राज्याच्या नकाशावर ‘कराड बसस्थानका’चा स्वच्छतेचा ठसा : ‘अ’ वर्गात पटकावलं मानाचं स्थान; म्हसवड, मेढा बसस्थानकांचीही जिल्ह्याच्या यशात भर

कराड, दि. १४ जुलै | चांगभलं वृत्तसेवा
राज्यभरातील एस.टी. बसस्थानकांच्या स्वच्छता स्पर्धेत कराड आगाराच्या बसस्थानकाने ‘अ’ वर्गात तृतीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) यांच्या हिंदुहॄदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ या राज्यस्तरीय सर्वेक्षणातून कराड बसस्थानकाची झालेली निवड ही परिसरातील सर्वांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
या स्पर्धेअंतर्गत मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या मूल्यांकनात स्वच्छता, सुविधा व्यवस्थापन, प्रवासी अनुभव, नागरिक सहभाग या विविध निकषांचा समावेश करण्यात आला होता. कराड बसस्थानकाने या सर्व निकषांमध्ये १०० पैकी ७९ गुण मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेत पुणे विभागात ‘अ’ वर्गात तिसरा क्रमांक पटकावला.
या यशाबरोबरच या स्पर्धेत सातारा जिल्ह्याने स्वच्छतेच्या लढतीत आघाडीचे स्थान टिकवले. मेढा बस स्थानकाने ‘क’ वर्गात प्रथम क्रमांक, तर म्हसवड बसस्थानकाने ‘क’ वर्गात तृतीय क्रमांक मिळवून जिल्ह्याच्या यशात भर घातली.
कराड आगार व्यवस्थापक, कर्मचाऱ्यांची कार्यतत्परता, स्थानिक प्रशासनाचा पाठिंबा आणि प्रवासी, नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद यामुळेच हे यश शक्य झाल्याचे एसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांगितले.
या उल्लेखनीय यशाबद्दल कराड, मेढा व म्हसवड एसटी आगारांचे सर्व अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी व प्रवासी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या सन्मानामुळे परिसरात पुन्हा एकदा बस स्थानकाच्या स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण होण्यास हातभार लागेल, अशी प्रतिक्रिया प्रवासी व नागरिकांतून उमटत आहे.