पावसात वडिलांच्या डोक्यावर मुलाची छत्री; जयंत पाटलांच्या शुभेच्छा पोस्टमधून प्रतीकच्या संस्कारांचं दर्शन

कराड प्रतिनिधी, दि. १९ जुलै | चांगभलं वृत्तसेवा
पावसाच्या रिमझिम सरी, मोकळ्या आकाशाखाली काही खुर्च्या, आणि त्यात एक वडील—काही कामानिमित्त त्यांच्याकडे आलेल्या लोकांच्या महत्त्वाच्या कागदपत्रांच्या वाचनात मग्न. त्यांच्याशेजारी शांतपणे बसलेला त्यांचा मुलगा—पण त्याने डोक्यावर धरलेली छत्री वडिलांसाठी! हे दृश्य आहे जयंत पाटील आणि त्यांचा मुलगा प्रतीक पाटील यांचं.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी जलसंपदामंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी त्यांचा मुलगा प्रतीक पाटील यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर हा कुटुंबवत्सल फोटो शेअर करत भावनांनी भरलेला एक खास संदेश पोस्ट केला आहे. मात्र, त्या शब्दांइतकाच, फोटोही बोलका आहे.
“माझा मुलगा म्हणून तुझ्याकडे पाहताना मला प्रचंड अभिमान वाटतो,” असं लिहित जयंत पाटलांनी प्रतीकच्या सामाजिक कार्याला आणि शेतकरीहितासाठीच्या पुढाकाराला गौरवले आहे.
प्रतीक यांचे आजोबा स्व. राजारामबापू पाटील यांनी घालून दिलेली समाजसेवेची परंपरा नव्या पिढीकडून टिकवली जाते आहे, याचे समाधान त्यांनी या पोस्टमधून व्यक्त केलं आहे.
“शेतीमध्ये नवतंत्रज्ञान, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठीचे मार्गदर्शन, आरोग्य शिबिरे, उद्यमशील तरुणांसाठी आयबीएफचे काम, ज्येष्ठांप्रती प्रेमळ नातं”, या सर्व बाबींमधून प्रतीक पाटील यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचं वडील जयंत पाटील यांनी कौतुक केलं आहे.
शेवटी जयंत पाटील यांनी दिलेल्या आशिर्वादात ते म्हणतात,
“तुझ्या हातून सदैव सत्कार्य घडो, ह्याच सदिच्छा!”
अशा शब्दांत त्यांनी मुलाची कौतुकाने भरलेली प्रशंसा केली आहे.
फोटोमध्ये दिसणारी छत्री ही फक्त पावसापासून संरक्षण करणारी नाही; ती कुटुंबाचा आधार, संस्कारांची छत्रछाया, आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे झिरपत जाणारा समाजसेवेचा वारसा दर्शवणारी आहे.
सामाजिक माध्यमांवर हा फोटो आणि ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, अनेकांनी यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
“संस्कारांची छत्रछाया पिढ्यानपिढ्यांची असते – जयंत पाटील आणि प्रतीक पाटील यांचा पावसातला हा फोटो शब्दांपेक्षाही अधिक काही सांगून जात आहे…”