काका म्हणजे कार्यसम्राट, त्यांचा विचार नेहमी प्रेरणा देत राहील ; काडसिद्धेश्वर स्वामीजी
कोयना दूध संघात विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

कराड प्रतिनिधी | हैबत आडके
स्वर्गीय विलासकाकांना ‘काका’ असे म्हटले जाते. काका म्हणजे कर्मट कार्यकर्ता… काका म्हणजे कार्यसम्राट! एक व्यक्ती आयुष्यात एवढं मोठं कार्य करू शकते याची कल्पनाही करणे अवघड आहे, इतके मोठे त्यांचे कार्य आहे. कोयना दूध संघाने त्यांचा पुतळा उभा करून ‘काका आणि त्यांचे कार्य’ हे नव्या पिढीला चिरंतन स्मरणात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. या माध्यमातून विलास काकांचे विचार, त्यांचे जीवन कार्य नेहमीच प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन श्री क्षेत्र सिद्धगिरी मठाचे मठाधिपती परमपूज्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी केले.
कोयना दूध संघात लोकनेते, माजी मंत्री, स्व. विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पालकमंत्री ना. शंभूराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली परमपूज्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. याप्रसंगी स्वामीजी बोलत होते. माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण, राज्यसभा खासदार नितीनकाका पाटील , जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, ज्येष्ठ नेते व कोयना दूध संघाचे संचालक वसंतराव जगदाळे, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, एडवोकेट उदयसिंह पाटील उंडाळकर, युवा नेते अदिराज पाटील-उंडाळकर, कोयना दूध संघाचे चेअरमन लक्ष्मण देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव जाधव, कार्यकारी संचालक अमोल गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
काका रागवले म्हणजे आपलं ‘काम’ झालंच असं कार्यकर्ते समजत…
काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी यावेळी बोलताना स्वर्गीय विलासकाकांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, मी एकदा काकांना म्हटलं की काका तुम्ही नास्तिक आणि मी आस्तिक , तेव्हा आपलं कसं जमायचं? त्यावर काका म्हटले की विज्ञाननिष्ठ माणसं कुठेही असली तरी त्यांच्याशी आमचं जमतंच. काका उन्नत विचारांचे होते, न डगमगणारा आणि सर्वांचा लाडका नेता , असा त्यांचं कर्तृत्व होतं. काका रागीट होते, पण करूण दृष्टी त्यांच्याकडे होती. मी अनेकदा असं ऐकलं की लोक म्हणत काकांनी एखाद्या कार्यकर्त्याला शिव्या घातल्या, किंवा त्याला रागवले तर त्याचं काम झालंच म्हणून समजून जायचं. काका आयुष्यभर एकाच पक्षात राहिले, त्याबाबत ही ते मला म्हटले होते की आमचं घर स्वातंत्र्य सैनिकांचे आहे. हा वारसा, हा विचार सोडून मी कुठेही जाणार नाही. हा काकांचा विचार जपण्याचे काम त्यांचे पुत्र उदयसिंह पाटील करत आहेत.
कोणाला नेता बनवायचं अन नाही हे ज्या-त्या वेळी काळ ठरवतो…
सध्या तरी काकांच्या मार्गदर्शनाखाली ज्या संस्थांचा विकास झाला, त्या संस्था अधिक सक्षमपणे चांगल्या चालवण्याचा माझा प्रयत्न असून राजकीय वगैरे सध्या काही माझ्या डोक्यात नाही., ते ज्या-त्यावेळी काळ ठरवत असतो, कोणाला नेता बनवायचं आणि कोणाला नाही हे काळ ज्या-त्यावेळी ठरवेल, असं उदयसिंह पाटील यांचं म्हणणं असल्याचं काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी सांगितलं.
सामान्य कुटुंबातील लोकांना काकांनी त्यांच्या संस्थांमध्ये नेतृत्वाची संधी दिली….
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महाराष्ट्राचा दरडोई दुधाच्या वापरामध्ये नववा क्रमांक लागतो. ही सरासरी पंजाब हरियाणा गुजरातच्या तुलनेत फारच कमी आहे, ती वाढली पाहिजे, त्यामुळे या क्षेत्रात काम करण्याला खूप संधी आहे, या क्षेत्राला उर्जित अवस्था आणि शक्य आहे.
