ग्रीन क्लायमेट फंडच्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाची कराड येथून सुरुवात
महिला उद्योजकीय डिजिटल मार्केटिंगचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण
कराड | प्रतिनिधी
युरोपियन युनियन-इंडिया आणि ट्रेकस्टेप, त्रिची यांच्या जिनी कार्यक्रमांतर्गत कराड तालुका कृषी अधिकारी कार्यालय, विद्यादीप फाऊंडेशन, मी नागरिक फाऊंडेशन आणि नव हिंद चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय उद्योजकता विकास प्रशिक्षण हे कराड येथे नुकतेच आयोजित करण्यात आले होते. ग्रामीण भागातील महिला उद्योजकांसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून आंतरराष्ट्रीयस्तवर उद्योग वाढ प्रसाराच्या तंत्रज्ञान सुविधांची माहिती या कार्यक्रमामध्ये देण्यात आली.
तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात, अभिजीत किर्दत, कोमल घोडके, नितिन सावंत, सुनीलदत्त ताकटे आदी कृषी अधिकारी यांसह सतीश शेंडे, मी नागरिक फाऊंडेशनचे अध्यक्ष विद्याधर गायकवाड, प्रा. डॉ. दीपक ताटपुजे तसेच एम. के कुरणे आदी तज्ज्ञ व्यक्तींनी कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन केले.
ग्रीन क्लायमेट फंडच्या व्यवसायवाढ लाभ घेण्यासाठी ग्रामीण महिला उद्योजकांना त्यांची आभासी व्यवसाय उपस्थिती आणि क्षमता निर्माण करून प्रोत्साहित करण्यासाठी नुकतेच कराड येथे ही प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. या आंतरराष्ट्रीय प्रकल्पांतर्गत सुरू झालेल्या महाराष्ट्र राज्यव्यापी कार्यक्रमाची सुरुवात कराड येथून ४५ पेक्षा जास्त महिलांच्या सहभागाने झाली आहे. या तीन दिवसाच्या कार्यशाळेमध्ये महिलांनी त्यांच्या व्यवसायाचा सोशल मीडियावर प्रसार तसेच माहिती तंत्रज्ञानाच्या प्लॅटफॉर्मद्वारे व्यवसाय वाढ करण्यासाठीची अनेक तंत्रे अवगत करून प्रात्यक्षिकासह कौशल्ये प्राप्त करून देण्यात आली. महिलांसाठी व्यवसायवृद्धी करण्यासाठी ही कार्यशाळा नक्कीच उपयोगी ठरेल, अशी आशा आयोजकांनी व्यक्त केली आहे.