…याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात – changbhalanews
राजकियराज्य

…याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात

आ. जयकुमार गोरेंचा पृथ्वीराज चव्हाणांवर निशाणा

चांगभलं ऑनलाइन | सातारा
कंत्राटी भरतीचा निर्णय हा पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) हे मुख्यमंत्री असताना त्यांच्याच कार्यकाळात घेण्यात आला होता. मात्र असे असतानाही कंत्राटी भरतीचा निर्णय जनरेटयामुळे मागे घ्यावा लागला असे म्हणत तत्कालीन युती सरकार व देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे बोट दाखवणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य हे त्यांच्या सुसंस्कृतपणाला शोभणारे नाही,

त्यांची पत्रकार परिषदेतील विधाने म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, अशी टीका माण-खटावचे आ. जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी काल, दि. 22 ऑक्टोबर रोजी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशिलदादा कदम यांची उपस्थिती होती.

‌‌आ. गोरे म्हणाले, वेगवेगळे जीआर काढून शेतकरी आणि युवकांची फसवणूक करण्याचं काम मागील सरकारने केलं होतं. मात्र आता त्यांचं सरकार राज्यात नाही. त्यामुळे त्याच जीआरचे खापर दुसऱ्यावर फोडून खोटा कळवळा आणून मागील सरकारमधील राज्यकर्ते हे शेतकरी, युवकांची तसेच सामान्यांची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. त्यातूनच कंत्राटी भरतीचा निर्णय हा भाजप-शिवसेना युतीच्याच काळात झाला आहे, असं धांदांत खोटं बोलून हा विषय पुढं रेटला जात आहे.

दोन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले होते. कंत्राटी भरती 2003 पासून सुरु झाली. त्यावेळी राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे सरकार होते. यानंतर कंत्राटी भरतीसंदर्भात वेगवेगळे निर्णय घेण्यात आले. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणच होते. कंत्राटी भरतीचा निर्णय त्यांच्याच कार्यकाळात झाला होता. असे असताना त्यांच्यासारख्या सुसंस्कृत व्यक्तीने अशी चुकीची विधानं केल्यामुळे त्यांच्याबाबत असलेल्या विश्वासाला तडा गेलेला आहे, असेही गोरे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना 2020 आणि 2021 साली कंत्राटी भरतीचे जीआर निघाले होते. त्यावेळीही पृथ्वीराज चव्हाण सत्तेत होते. मात्र तरीही पृथ्वीराज चव्हाणांनी पत्रकार परिषदेत चुकीची विधानं करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. याला चोराच्या उलट्या बोंबा असं म्हणतात, असं गोरे म्हणाले.
सातारा, माढा आता भाजपचा बालेकिल्ला!
सातारा जिल्हा हा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. सातारा जिल्हा हा भाजपचाच बालेकिल्ला राहील तसेच भाजपला सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघात निश्चित यश मिळेल, असा दावा आ. गोरे यांनी केला.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close