स्वर्गीय विलासकाकांनी सामान्य माणसाची नाळ जोडून ठेवली होती. सत्तेचे विकेंद्रीकरण त्यांनी प्रत्यक्षात करून दाखवलं. त्यांच्या सर्व संस्थांमध्ये सामान्य पार्श्वभूमी असणाऱ्या घरातील व्यक्तींना त्यांनी नेतृत्वाची संधी दिली आणि हीच माणसं काकांच्या सोबत आयुष्यभर प्रामाणिक राहिली . काकांचा हा विचार जपण्याचं काम अगदी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचे पुत्र उदयसिंह पाटील-उंडाळकर करत आहेत. किंबहुना विलासकाकांच्याही दोन पावलं पुढं जाऊन उदयदादांनी मोठं काम उभा करावं, अशी अपेक्षा आ. चव्हाण यांनी व्यक्त केली.
साडू म्हणून सांगतो उदयदादांनी आता मनावर घेतलं पाहिजे…
पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, सहकाराचं नेतृत्व करण्याची संधी पश्चिम महाराष्ट्राला मिळाल्याने आपल्या भागाची आर्थिक दृष्ट्या प्रगती झाली. राजकीय जोडे बाजूला ठेवून काम केलं तर सहकारी संस्था चालवणे अवघड नाही , हा मंत्र सहकार मंत्री असताना स्वर्गीय विलासकाकांनी घालून दिला होता. त्याच विचाराने कोयना दूध संघ आणि इतर सहकारी संस्था सुरू आहेत. कोयना संघाच्या फ्रॅंचाईजी घेण्यासाठी मोठी मागणी होत असून ही संघ उत्तमरीत्या चालवल्याची पोचपावती आहे.
स्वर्गीय विलासकाकांनी तब्बल 35 वर्ष कराड दक्षिण मतदार संघाचे नेतृत्व केलं. ते सामान्य कार्यकर्त्याच्या खंबीर पाठबळामुळे. मतदार संघातील शेवटच्या टोकावरील, दुर्गम वस्त्यांमधील कोणत्याही माणसाला विलासकाका थेट नावाने बोलवायचे. हे असं काहीतरी उदयदादांनी शिकलं पाहिजे, त्यांचा थोरला साडू म्हणून मला हे नक्कीच सांगण्याचा अधिकार आहे. पण उदयदादांनी हे मनावर घेतलं पाहिजे. स्वर्गीय विलासकाकांचा एक पुतळा मार्केट कमिटीने उभा केला आहे, दुसरा पुतळा दूध संघावर अनावरण होत असून रयत साखर कारखान्यावरील लवकरच तिसरा पुतळा अनावरण होणार आहे, नव्या पिढीला विलास काकांचे कार्य समजण्यासाठी अशी स्मारक उभा राहिली आहेत, हे स्तुत्य असल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले.
माझ्यासाठी सत्ता गौण.. सामान्य माणसांसाठी संघटना चालवणार…
एडवोकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी प्रास्ताविकात स्वर्गीय आर डी पाटील यांनी जो उद्देश ठेवून कोयना दूध संघाची स्थापना केली, ते काम पुढे नेण्याचं कार्य काकांनी केल्याचं सांगितलं. कराड पाटण तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून त्याचा आर्थिक स्तर उंचावण्याचे काम काकांनी केले. काकांनी संघाचे नूतनीकरण करून नवी यंत्रणा उभा केली, दूध व दुग्धजन्य पदार्थांना मार्केट उपलब्ध करून दिले. आज संघाच्या माध्यमातून सुरू असलेल्या सर्व संस्था आर्थिक दृष्ट्या सक्षमपणे सुरू आहेत. शिखर संस्थांमध्ये काकांचे शिल्प उभा करण्याचा मानस सभासद आणि संचालकांचा होता, तो आज पूर्णत्वास जात आहे. काका गेले तेंव्हापासून मी आजही हेच सांगत आहे माझ्यासाठी सत्ता ही गौण आहे. सर्वसामान्य माणसांसाठी संघटनेच्या माध्यमातून चालत राहणार आहे.
प्रारंभी स्वर्गीय आर.डी. पाटील, स्वर्गीय विलासकाका पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कोयना दूध संघाचे अध्यक्ष लक्ष्मण देसाई, ज्येष्ठ संचालक वसंतराव जगदाळे, उपाध्यक्ष शिवाजीराव जाधव व संचालकांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमास बाजार समिती, खरेदी विक्री संघ, रयत साखर कारखाना, कोयना बँक आदी संस्थांचे पदाधिकारी, रयत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते, कोयना दूध संघाचे सर्व संचालक, कर्मचारी, सभासद, दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.