धैर्यशील कदमांनी स्पष्टच सांगितलं की “कराड उत्तरचं विधानसभेचं तिकीट नाही मिळालं तर….” – changbhalanews
राजकिय

धैर्यशील कदमांनी स्पष्टच सांगितलं की “कराड उत्तरचं विधानसभेचं तिकीट नाही मिळालं तर….”

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
भाजपचे जिल्हाध्यक्ष व कराड उत्तरचे नेते धैर्यशील कदम हे कराड उत्तर विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे. तशी तयारी त्यांनी सुरू केली आहे. मात्र भाजपमधील बंडखोरीचा विरोधी उमेदवाराला अजिबात फायदा होऊ द्यायचा नाही, अशी ठाम भूमिका घेत धैर्यशील कदम यांनी कराड उत्तर विधानसभेच्या निवडणुकीबाबत रोखठोक व सडेतोड भूमिका मांडली आहे.

सातारा जिल्ह्यात कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ नेहमीच केंद्रस्थानी आणि चर्चेत राहिला आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा हा मतदार संघ. चार तालुक्यात विस्तारलेला हा मतदार संघ त्यामधील अनेक प्रश्नांमुळे सातत्याने चर्चेत राहिला आहे. या विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीबाबत भाजप पक्षाची भूमिका काय आहे, स्वतः जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांची भूमिका कशी राहणार आहे , याबाबत त्यांनी ‘महाराष्ट्र लाईव्ह न्युज’ या चॅनलने घेतलेल्या मुलाखतीत सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे.

कदम म्हणाले, बंडखोरीचा फायदा विरोधी उमेदवाराला होतोय, हे पाठीमागील निवडणुकीमध्ये आम्ही पाहिलं आहे. त्यामुळे मी स्वतः असो किंवा मनोजदादा घोरपडे असोत, की रामकृष्ण वेताळ साहेब असोत किंवा भीमरावदादा पाटील असोत , आमच्यापैकी ज्याला कुणाला तिकीट मिळेल, त्याच्यामागे आम्ही सर्वजण ठाम उभे राहणार असून सर्व शक्तीनिशी कराड उत्तरची निवडणूक लढवणार असून काहीही झालं तरी विद्यमान आमदारांना घरी बसवणार आहे.

2007 पासून कराड उत्तर मतदार संघात मी सातत्याने जनतेचा आवाज बनून काम करत राहिलो आहे. निवडणुकीत हार-जीत होत असते. माझा पराभव झाला पण खचलो नाही. पाठीमागच्या निवडणुकीत मला तिकीट मिळाले मात्र मनोजदादा घोरपडे हे शेतकरी संघटनेच्या तिकिटावर उभा राहिले, आमच्यात मतांची विभागणी झाली, त्याचा फायदा विद्यमान आमदारांना झाला. आताही मला तिकीट मिळावे यासाठी मी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहे, तिकीट मिळावे अशी माझी इच्छा ही आहे. पण जरी मला तिकीट नाही मिळाले आणि पक्षाकडून अन्य कोणालाही मिळाले तरी त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणार आहे. त्यामुळे भाजपमध्ये बंडखोरी होईल हे आता विसरून जा. ‘हा उभा राहणार… तो ही उभा राहणार… ‘ असं म्हणत पायात साप सोडायचे विरोधकांचे प्रयत्न यावेळी यशस्वी होणार नाहीत. काहीही झालं तरी मतदार संघात आमच्याकडून एकजणच उभा राहील.

सुरुवातीला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर गेली 40 वर्ष हा मतदारसंघ एकाच घरात राहिला आहे. विद्यमान आमदार गेली 25 वर्षे प्रतिनिधित्व करत आहेत पण मतदार संघातील प्रश्न जसेच्या तसे आहेत. शामगावचा पाणी प्रश्न, पाचुंदचा पाणी प्रश्न, अशा कितीतरी गावांचे पाणी प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. त्यासाठी आंदोलने करावी लागतात. तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या माध्यमातून व आम्ही राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून आणलेल्या कामांचे नारळ फोडायला विद्यमान आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते पुढे पुढे करतात. पण त्यांनी एकच काम आणलं, ते म्हणजे सह्याद्री कारखान्यासमोरच्या पुलाचं. तेवढं काम सोडलं तर त्यांनी आणलेलं दुसरं काम कोणतं? , असा थेट सवाल धैर्यशील कदम यांनी उपस्थित केला.

ते म्हणाले, महेश शिंदे कोरेगावचे आमदार झाले. त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवला. त्यांच्या भागातील शेतीला दोन-दोन टीएमसी पाणी मिळतेय. पण कराड उत्तर मधल्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी अद्याप मिळत नाही. विद्यमान आमदार हे पूर्वी पालकमंत्री होते, त्यांचे सरकार होते, पण पाणी प्रश्न सोडवण्यासाठी ठोस प्रयत्न त्यांच्याकडून झाले नाहीत. हणबरवाडी-धनगरवाडी सारखी योजना तर त्यांच्या वडिलांचे स्वप्न होते, त्यासाठी देवेंद्रजी फडणवीस यांनी निधी दिला , आदरणीय पृथ्वीराज चव्हाण यांनी सुध्दा निधी दिला, पण विद्यमान आमदारांना काही निधी मिळवता आला नाही, त्यामुळे ते स्वप्न अद्यापपर्यंत अपूर्णच राहिले आहे.

निसरे फाटा, मल्हारपेठ पासून येणारा व या मतदार संघातून पंढरपूरकडे जाणारा रस्ता हा विशेष महत्त्वाचा समजला जातो. पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या वारकऱ्यांचा रस्ता समजला जातो. या 60 किलोमीटरच्या रस्त्याच्या कामासाठी केंद्र सरकारकडे आम्ही पक्षाच्या माध्यमातून पाठपुरावा केला. त्यामुळे तब्बल 480 कोटी रुपये मंजूर झाले. मात्र नारळ फोडायला आमदारांचे कार्यकर्ते पुढे होते. ते पालकमंत्री असताना आमच्या कार्यकर्त्यांचा अतोनात छळ झाला. आमच्या कार्यकर्त्यांच्या ताब्यातील सहकारी संस्थांची अडवणूक झाली. कार्यकर्त्यांना विनाकारण तुरुंगात घातले गेले. पोलीस मागे लावले, ग्रामसेवक मागे लावला, तलाठी मागे लावला, आमचे कारखाने बंद पाडण्याचे उद्योग केले गेले, हे आम्ही आणि आमचे कार्यकर्ते कोणीही विसरलेलो नाही. त्यामुळे काहीही झालं तरी यावेळी विद्यमान आमदारांना घरचा रस्ता दाखवायचाच असं जनतेनेच ठरवलं आहे, असे धैर्यशील कदम यांनी सांगितले.

दरम्यान , धैर्यशील कदम यांनी या मुलाखतीमध्ये मांडलेल्या सडेतोड आणि परखड भूमिकेचे पडसाद कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात उमटणे स्वाभाविक आहे. दस्तर खुद्द भाजपच्या आणि विरोधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यमान आमदारांच्या गोटातून,आता याबाबत काय प्रतिक्रिया येतात, याची उत्सुकता कराड उत्तर मधील जनतेला लागली आहे.

 

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close