांना चार्टर्ड अकाउंटंट ही पदवी प्राप्त झाली आहे.
शैक्षणिक यशासोबतच पुष्कराज यांनी क्रीडा क्षेत्रातही आपली चमक दाखवली आहे. बॅडमिंटन खेळात त्यांनी जिल्हा, राज्य आणि विद्यापीठ स्तरावर अनेक पदके मिळवली असून, त्यांनी राष्ट्रीय ‘खेलो इंडिया’ स्पर्धेतही सहभाग नोंदवला होता.
पुष्कराज यांच्या या यशाबद्दल कराडसह जिल्हाभरातून त्यांचे कौतुक होत आहे.