चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
दैनिक पुढारीचे उपसंपादक चंद्रजीत पाटील यांनी शनिवार, १८ नोव्हेंबर रोजी पाटण – कराड – सातारा – भोर फाटा – लोणंद – वाढे फाटा (सातारा) – कराड ते पुन्हा पाटण या मार्गावरील ३०० किलोमीटरची सायकल स्पर्धा (बीआरएम) १७ तास ४६ मिनिटात पूर्ण केली. ही स्पर्धा २० तासात पूर्ण करावयाची होती पण चंद्रजीत पाटील यांनी जवळपास सव्वा दोन तास अगोदरच स्पर्धा पूर्ण केली.
गत महिन्यात ६०० किलोमीटरची बीआरएम सायकल स्पर्धा पूर्ण करत चंद्रजीत यांनी सायकलिंग क्षेत्रातील प्रतिष्ठेचा एसआर किताब पटकावला आहे. कराड तालुक्यातील पहिले एसआर होऊन त्यांनी आदर्श निर्माण केला आहे. चंद्रजीत यांच्यापासून प्रेरणा घेत कराडमधील ज्येष्ठ सायकलिस्ट रविराज जाधव हे शनिवारी प्रथमच या स्पर्धेत उतरले होते. त्यांना स्पर्धेत मदत व्हावी म्हणून चंद्रजीत या स्पर्धेत सहभागी झाले होते. बीआरएम स्पर्धेत सायकल पंक्चर झाली अथवा अन्य प्राॅब्लेम झाल्यावर कोणाचीही मदत घेता येत नाही. स्वत: सर्व प्राॅब्लेम दूर करावे लागतात आणि कोणाची मदत घेतल्यास स्पर्धेतून बाद केले जाते. मात्र राईडमध्ये सहभागी राईडर दुसऱ्या राईडरला मदत करू शकतो. त्यात वेळेचे गणित जुळवावे लागतं. म्हणूनच ही स्पर्धा खडतर मानली जाते. त्यातच शुक्रवारी कराडमध्ये मध्यरात्री दोन वाजता मनोज जरांगे पाटील यांची सभा संपली आणि त्यानंतर कार्यालयीन कामकाज आटोपल्यानंतर ते रात्री तीन वाजता स्पर्धेसाठी रवाना झाले. त्यामुळे गुरूवारी रात्रीनंतर झोपच घेता न आल्याने शनिवारी रात्री स्पर्धा पूर्ण होईपर्यंत झोपेवर नियंत्रण मिळवत स्पर्धा पूर्ण करण्याचे आव्हान चंद्रजीत यांच्यापुढे होतं.
पहाटे ४ वाजता पाटणला पोहचून सायकल चेक करणे आवश्यक होते आणि त्यानंतर पहाटे ५ वाजता स्पर्धा सुरू झाली. पाटण – भोर फाटा – लोणंदपर्यंत १९० किलोमीटर अंतर पार केल्यावर रविराज जाधव यांना दुपारी साडेतीन वाजता भर उन्हात सात ते आठ तास सायकलिंग केल्याने क्रॅम्प येऊ लागले. त्यानंतर उर्वरित ११० किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी रविराज जाधव यांना पायाला रिलीफ मिळावा, यासाठी मसाज करत मार्गक्रमण करावं लागलं. या राईडमध्ये चिपळूणचे स्वप्नील खेडकर या सायकलिस्टची सायकल पंक्चर झाली होती. खेडकर यांना पंक्चर काढण्याचा अनुभव नसल्याने चंद्रजीत यांनी त्यांच्या सायकलचा पंक्चर काढून दिला आणि त्यामुळे चंद्रजीत यांना स्पर्धा पूर्ण करण्यासाठी या सर्वांमुळे जवळपास काहीसा जादा वेळ लागला खरा. मात्र चंद्रजीत यांच्यामुळे त्यांच्या सोबतच्या अन्य दोन सायकलिस्ट यांना ही स्पर्धा पूर्ण करता आली.
गुरूवारी रात्रीनंतर शुक्रवारी रात्री एक मिनिटही झोप मिळाली नसताना शनिवारी दिवसभर सायकलिंग करत स्वतः स्पर्धा पूर्ण करत आणि इतरांना सहकार्य करून त्यांच्या राईड पूर्ण करण्यासाठी मदत करून निर्धारित वेळेपूर्वी सव्वा दोन तास अगोदरच त्यांनी स्पर्धा पूर्ण केली आणि एक स्ट्राॅग रायडर असल्याचे दाखवून दिले. दरम्यान, या गौरवास्पद कामगिरीबद्दल चंद्रजीत पाटील यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. चांगभलं न्यूज समुहाकडूनही त्यांचे विशेष अभिनंदन….!!