चांगभलं ऑनलाइन | हैबत आडके
कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस दराच्या प्रश्नावर तोडगा निघाला असला तरी सांगली जिल्ह्यातील ऊस दर आंदोलनाची धग अजून कायम आहे. स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी राजारामबापू साखर कारखान्यावर वजन काट्यावर आंदोलन केलं होतं. प्रशासनाकडून आश्वासन दिल्यानंतर त्यांनी हे आंदोलन तात्पुरतं मागे घेतलं. मात्र त्यानंतर माजी मंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यात जोरदार खेळी सुरू केलीय, असा आरोप करत ‘जयंत पाटलांची ही तिरकी चाल’ असल्याचं शेट्टी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
राजू शेट्टी यांनी सविस्तर लिहिलेल्या या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलंय की, सांगली जिल्ह्यातील ऊस दराच आंदोलनाची धग अजून पेटलेलीच आहे. जिल्ह्यातील १६ कारखान्यांनी आपला गळीत हंगाम सुरू केलेले आहेत. यामधील ४ कारखाने जयंत पाटील यांचे स्वत:चे मोहनराव शिंदे व विश्वासराव नाईक चिखली व क्रांती कुंडल हे जयंत पाटलांच्या इशा-यावर चालणा-या सहकारी मित्रांचे , ४ कारखाने विश्वजीत कदम यांचे म्हणजे जवळपास १६ पैकी ११ कारखाने हे जयंत पाटील व विश्वजीत कदम यांच्याकडे आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यंदा कोल्हापूर पॅटर्न प्रमाणे सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी दराचा तोडगा काढावा या मागणीसाठी आंदोलन सुरू ठेवले आहे. सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदार एकत्रित होवून यंदाच्या वर्षीची पहिली उचल ३१०० रूपये ठरविले आहेत. यामध्ये सहा कारखान्यांची पहिली उचल एफ. आर. पी प्रमाणे ३२०० पेक्षा जास्त जाते. पाच कारखान्यांची उचल एफ. आर. पी प्रमाणे २४५० ते २७०० रूपयापर्यंत आहे. मग जे पाच कारखाने २४५० पासून २७०० पर्यंत दर देतात त्या कारखान्यांना ३१०० रूपये प्रतिटन म्हणजेच ४०० पासून ते ६५० रूपये प्रतिटन जादा दर देण्यास परवडते मग बाकीच्या ११ कारखान्यांना एफ. आर. पी पेक्षा १०० रूपये देण्यास का परवडत नाही. याचाच अर्थ एफ. आर. पी पेक्षा कमी दर देवून जयंत पाटील , विश्वजीत कदम , अरूण लाड , मानसिंगराव नाईक यांच्या कारखान्यात शेतक-यांना नागवलं जात आहे.
ज्या राजारामबापू , सोनहिरा , क्रांती कुंडल या कारखान्यांची रिकव्हरी चांगली असून या भागातील शेतक-यांनी १६ महिन्याचा आपला ऊस गाळपास पाठविलेला आहे. यामुळे या ऊसाची रिकव्हरी म्हणजेच साखर उतारा चांगला मिळाला आहे. यामागे कारखाना प्रशासनाचे किंवा चेअरमानांचे कोणतेच योगदान नसून शेतक-यांचे योगदान आहे. मग राजारामबापू कारखाना साखराळे , वाटेगांव , कारंदवाडी युनिट , सोनहिरा साखर कारखाना , क्रांती कारखाना कुंडल , वसंतदादा साखर कारखाना सांगली ,विश्वासराव नाईक कारखाना चिखली , दालमिया शुगर निनाई हे कारखाने साखळी करून दर कमी देवू लागले आहेत. सांगली जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतक-यांचे कोल्हापूर पॅटर्न प्रमाणे प्रतिटन २०० रूपयाचे नुकसान होवू लागले आहे. मग शेतक-यांनो तुम्हीच विचार करा जर तुमचा १०० टन ऊस गेला असेल तर २० हजार रूपयाचे तुमचे नुकसान होणार आहे. आणि आता कारखान्याचे मार्गदर्शक जयंत पाटील साहेब राजारामबापू कारखान्याच्या माध्यमातून परिपत्रक काढून आम्हाला शेतक-यांना ३१०० रूपये दर मान्य आहे असे लिहून घेऊन एफ. आर पी पेक्षा कमी दर देवू लागले आहेत. त्यांच्याच कारखान्याच्या ताळेबंदानुसार वाढलेल्या साखर दरातील फरकानुसार कारखान्याकडून शेतक-यांना २६० रूपये प्रतिटन देणे लागते. यापैकी राजारामबापू कारखाना शेतक-यांना ५० रूपये देणे लागतो. मग उर्वरीत २१० रूपये कुणाच्या खिशात गेले आहेत याचा शोध घ्यावा लागणार आहे. आज राजारामबापू कारखान्याने जबरदस्तीने कारखाना , बॅंक , पाणीपुरवठा संस्था , शाळा महाविद्यालयाचा स्टाफ यांचेकडून व कामगाराकडून जबरदस्तीने एफ. आर. पी मध्ये तुकडे करण्याचे अधिकारपत्र लिहून घेत आहेत. यामधून कोट्यावधी रूपयाचे नुकसान ऊस उत्पादक शेतक-यांचे होणार आहे, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
…. तर जामिनही घेणार नाही, तुरुंगात राहतो!
“कारखान्याच्या काट्यावर आंदोलन झाल्यावर लाखो रूपयांच्या नुकसानीचे राजू शेट्टी यांच्यासहित कार्यकर्त्यांच्यावर कारखान्याच्या सचिवामार्फत गुन्हे दाखल करून तुमच्या पातळयंत्री स्वभावास समाधान मिळणार असेल तर आम्ही जामीनसुध्दा घेत नाही. तुमचं समाधान होईपर्यंत तुरूंगात राहतो पण शेतक-यांचे पैसे तेवढ बुडवू नका.”
– राजू शेट्टी, माजी खासदार,
नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना